Next
उलगडला कन्याकुमारी-लेह सायकलस्वारीचा रोमांचक प्रवास
भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनतर्फे प्रा. वासंती जोशींचा सत्कार
BOI
Monday, August 13, 2018 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

सत्कारप्रसंगी (डावीकडून) जयंत जोशी,विश्वास जोशी, शुभदा जोशी, वासंती जोशी, डॉ. सतीश देसाई आदी

पुणे : ‘उमलिंग ला ही खिंड समुद्रसपाटीपासून १९ हजार फूट उंचीवर आहे. तेथे जायला लष्कराच्या मदतीने परवानगी  मिळाली. हा जगातील सर्वांत उंचावरील वाहनमार्ग आहे. तेथे पोहोचणारी मी पहिली भारतीय महिला सायकलस्वार ठरले.’ हे प्रा. वासंती जोशी यांचे वाक्य ऐकताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रा. वासंती जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाला, जिद्दीला, तळमळीला पुणेकरांनी मनापासून सलाम केला, मन:पूर्वक दाद दिली. 

‘भीतीवर मात करा’ (काँन्करिंग दी फीअर) हा संदेश घेऊन ‘कन्याकुमारी ते लेह’ (K2L) अशी सायकल सफर यशस्वीपणे करणाऱ्या प्रा. वासंती जोशी यांचा भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रा. सुप्रिया अत्रे यांनी वासंती जोशी यांची मुलाखत घेतली. या मोहिमेतील अनुभवांचे दृक-श्राव्य स्वरूपातील सादरीकरणही झाले. प्रा. वासंती जोशी यांच्याबरोबर या मोहिमेत ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स्’च्या संचालिका शुभदा जोशी, केतकी जोशी, गायत्री फडणीस-परांजपे याही अन्य व्यवस्थांसाठी सहभागी झाल्या होत्या. प्रा. वासंती जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे थरारक अनुभव ऐकताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. 

वासंती जोशी म्हणाल्या, ‘सायकलिंग, एंड्युरो स्पर्धा अशा अनुभवातून तयारी झाली. एरव्ही महिलांना अशा मोहिमांत सामावून घेतले जात नाही, ही मोहीम पूर्णपणे महिलांची होती. सर्वांनी सायकल दुरुस्तीपासून चारचाकीच्या दुरुस्तीपर्यंत सर्व गोष्टी शिकून घेतल्या.’

‘मोहीम ठरवल्यावर मी दररोज दीडशे किलोमीटरपर्यंत सायकलिंगचा सराव केला. २८ मे रोजी वीर सावरकर जयंतीला कन्याकुमारी येथून निघून, महर्षी कर्वे संस्थापक असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापनादिनी, पाच जुलैला लेहला पोहोचायचे नियोजन होते. ही ३६ दिवसांची मोहीम होती. या प्रवासात क्रॉस बाइक प्रकारातील मेरीडा सायकल वापरली. उन्हाळा, बर्फ, पाऊस अशा सर्व प्रकारच्या हवामानातून आम्ही प्रवास केला. विश्रामगृह, हॉटेल, घरे, तंबू अशा ठिकाणी उपलब्धतेनुसार राहत गेलो. लेहला जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तो संस्मरणीय क्षण ठरला. उमलिंग ला ही खिंड १९ हजार फुटांवर आहे. हा जगातील सर्वांत उंचावरील वाहन मार्ग आहे. तेथे पोहोचणारी मी पहिली भारतीय महिला सायकलस्वार ठरले. मनालीनंतर सायकलिंगचा कस लागला. खारदुंग ला नंतर ऑक्सिजन विरळ झाल्यावर सायकलिंगमुळेच कमी त्रास झाला,’ असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. 

शुभदा जोशी म्हणाल्या, ‘गाडी चालवण्याची आवड असल्याने या मोहिमेत मी सहभागी झाले. पुणेकरांच्या प्रेमाचा अनुभव आला. खाऊचे इतके डबे आले, की डिकीत जागा उरली नाही. रोजचे अनुभव ब्लॉगवर लिहीत गेलो. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. इतक्या प्रवासात ‘पाय दुखतात’ अशी तक्रार वासंती जोशी यांनी कधीही केली नाही. पायात जणू मशीन बसवल्याप्रमाणे वासंती यांनी सायकल चालवली. एरव्ही आपण जे जेवतो तेच त्या  खात होत्या. एनर्जी बार, प्रोटीनचे डबे वगैरे डाएटमध्ये नव्हते.’

‘कुरुक्षेत्रला एका गावकऱ्याला रस्ता विचारल्यावर, ‘तुम्हारे ड्रायव्हर, मर्द को बताऊंगा’ असा हट्ट धरला. तेव्हा ‘हम ही ड्रायव्हर है, और हम ही मर्द है’ असे सांगावे लागले,’ असा अनुभवही शुभदा जोशी यांनी सांगितला. 

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. सतीश देसाई, विश्वास जोशी, जयंत जोशी यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(या मोहिमेविषयीची संपूर्ण माहिती आणि मोहिमेपूर्वीची वासंती जोशी यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(प्रा. वासंती जोशी यांच्या सत्काराचा आणि मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swarada Ranade About
Great job..we r proud of u. Vasanti! Tumche anubhav aikayala khup avdel ..tyavar tumhala pustak hee lihita yeil , mhanje amhala tumche anubhav vachata yetil ! Again.. hearty congrats..👌👌👍👍🌹🌹
0
0

Select Language
Share Link
 
Search