Next
आनंदी आनंद गडे...
BOI
Tuesday, July 18, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


पावसाळा सुरू झाला आणि त्यातही श्रावण महिन्याची चाहूल लागली, की मनामनांवर आनंदाचं साम्राज्य पसरतं आणि मग कितीही अरसिक माणूस असला, तरी त्याच्या चित्तवृत्ती फुलतात. निसर्गाला आनंदाचं निधान मानणाऱ्या बालकवींनी या मनःस्थितीचं वर्णन ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेत फार उत्तम रीतीनं केलंय. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज त्याच कवितेचा आस्वाद घेऊ या.
............. 

बालकवीमराठी मिश्रसंगीताचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचं गाणं लावायचं होतं. मला बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ या गाण्याची आठवण झाली. ते मी लावलं आणि अवघ्या प्लेबॅक स्टुडिओमध्ये आनंदलहरी पसरल्या. स्टुडिओमधून आकाशलहरींद्वारे त्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या. हो, नक्कीच पोहोचल्या असतील. कारण बालकवींच्या कवितेतल्या आनंदी भावनेला लतादीदींच्या स्वरांचा सुगंध लाभला होता. हा आनंदाचा परिमळ सर्वदूर पोहोचवणारा वारा नव्हता, तर ध्वनिलहरींनी ते काम केलं होतं. रसिक मनाला आनंद देण्याचं पुण्यकर्म आकाशवाणी अव्याहतपणे करत असते. त्यात आमचाही सहभाग असतो, याचा आम्हा सर्व निवेदकांना आनंद असतो. इथं मी अभिमान असतो असं म्हणण्याऐवजी आनंदच म्हणते, याचं कारण बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता आत्ता या क्षणी मनात आहे.

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे
वायुसंगे मोद फिरे... 

आनंदक्षण आठवायचे आणि दु:खाला फिरकूच द्यायचं नाही, असं जेव्हा आपण ठरवतो ना, तेव्हा फक्त बालकवींची ही कविता गुणगुणत राहायचं. बघा, इकडे-तिकडे, चोहीकडे आनंदाचीच अनुभूती आपल्याला येईल. किती निरागस भावनेची लयलूट आहे या कवितेत! आईला पाहून बाळाच्या चेहऱ्यावर जसा आनंद दिसतो त्या आनंदातली निरागसता बालकवींच्या या कवितेत आहे असं वाटतं. खरं म्हणजे आनंद हा शब्दच असा आहे, की तो उच्चारल्याबरोबर दु:ख पळून जातं... निराशा, उदासीनता दूर होते. बालकवींना आनंद दिसला तो निसर्गात, सुगंधी वाऱ्यात, आकाशातील चमचमणाऱ्या ताऱ्यांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यांत सर्वत्र आनंदच आनंद! आनंदाचंच दुसरं नाव मोद !!

नभात भरला, दिशांत फिरला
जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे, 
आनंदी आनंद गडे।

‘मनोरंजन’च्या १९०९च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली बालकवींची ही कविता आजही तितकीच टवटवीत आणि आनंददायी...

केशवसुतांच्या मालगुंड या गावी आम्ही केशवसुत स्मारक पाहिलं. आधुनिक कवितेच्या जनकाचं घर, त्यांच्या वस्तू, घराच्या भिंतीवर लिहिलेल्या कविता, शिलालेखांसारखी काव्यशिल्पं पाहून जळगावच्या काव्यरत्नावली चौकाची आठवण झाली. बालकवी जन्मशताब्दीनिमित्त कवी कुसुमाग्रज, कविवर्य ना. धों. महानोर आणि जळगावच्या साहित्यप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नांतून बहिणाबाई, साने गुरुजी, कुसुमाग्रज, दु. आ. तिवारी यांच्या काव्यशिल्पांबरोबर बालकवींचा ‘औदुंबर’ही पहायला मिळतो. ‘काव्यरत्नावली’ हे कवितेला वाहिलेलं पहिलं मासिक जळगावमधून प्रसिद्ध झालं. त्याचं स्मरण म्हणून त्या चौकाला ‘काव्यरत्नावली चौक’ असं नाव देण्यात आलं. या चौकात अतिशय दिमाखात उभी आहेत ती काव्यशिल्पं. 

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. १९०७मध्ये जळगावला पहिलं मराठी कविसंमेलन भरलं होतं. कवी विनायकांनी बालकवींना सांगितलं, की तू या संमेलनाला जा, कविता वाच. बालकवी संमेलनाला गेले. संमेलनाचे अध्यक्ष होते कर्नल कीर्तिकर. बालकवींनी कविता सादर केली... 

अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती
कविवर्यांनो मदीय बोबडे बोल धरा परि चित्ती।

असा चौदा ओळींचा फटका होता तो. संपूर्ण फटका उपलब्ध नाही; पण शेवटच्या ओळी अशा होत्या,

बुद्धिविरहित आहे माझे काव्य पोरके आज
त्या कवने होईल कैसे जनमनरंजन काज?

एका अल्पवयीन मुलाने धीटपणाने सादर केलेली ही कविता ऐकून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. संमेलनाचे अध्यक्ष कर्नल कीर्तिकरांच्या हस्ते जरीकाठी उपरणे देऊन त्या बालकाचा सत्कार करण्यात आला आणि ‘बालकवी’ ही पदवी बहाल करण्यात आली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‘बालकवी’ या नावाने प्रसिद्ध झाले. आपल्या काव्यप्रतिभेने मराठी सारस्वतात अजरामर झाले. श्रावण मासात बालकवींच्या जयंतीला दर वर्षी कविवर्य महानोरदादांसमवेत काव्यरत्नावली चौकात पाऊस असला तरी काव्यरसिक बालकवींच्या कवितांचं वाचन करत. जळगावच्या वास्तव्यात माझ्याही वाट्याला हे भाग्य आलं होतं. कापूस, केळी आणि कवितांचं गाव जळगाव मी कधीच विसरू शकत नाही. 

बालकवींच्या कवितांमधला निसर्ग सदैव आनंद देणारा आहे. बालकवींना निसर्ग आनंदाचं निधान वाटे. आपल्या वाट्याला आलेलं मानवी जीवन जगत असताना त्यातील अपूर्णता निसर्गात पूर्ण झालेली बालकवींना दिसे. त्यामुळेच निसर्ग हा त्यांच्या आकर्षणाचा विषय झाला असावा. निसर्गातील रंगांचं गारुड त्यांच्या कवितांमधून व्यक्त झालेलं दिसतं. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ किंवा ‘ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून’ अशा कविता किंवा प्रत्येक श्रावणमास साजरा करताना हमखास आठवणारी बालकवींची कविता म्हणजे...

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनि ऊन पडे.
वरती बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

अवघ्या सृष्टीतली हिरवाईच नव्हे, तर सप्तरंगी इंद्रधनुष्य बालकवींच्या कवितांमधून आपल्याला दिसतं आणि मग आनंदाशिवाय काही उरतं का? सर्वत्र आनंदी आनंद... 

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे!

बालकवींचं हे आनंदगान ऐकलं की मनात कल्पना येते, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी जेव्हा ही कविता वाचली असेल, तेव्हा आनंदाचे स्वरकारंजे त्यांच्या मनातून फुलले असेल. मूळ कविता पाच कडव्यांची आहे; पण संगीतकार हृदयनाथांनी तीन कडवी निवडली आणि लतादीदींच्या गोड गळ्यातून गाऊन घेतली. बालकवींच्या आनंदी गाण्याला लतादीदींचा स्वर लाभला आणि एक स्वरानंद नव्हे तर ब्रह्मानंदाचा अनुभव रसिकांना घेता आला. आजही तितक्याच उत्कटतेनं तो अनुभव रसिकांना येतोय.

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते? मोदाला! मोद भेटला का त्याला?
तयामध्ये तो, सदैव वसतो
सुखे विहरतो
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे।

हे तिसरं कडवं या गीतामध्ये नाही, तर हे चौथं कडवं गाण्यात आहे, ते असं... 

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे?
कमल विकसले, भ्रमर गुंगले
डोलत वदले
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे।

कवीने निसर्गप्रतिमांमधून आपल्या मनाला पडलेले प्रश्न सोडवले, उत्तर एकच मिळालं, ते म्हणजे ‘आनंद’! निसर्गात जे जे घडतं त्याचा कार्यकारणभाव एकच तो म्हणजे आनंद!! ‘निसर्गाकडे चला’ असं आज आवर्जून सांगितलं जातंय, याचं कारण निसर्गाचं महत्त्व मानवाला कळून चुकलंय. निसर्गाचा नाश, पर्यावरणाचा विनाश मानवाच्या दु:खाला कारणीभूत झालाय...निसर्गाशी मैत्री, दोस्ती म्हणजेच आनंदाची वस्ती! जिथं निसर्ग तिथं आनंद. हा आनंद शोधणारं बालकवींचं मन प्रत्येकाजवळ हवं. द्वेष, मत्सर, स्वार्थ ज्यांच्याजवळ, त्या पामरांना कसा मिळणार मोद, आनंद?  

स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्थ तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला
आता उरला
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे ।

हे पाचवं आणि शेवटचं कडवं गाण्यात नाही; पण जी काही तीन कडवी संगीतकाराने निवडली त्या कडव्यांतून बालकवी रसिकांच्या मनात असे काही रुजले, की त्यातून फक्त आनंदच अंकुरत राहतो. या आनंदक्षणाचे साक्षी होण्याचं भाग्य म्हणजे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी साधलेला सुंदर वाद्यवृंदमेळ आणि लतादीदींच्या स्वरांतून हे गीत अवतरतं ती सौभाग्यशाली वेळ! अशा आनंददायी वेळा अनुभवण्याचं भाग्य देतो तो निसर्ग! पावसाच्या सरीत भिजलेले डोंगर, ओलेती झाडं आणि रानावनातली हिरवाई पाहू या आणि गुणगुणत राहू या... 

इकडे तिकडे चोही कडे, आनंदी आनंद गडे

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anand G Mayekar About 46 Days ago
Balkavi, EK SHAPEET GANDHRAV, kahi mahinyapurvi ha lekh vachala ani kaljacha thoka chukala. Eka Mahan ani premal kavi magachi karun kahani vachun, papnya olavalya. Lahanpani shalet Astana yevadhi mahiti kuni dili navhati, kadachit Gurujini amache vayman samjun miluddham talale Asel. Pan atta ya utar vayat jevhan ti kahani vachali, tevhan vatale ki apali dukkhe ya pudhe kadi saman ahet. Ya Gandhravala, Sashtang Dandawat.
0
1
Jyotsna Ketkar About
निखळ आनंद देणारा माहितीपूर्ण लेख
5
0
Shailesh paranjape About
बालकवींच्या कवितेतला निसर्ग लेखातून सुंदर साकार झाला आहे. या कवीचा अंत इतका भयानक व्हावा हे दुर्दैव..
3
1

Select Language
Share Link
 
Search