Next
सुट्टीत लहान मुलांनी केली सरबतविक्री; अर्धी कमाई देणार समाजकार्यासाठी
BOI
Friday, May 31, 2019 | 11:33 AM
15 1 0
Share this article:

पुणे : सध्या पुण्यातील घोले रोडवरील सरबताचा एक स्टॉल खूपच चर्चेत आहे. हा स्टॉल सुरू केला आहे काही लहान मुलांनी. ऋषद तळेगावकर, जयनील भरद्वाज, आमोद गोरा आणि ईशान चंद्रचूड अशी त्यांची नावे आहेत. सुट्टीत घरी धमाल, दंगा-मस्ती करायची सोडून, काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा सरबताचा स्टॉल सुरू केला आहे. 

यातून मिळालेल्या कमाईचा अर्धा भाग ते समाजकार्यासाठी दान करणार आहेत. या मुलांची ही मेहनत आणि त्यामागचा उद्देश बघून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून, लोक आवर्जून त्यांच्याकडे सरबत पिण्यासाठी जात आहेत. 

ऋषद तळेगावकरच्या संकल्पनेतून हा मुलांचा छोटासा व्यवसाय साकारला आहे. व्यवसाय कसा करतात, पैशाचा व्यवहार, हिशेब कसा सांभाळायचा हे कळावे आणि कष्टाने मिळवलेल्या पैशाचे मोलही समाजावे या हेतूने ही कल्पना मुलांसमोर मांडण्यात आली. त्याला मुलांनी आनंदाने होकार दिला आणि सुरू झाला बच्चेकंपनीचा सरबताचा स्टॉल. घोले रोडवरील फुटपाथवर ही मुले सरबत विकतात. रसना, लिंबू सरबत व इतर थंडपेये दहा रुपये किमतीला विकतात. याचे मार्केटिंगही मुले करतात. रस्त्याच्या एका कडेला सायकलवरून फेरी मारत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना थंडगार सरबताचा आस्वाद घेण्याचा आग्रह करतात. गेल्या आठ दिवसांत या मुलांना ९५० रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असून, यातील अर्धी रक्कम गरजूंना दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपण कोणाला तरी मदत करू शकतो, याचा आनंद मोठा असल्याची त्यांची भावना आहे. 

ऋषद तळेगावकर मित्रासह
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुले बाहेरगावी फिरायला जातात किंवा घरी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत दंगामस्ती करत सुट्टीचा आनंद घेतात. काही मुले घरी बसून तासन् तास मोबाइलवर गेम खेळतात किंवा टीव्ही पाहतात. काही जण मैदानी खेळ खेळतात. या पार्श्वभूमीवर, या मुलांनी कामाची लाज न बाळगता, आपल्या सुट्टीचा वेळ अशा उपक्रमात घालवावा आणि त्यातही समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव ठेवून आपल्या कमाईचा भाग इतरांना देण्याची तयारी दाखवावी, ही खूप मोठी बाब आहे. इतर मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही त्यांनी हा चांगला आदर्श ठेवला आहे. 

(सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search