Next
महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान
BOI
Sunday, December 30, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात, वेदशिक्षण आणि वेदप्रसाराचे कार्य कर्तव्यभावनेने मोठ्या नेटाने, जोमाने, प्रखर निष्ठेने करणारी संस्था म्हणजे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान. पुणे हे संस्थेचे प्रमुख केंद्र असून, देशभरात स्वत:च्या पाठशाळा स्थापन करून आणि अन्य चालू वेदपाठशाळांना सर्वतोपरी साह्य करून संस्थेने हा ज्ञानयज्ञ धगधगता ठेवलेला आहे. स्वामी गोविंददेव गिरी यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे हे प्रतिष्ठान स्थापन केले. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेच्या आणि स्वामी गोविंददेव गिरी यांच्या कार्याबद्दल...
..............
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजे जगातील सर्वांत प्राचीन वाङ्मय आहे. अंदाजे सहा-सात हजार वर्षांपूर्वी त्यांची निर्मिती झाली. त्या काळातील वायव्य बृहत्भारतात ऋषिमुनींनी ही रचना केली. वेदांच्या ऋचा तपस्वी ऋषींनी स्फुरल्या. म्हणून त्यांना ‘श्रुती’ म्हणतात. सुरुवातीला त्यांचे वेगवेगळे विभाग नव्हते. महर्षी व्यासांनी हजारो ऋचा संपादित करून, विषयानुसार चार वेद प्रस्थापित केले. म्हणूनच त्यांना वेदव्यास असे नाव पडले. वेद म्हणजे ज्ञानराशी. आज साऱ्या जगाला त्यांचे महत्त्व कळलेले असून, सर्वत्र त्यांचा अभ्यास चालतो.

ऋग्वेदात एकूण १० हजार ५२२ ऋचा (मंत्र) आहेत. सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत जगातील सर्व पदार्थांचे ज्ञान त्यात मिळते. निसर्ग आणि देवतांची वर्णनेही आहेत. या वेदाच्या पाच शाखा आहेत. यजुर्वेदात १९७५ ऋचा आहेत. कर्मकांड आणि यज्ञयागांचे विधी त्यात सांगितले आहेत. शुक्ल आणि कृष्ण अशा त्याच्या दोन शाखा आहेत. संगीत आणि उपासना यांना वाहिलेला सामवेद १८७५ ऋचांचा आहे. त्यातील बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच आहेत. या वेदाच्या तीन शाखा आहेत. अथर्ववेदात ५९७७ ऋचा आहेत. युद्ध आणि शांती हे त्यांचे प्रमुख विषय. आधुनिक विज्ञानातल्या अनेक गोष्टी त्यात भरलेल्या आहेत. या वेदाच्या असंख्य शाखा होत्या. त्यातील बऱ्याचशा शाखा आज लुप्त झाल्या आहेत. सर्व वेदवाङ्मय संस्कृत भाषेत रचलेले आहे. मौखिक (पाठांतर) परंपरेने गुरूंकडून शिष्यांमार्फत हजारो वर्षे त्यांचे, कोणतेही बदल किंवा पाठभेद न होता, जतन झालेले आहे. छपाईची सोय उपलब्ध झाल्यानंतर आज वेद छापील ग्रंथरूपाने उपलब्ध आहेत.

लोकाश्रय आणि राजाश्रयामुळे जुन्या काळी हजारो वेदपाठशाळा भारतवर्षात चालू होत्या. वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चरितार्थ उत्तम चालत असे. वाराणसी हे वेदरक्षण करणारे प्रमुख केंद्र मानले जात होते. पुढे पुढे राजकीय, आर्थिक स्थित्यंतरांमुळे ही परंपरा खंडित होऊ लागली. त्याचे पुनरुज्जीवन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था सर्व काळात निर्माण होत राहिल्या. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात, वेदशिक्षण आणि वेदप्रसाराचे कार्य कर्तव्यभावनेने मोठ्या नेटाने, जोमाने, प्रखर निष्ठेने करणारी संस्था म्हणजे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान. पुणे हे संस्थेचे प्रमुख केंद्र असून, देशभरात स्वत:च्या पाठशाळा स्थापन करून आणि अन्य चालू वेदपाठशाळांना सर्वतोपरी साह्य करून संस्थेने हा ज्ञानयज्ञ धगधगता ठेवलेला आहे.

स्वामी गोविंददेव गिरीस्वामी गोविंददेव गिरी (आचार्य किशोरजी व्यास) यांनी समविचारी धर्मप्रेमी लोकांच्या सहयोगाने २१ फेब्रुवारी १९९० रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान (मवेप्र) स्थापन केले. येत्या फेब्रुवारीत संस्था तिसाव्या वर्षात पदार्पण करील. सध्या आळंदीसह केवळ महाराष्ट्रात ३४ ठिकाणी प्रतिष्ठानाच्या प्रेरणेने वेद विद्यालये कार्यरत आहेत. तिथे चारी वेदांच्या अध्ययन-अध्यापनाची व्यवस्था आहे. त्याशिवाय देशभरातील वेद-शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांना अनुदान आणि निवडक विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती दिली जाते. वेद, वेदांग (शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष) तसेच वेदांशी संलग्न संस्कृत भाषा यांचे शिक्षण देणे आणि इतरांना प्रोत्साहित करणे हे ‘मवेप्र’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. तरुण वैदिकांना (घनपाठी इत्यादी) अर्थसहयोग, वृद्ध वैदिकांना दरमहा गौरव दक्षिणा देणे, हासुद्धा संस्थेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. देशभरात वैदिक शिबिरे, परिषदा आणि संमेलनांचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते. चारी वेदांचे पठण (संहिता स्वाहाकार) त्यात केले जाते. दीर्घ काळ वेदसेवेचे विशेष कार्य करणाऱ्या ज्ञानमहर्षींना दर वर्षी ‘महर्षी वेदव्यास पुरस्कार’ दिला जातो.प्रतिष्ठानद्वारे आतापर्यंत १९ राज्यांमधील १३८ वेदपाठशाळांशी संपर्क साधण्यात आला. त्यातून सुमारे ८५० वैदिक विद्वान आणि ३६०० छात्रांच्या कार्याचा परिचय झाला. शिष्यवृत्ती आणि पुरस्कार यांच्यासाठी आजवर १६ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. कार्यालयीन खर्च, प्रवास, समारंभ वगैरे नैमित्तिक व्यय हा वेगळा. एवढा प्रचंड डोलारा सांभाळण्याचे मुख्य श्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक आणि संचालक स्वामी गोविंददेव यांच्याकडे जाते. आपले अथक परिश्रम आणि कुशल नेतृत्वाने त्यांनी ते साध्य केले आहे. त्यांचा अल्प परिचय करून देणे येथे आवश्यक आहे.

मूळचे राजस्थानमधील व्यास कुटुंब १५० वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील बेलापूर येथे स्थलांतरित झाले. त्यांच्या आठ पिढ्या भागवत कथा (सप्ताह) भारतभर कथन करण्याची परंपरा चालवत आहेत. किशोरजींचा जन्म १९४९मध्ये झाला. लवकरच ते वयाची सत्तरी पूर्ण करतील. त्यांचे शालेय शिक्षण बेलापूरमध्येच झाले. नंतर, पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात (ठाणे) त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढे काशीला वाराणसेय संस्कृत विश्व विद्यालयात त्यांना आचार्य ही उपाधी प्राप्त झाली. कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्याकडून त्यांना अनुग्रह दीक्षा प्राप्त झाली. पुढे, महामंडलेश्वर स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली.

किशोरजींनी अवघ्या १५व्या वर्षी गीतेवर प्रवचने आणि १७व्या वर्षी भागवत कथा सांगायला सुरुवात केली. गेली ५५ वर्षे हा ज्ञानप्रसार अखंड चालू आहे. गीता-भागवताबरोबरच, श्रीराम कथा, महाभारत, वेद, योगवासिष्ठ, देवी भागवत, शिवपुराण, ज्ञानेश्वरी या विषयांवरही कथा-प्रवचने चालतात. दासबोध, संतश्री गुलाबराव महाराज, श्रीरामकृष्ण, विवेकानंद, वेदान्त, संतचरित्रे आणि भारतीय तत्त्वज्ञान हे त्यांचे अन्य कथाविषय आहेत. संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, मारवाडी या भाषांमधून देश-विदेशात त्यांचे सुमारे १५०० कार्यक्रम झालेले आहेत. भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, नेपाळ येथे प्रवचने सादर होतात. या ज्ञानदानातून मिळणारी सर्व दक्षिणा ‘मवेप्र’ आणि अन्य न्यासांमार्फत धर्मसेवेसाठी व्यतीत केली जाते. एका व्यक्तीच्या द्वारे केवढे उत्तुंग कार्य केले जाऊ शकते, याचे स्वामी गोविंददेव हे केवळ अपवादात्मक, आदर्श असे उदाहरण आहे. योग, शिक्षण, समाजकार्य, अध्यात्म, मूलभूत संशोधन आदि क्षेत्रांत अशा त्यागमूर्ती ऋषितुल्य लोकांमुळेच आपल्या देशाची मान जगात उंचावलेली आहे. मला १९९८ ते २००० या काळात स्वामीजींबरोबर त्यांचा प्रकाशन विभाग सांभाळण्याची संधी मिळाली. त्याच वेळी अनेक कथांना उपस्थित राहता आले. तसेच, वेदव्यास प्रतिष्ठानाच्या ‘वेदामृतम्’ या दशवार्षिक विशेषांकाचे संपादन आणि निर्मितीमध्ये सहयोग देता आला.    

सन २००८मध्ये श्री क्षेत्र नामलगाव (ता. जि. बीड) येथे श्री गणेश समन्वय आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील सर्व जातिधर्मांच्या, तसेच आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय तेथे करण्यात आलेली आहे. मुलांना सुसंस्कारित करून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित व्हावी; त्याचबरोबर त्यांचे वैचारिक व सांस्कृतिक उत्थान होऊन राष्ट्रभक्ती वृद्धिंगत व्हावी, ही तिथल्या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय तिथे आहे.  

वेद, उपवेद, वेदांगे आणि आनुषंगिक विद्याशाखांच्या अभ्यासासाठी आळंदी येथे १५ एकर जागेवर ‘वेदश्री तपोवन’ या नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वविद्यालय स्थापन करणे, ही प्रतिष्ठानाची आगामी मोठी योजना आहे. त्याच्या कामाला वेगाने प्रारंभही झाला आहे. वैदिक जीवनपद्धतीचा प्रसार तेथून केला जाईल. एक अद्ययावत समृद्ध ग्रंथालय हे तेथील एक वैशिष्ट्य असेल. सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात सुरू होणाऱ्या या वैश्विक वेद-केंद्रात योग, ध्यान यांची शिबिरे आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होत राहतील. तेथे १२० अध्यापक आणि विद्यार्थ्यांची निवासाची सोय असेल. वैदिक वस्तुसंग्रहालय, वाचनकक्ष, संगणक विभाग, गोशाळा, यज्ञशाळा, पुष्करिणी, ध्यानमंडप, संगीतकक्ष, विस्तीर्ण सभागृह, भोजनगृह, इत्यादी विभागांनी ‘तपोवन’ समृद्ध असेल. डिसेंबर २०१९मध्ये पहिल्या अभ्यासक्रमांना सुरुवात होईल.

महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानाच्या विविध प्रकल्पांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास पुढील पत्त्यावर संपर्क साधावा :
धर्मश्री, मानसर अपार्टमेंटस, पुणे विद्यापीठ मार्ग, सूर्यमुखी दत्तमंदिराजवळ, पुणे – ४११०१६
फोन : (०२०) २५६५२५८९, २५६७२०६९
ई-मेल : dharmashree123@gmail.com
वेबसाइट : www.drarmashree.org

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
वर्षा देवकर About 77 Days ago
महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान, परमपूज्य स्वामी जींची आणि त्यांच्या उत्तुंग कार्याची अतिशय समर्पक माहिती या लेखातून होते आहे ! अभिनंदन !
0
0

Select Language
Share Link