Next
आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
BOI
Thursday, June 07, 2018 | 12:23 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘पंढरपूरला भरणाऱ्या यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. आषाढी वारीपूर्वी आणि नंतर श्रमदानाने पंढरपूरची स्वच्छता केली जाणार असून, यामध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे केले.

पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी वारी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी सहा जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.

पंढरपूर येथे २३ जुलै २०१८ रोजी आषाढी वारी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात स्वच्छता, सुरक्षितता, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था या बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जावे, अतिक्रमणे काढावीत, पालखीच्या मुक्कामाच्या आणि विसाव्याच्या ठिकाणी मुरमीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सांगितले.

‘जिल्हा परिषदेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पालखी तळाच्या परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे का याची आरोग्य विभागामार्फत तपासणी करावी, पाण्याचे स्त्रोत निश्चित करून ठेऊन पालखी तळ आणि स्त्रोत यांचे नकाशे तयार करून घ्यावेत. टँकरच्या पुरवठादार आणि चालकाचे मोबाईल क्रमांक पालखी प्रमुखांना उपलब्ध करून द्यावे,’ अशा सूचना डॉ. भोसले यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

‘वारकरी दर्शनासाठी रांगेत दोन-दोन दिवस उभे असतात.  त्यांना सुविधा पुरवा. त्यांना रांगेत उभे राहणे सोयीस्कर व्हावे अशा अनुषंगाने नियोजन करावे, वारकऱ्यांना पाणी, सुविधा पुरवाव्यात यासाठी पंढरपूर उपविभागीय अधिकारी, पोलिस आणि जिल्हा परिषद यांनी नियोजन करावे,’ असेही डॉ. भोसले यांनी या वेळी सांगितले.

बैठकीस आळंदी देवस्थानचे प्रमुख कार्यवाह अजित कुलकर्णी, अभय टिळक यांच्यासह उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, शमा ढोक-पवार, सचिन ढोले, प्रवीण साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर, कार्यकारी अभियंता विलास मोरे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रमा जोशी, बाई माने महावितरणचे कार्यकारी अभियंता मधुकर पडळकर आदी उपस्थित होते.

‘जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके नियुक्त करावीत, ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान वेळेत दिले जावे, वाहनांना पासेस देताना पोलिसांनी पारदर्शक पद्धत अवलंबावी, पालखी तळांवर केरोसीन आणि आवश्यक साहित्यांचा पुरवठा व्यवस्थित करावा, ६५ एकर परिसरातील आणि नदी पात्रातील स्वच्छता नगरपरिषदेने २० जूनपूर्वी करावी,’ असा सूचना डॉ. भोसले यांनी बैठकीदरम्यान दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link