Next
‘विनोदातील सहजता हरवू नये’
प्रेस रिलीज
Monday, May 07 | 05:04 PM
15 0 0
Share this story

जागतिक हास्य दिनानिमित्त निवारा वृद्धाश्रमात आयोजित बोलताना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले. या वेळी  व्यासपीठावर (डावीकडून ) सुनीता राजे पवार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस

पुणे : येणाऱ्या रसिकाचे काढले जाणारे अर्कचित्र, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस, मंगला गोडबोले यांची नर्मविनोदी भाषणे, मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोगाने झालेली हसरी सुरवात, विनोदी कथा लेखक रवींद्र कोकरे यांचे कथाकथन आणि विविध किस्से यामुळे रविवारची सायंकाळ  हास्यकल्लोळात रंगली.

निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पुणे औंध - पाषाण ,महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विनोद- साहित्य - आनंद मेळा’  या कार्यक्रमाचे. जागतिक हास्य दिनानिमित्त निवारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी व्यासपीठावर  शि. द. फडणीस, मंगला गोडबोले, रवींद्र कोकरे, लायन्स क्लबचे नियोजित प्रांतपाल रमेश शहा, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलींद जोशी, मकरंद टिल्लू, सुनीताराजे पवार हे मान्यवर उपस्थित होते.

‘जनावरे हसू शकत नाहीत, माणसे हसू शकतात, पण ती हसत नाहीत. हसून जीवनाचा रसरशीत आस्वाद घेतला पाहिजे’,  असे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शि. द. फडणीस
‘मन, शरीर तंदुरुस्त करण्यासाठी विनोद उपयुक्त ठरतो. मात्र,एकच व्यंगचित्र वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा संदेश देते. वेगवेगळ्या रितीने पोचते. त्याचा आस्वाद घेणे जमले पाहिजे.विनोद लेखन, व्यंगचित्रकला क्षेत्रात महिला कमी आहेत, पण मंगला गोडबोले यांचा आदर्श ठेवून ही संख्या वाढली पाहिजे’, अशी अपेक्षा शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.

मंगला गोडबोले म्हणाल्या, ‘विनोदाचं गाडं घरंगळत चाललं आहे. विनोदाचे मर्म म्हणजे तो योग्य ठिकाणी थांबला पाहिजे. हल्ली विनोदी लेखनाचीच अतिरेकी मागणी होते आहे का ? असा प्रश्नही पडतो. माणसांना विचार करायचा नाही, म्हणून सतत करमणुकीची मागणी होते का, याचाही विचार केला पाहिजे. आमचे जीवन स्ट्रेसफुल आहे, अशी तक्रार आमची पिढी करते. ही सबब चुकीची असून, ताण नको असेल तर रेसमध्ये धावणे थांबवले पाहिजे.जिथे तिथे हलक्या फुलक्या वातावरणाची अपेक्षा ठेवणेही योग्य  नाही.जुन्या कोटया असलेला विनोद, कृत्रिम विनोद घडवणारे लेखन, सहजता गमावलेला विनोद , बाल बुध्दीचा विनोद सध्या दिसत आहे. हास्यामुळे आयुष्यातील आशावाद वाढतो. तरीही विनोदाला दुय्यम स्थान दिले जाते.विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली पाहिजे.’

‘विनोदी लेखकांनी  स्पर्धत उतरून उत्स्फूर्त लेखन हरवू देऊ नये. विनोदातील  ‘वि’ हा शब्द विवेकातही आहे, हे व्यावसायिक विनोदकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. कान धरणारेही कोणी उरले नाही. वाहिन्यांवरचा विनोद आवडला नाही, तर दोन ओळीचा निषेधही व्यक्त होत नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रदीप बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला हजर होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link