Next
जिराफवेडा तुषार...
BOI
Thursday, November 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जगातला सर्वांत उंच प्राणी असलेल्या जिराफाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं; पण ठाण्यातल्या तुषार कुलकर्णी या तरुणाने मात्र ते कुतूहल शमविण्यासाठी त्यांचा अभ्यास सुरू केला आणि जिराफांनी त्याला झपाटूनच टाकलं. त्याचा जिराफांसंदर्भातील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडला गेला. युगांडा आणि अमेरिकेतही त्याला या विषयावर काम करता आलं. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जिराफवेड्या तुषारची गोष्ट...
.............
खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक जिराफ राहत होता. त्या काळी जिराफांची मान आताच्या जिराफांसारखी लांबच लांब आणि उंचच उंच मुळीच नव्हती. हरीण, कोल्हा अशा इतर प्राण्यांप्रमाणेच तोही साधारण दिसणारा प्राणी होता. एकदा असाच जंगलात फिरत असताना जिराफ आपला रस्ता चुकला आणि मग इथे तिथे वाट फुटेल, तसा चालत सुटला. अखेर जिराफ थकून गेला. त्याला खूप भूक लागली होती. आसपास जेवायला काहीही दिसत नव्हतं. जिराफाला हिरव्यागार पानांनी बहरलेलं एक झाड दिसलं. या झाडाचा पाला खाऊन त्याची भूक भागणार होती; मात्र ते झाड इतकं उंच होतं, की जिराफाला त्या पानांपर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. मग जिराफानं उभं राहून आपले पाय आणि मान उंचावली; पण तरीही त्या पानांपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. तास-दोन तास जिराफ प्रयत्न करत राहिला आणि अखेर डोळ्यांत अश्रू आणून परमेश्वराची प्रार्थना करत राहिला. आकाशातून विहार करत असलेल्या देवाला जिराफाच्या डोळ्यांतले अश्रू आणि भुकेनं कासावीस झालेला चेहरा दिसला. त्यानं जिराफाला ‘तथास्तु’ म्हणून वर दिला. परमेश्वराच्या वराप्रमाणे क्षणार्धात आश्चर्य घडलं. त्या उंच झाडाची पानं जिराफाच्या तोंडी लागली. जिराफानं आनंदानं पोटभर पानं खाल्ली, परमेश्वराचे आभार मानले आणि तृप्त मनानं ढेकर दिली. नेमका काय चमत्कार घडला, याचा विचार करताना त्यानं तळ्यात आपलं प्रतिबिंब बघितलं, तर काय? लांबच लांब आणि उंचच उंच झालेली आपली मान जिराफाला दिसली. आपण इतर प्राण्यांपेक्षा डौलदार आणि वेगळे दिसतो आहोत आणि आता तर भुकेची चिंताही मिटली, हे लक्षात येताच जिराफ खूश झाला आणि तेव्हापासून जिराफाची मान उंच झाली ती आजतागायत!.... जिराफाची अशी गोष्ट लहानपणी ऐकली होती. बस्स, तितकीच जिराफाची माहिती होती. मग कधी तरी प्राणिसंग्रहालयात जिराफाला बघितलं होतं तितकंच! 

खरं तर जिराफाची ही गोष्ट तुषार नावाच्या तरुणानंदेखील लहानपणापासून ऐकली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ भागात २२ ऑगस्ट १९७६ या दिवशी तुषारचा जन्म झाला. त्याचं सगळं शिक्षण ठाण्यातलं ए. के. जोशी हायस्कूल आणि नंतर एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स इथं झालं. १९९६ साली त्यानं वाणिज्य शाखेतली पदवी घेतली. कॉर्पोरेट क्षेत्रात छानशी नोकरीही त्याला मिळाली. इथपर्यंत एका चौकटीतलं आयुष्य व्यवस्थितपणे चाललं होतं. शास्त्रीय संगीत ऐकणं आणि योगासनं करणं यांची गोडी त्याला याच काळात लागली; मात्र एके दिवशी चक्क जिराफ आपल्या आयुष्यात अचानक प्रवेश करील आणि आपलं सगळं आयुष्य व्यापून टाकील, याची कल्पनाही तुषारनं कधी केली नव्हती. 

इतरांप्रमाणेच तुषारलाही वरच्या गोष्टीव्यतिरिक्त जिराफाविषयी फारशी माहिती नव्हतीच; मात्र टीव्हीवर बघत असताना त्याला जिराफ हा जगातला सगळ्यात उंच प्राणी असल्याचं समजलं. तसं फावल्या वेळात त्याला नॅशनल जिऑग्रॉफिक चॅनेल बघायला खूप आवडायचं. हे जग काही वेगळंच आहे, असं त्याला वाटायचं. तो तासन् तास त्यात रमायचा. या चॅनेलमुळेच तुषारमध्ये प्राण्यांविषयीची आवड निर्माण झाली. विशेषतः जिराफ या प्राण्याविषयीची!जिराफ हा शब्द अरेबिक आहे. जराफा याचा अर्थ जोरात चालणारा असा आहे. या प्राण्याला काय म्हणायचं हे पूर्वी रोमन्स आणि ग्रीक्स यांना कळायचं नाही. त्यामुळे त्यांना हा प्राणी म्हणजे उंट आणि लेपर्ड असं कॉम्बिनेशन वाटायचं. 

दरम्यान, तुषारनं आफ्रिकेतल्या जिराफ कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे संचालक डॉ. ज्युलियन फेनेसी यांनी जिराफांवर लिहिलेलं पुस्तक वाचलं. त्याच्या मनातलं जिराफांविषयीचं कुतुहल आणखीच वाढीला लागलं. मग इंटरनेट आणि पुस्तकं यांच्या मदतीनं त्याचा जिराफांवरचा अभ्यास सुरू झाला. जिराफांशी मैत्री करणाऱ्या तुषारला योगासनं आणि शास्त्रीय संगीताची आवड आहे.

जिराफांचा अभ्यास सुरू केल्यावर तुषारला त्या विषयाने संपूर्णपणे झपाटूनच टाकलं. तुषारनं जिराफांच्या वर्तनाचा अभ्यास केला. प्राणिसंग्रहालयातल्या जिराफांना सतत भिंती चाटताना त्यानं बघितलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की जंगलामध्ये जिराफ त्यांची जीभ झाडावरची पानं तोडण्यासाठी वापरतात. इथं त्यांना ट्रेमध्ये पानं दिली जायची. त्यांना आपल्या जिभेचा वापरच करता यायचा नाही. त्यामुळे त्यांच्यात ‘अॅबनॉर्मल बिव्हेविअर’ सुरू झालं होतं. तुषारनं त्यावर अभ्यास करून एक पेपरही लिहिला. हा प्रश्न कसा सोडवण्यासाठी त्यानं जिराफाच्या उंचीवर एक मोठी बरणी ठेवून त्याला मोठं छिद्र केलं आणि त्यांचं अन्न असलेला पाला आत ठेवला. त्यामुळे जिराफाला आपली जीभ वापरून तो आतला पाला मिळवणं सुकर झालं; मात्र त्या बरणीत जीभ घालून ते एक एक पान मिळवायला त्याचे दोन तास जायला लागले. आधी त्याचं पाच मिनिटांत खाऊन व्हायचं. आता मात्र त्याच्या जिभेला व्यायाम होऊन खाण्याची क्रिया होत असल्यानं त्याच्या भिंती चाटण्याच्या वर्तनात बदल झाला. त्याचा ताण कमी झाला. जिराफ हा जगातला सगळ्यात उंच आणि लांब मानेचा प्राणी. त्याची जीभ १९ इंच लांब असते. तिच्या टोकाला गडद रंग असतो. आफ्रिकेतल्या उन्हात त्याला तो रंग ‘सनबर्न’पासून वाचवतो. जिराफाची मान सहा फुटापर्यंत लांब असते; मात्र माणसाच्या आणि त्यांच्या मानेतल्या मणक्यांची संख्या मात्र एकसारखीच म्हणजेच सात असते. त्यांच्या त्वचेवर पॅचेस असतात. प्रत्येक जिराफाच्या शरीरावरचे पॅटर्न कधीच एकसारखे नसतात. आपल्या अंगठ्यावरचे ठसे जसे वेगवेगळे असतात तसंच. जणू काही जिराफांसाठीचं ते आधारकार्ड!शिकागो इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जिराफांच्या वर्तनावरचा त्याचा पेपर प्रसिद्ध झाला. तसंच उत्तर युगांडामध्ये जिराफांच्या सर्वेक्षणात त्यानं सहभाग घेतला. तो सध्या युगांडा आणि अमेरिकेतल्या जिराफांचा अभ्यास करतोय. तुषार अमेरिकेमध्ये गेला असताना जिराफ कसा जन्मतो हे त्याने प्रत्यक्ष बघितले. त्याच्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता. जिराफाच्या बाळाला तपासणीसाठी आणलं गेलं, तेव्हाचा अनुभवही तुषारला खूप लक्षात राहण्याजोगा होता. जिराफाचं एक दिवसाचं बाळ घट्ट पकडून ठेवायचं होतं. पाच लोक त्याला धरण्यासाठी कमी पडत होते. तुषार २०११मध्ये युगांडामध्ये गेला. तिथे वाइल्डलाइफ एज्युकेशन सेंटरच्या सेमिनारमध्ये सहभागी होण्याची संधी तुषारला मिळाली. तिथे त्याला जिराफांबरोबर राहण्याची इच्छाही पूर्ण करता आली. जिराफांचा रोजचा दिनक्रम न्याहाळणं, त्यांचं आरोग्य, खाणं बघणं, जेवण तयार करणं हे सगळं तुषार त्या वेळी करायचा. जिराफांना खायला देण्यासाठी त्यांचं खाणं हे त्यांच्या डोक्याच्या उंचीवर ठेवावं लागतं हे तुषारनं बघितलं. अन्यथा त्यांना खाताच येत नाही. जिराफांच्या अंगावरील पॅटर्नमुळे ते जंगलात लपू शकतात, ते लपलेले कळतही नाहीत, इतका त्यांचा पॅटर्न जंगलाशी मॅच होतो. आपल्या बाळाच्या बाबतीत मादी जिराफ खूपच जागरूक असतात. आपल्याच नव्हे, तर आपल्या कळपातल्या सगळ्याच बाळांकडे त्या लक्ष देतात. आळीपाळीनं पिल्ल्लांकडे लक्ष देण्याचं काम त्या माद्या करतात. त्यांना आणि त्यांच्या पिल्लांना सिंहापासून धोका असतो. स्वतः जिराफ मात्र कोणावरही आपणहून विनाकारण आक्रमण किंवा हल्ला करत नाहीत. मूलतः जिराफ अतिशय नम्र असतात. त्यांच्या आकारावरून त्यांच्या शक्तीचं मोजमाप करता येत नाही. कारण ते मोठे आहेत म्हणजे शक्तिशाली आहेत आणि आपल्या शक्तीचा उपयोग इतरांना नामोहरम करण्यासाठी करताहेत, असं चित्र जिराफांच्या बाबतीत मुळीच दिसत नाही. सिंहानं त्यांच्यावर हल्ला केला, तर ते लाथ मारून त्याला प्रत्युत्तर देऊन त्याच्यावर उलट हल्ला करतात; मात्र फारच धोका असेल, तरच ते तसं करतात. त्यांच्याकडे नेहमीच शरणागत भाव असतो. जिराफ अतिशय शांतताप्रिय प्राणी आहेत. माणसांनी दिलेल्या सूचना त्यांना समजतात. ते माणसाळलेही जातात; मात्र त्यांना स्वतःला आवाज करून बोलता येत नाही. ते नेहमीच कळपानं राहतात. सध्या भारतातल्या जिराफांचं बारकोडिंग करायचं काम तुषार करतोय. जिराफांच्या जाती कोणत्या आहेत यावर त्याचा अभ्यास सुरू आहे. २०१८मध्ये तुषार आफ्रिकेत गेला असताना त्यानं तिथल्या २५ जिराफांवर काम केलं. त्यांचे रक्ताचे नमुने घेणं, त्यांच्या शरीराची मोजमापं घेणं, त्यांच्या शरीरावर सॅटेलाइट कॉलर बसवणं अशी अनेक कामं त्यानं केली. खरं तर जिराफाला पकडणं, हीदेखील खूप नाट्यमय गोष्ट असते, जिराफाला पकडण्याचा अनुभव विलक्षणच असतो. कुठल्याही प्राण्याला जाणून घेताना, त्याचा अभ्यास करताना आधी त्या त्या ठिकाणी आपण व्हॉलंटीअर म्हणून काही काळ काम करावं, असं तुषार म्हणतो. स्वानुभव आणि स्वअभ्यास खूप महत्त्वाचा असतो असं त्याचं मत आहे. इंटरनेटची सुविधा आज आपल्याला सहजपणे उपलब्ध असल्यामुळे आपण जिराफ आणि आपल्या आवडणाऱ्या प्राण्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करू शकतो. याबाबतीत माहिती शोधताना आपण इतरांशी संवाद साधायला हवा. म्हणजे मार्ग सापडतो, शोधता येतं असं तुषार म्हणतो. इंटरनेटच्या सुविधेमुळे आपण जगातल्या कोणाही तज्ज्ञ व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आणि खूप अभ्यास करू शकतो. अपयश आल्यावर धीर सोडण्यापेक्षा प्रयत्न करत राहावेत आणि संयमानं काम करावं, असं तो म्हणतो. ‘जिराफाला बोलता आलं असतं, तर त्याला मी मनापासून धन्यवाद दिले असते. जिराफाकडून काही घ्यायचं असेल, तर ‘आकाशाला भिडायचं, पण त्याच वेळी पाय मात्र जमिनीवर रोवून उभं राहायचं’ हे शिकावं आणि मी ते शिकण्याचा प्रयत्न करतोय,’ असं तुषार म्हणतो. आपल्याला दिवसाचे २४ तासही जिराफांच्या सहवासात राहायला मिळाले तरी आवडेल, असं तुषारला वाटतं. फक्त माणसांविषयीच नाही तर प्राण्यांविषयीची आस्था, आपुलकी, प्रेम याबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी तुषारनं हाती घेतलेलं काम खूप मोठं आहे. निसर्ग परस्परावलंबनाचं तत्त्व शिकवतो. आपण मात्र स्वार्थापोटी सगळंच विसरत चाललो आहोत. या जगावर जेवढा आपला हक्क आहे, तितकाच तो किड्या-मुंगीपासून ते हत्ती, जिराफ अशा प्राण्यांपर्यंत सर्वांचाच आहे. जागेसाठी आपण जंगलं नष्ट करत आहोत. प्राण्यांच्या वास्तव्यावरच आपण गदा आणतो आहोत. अशा वेळी त्यांनी राहायचं कुठे आणि जायचं कुठे? आज माणूस आणि वन्य प्राणी असे सरळ सरळ दोन गट पडले असून, जिराफांसारख्या वन्य प्राण्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणं, हा चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या या अतिरेकी अतिक्रमणातूनच मग एखादा प्राणी मनुष्यवस्तीत शिरतो आणि भीतीनं म्हणा, किंवा कुठल्याही कारणानं आम्ही त्याची हत्या करायलाही मागे-पुढे पाहत नाही. इतकंच नाही, तर त्या हत्येचं समर्थनही आम्ही करतो. अशा वेळी तुषारसारखे काही मोजके लोक आपलं पूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी देतात, त्यांचा अभ्यास करतात, त्यांची संख्या अबाधित राहावी, यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात.गेल्या ३० वर्षांत जगातले एकूण जिराफ ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत. २५ वर्षांपूर्वी जगात एक लाख ५३ हजार जिराफ होते. आज मात्र जगातला सगळ्यांत उंच असलेला, मोठा प्राणी जिराफ धोक्यामध्ये आला आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. भारतात फक्त २५ ते ३० जिराफ असून, तेही प्राणिसंग्रहालयातल्या पिंजऱ्यांमध्ये कैद आहेत. भारतातल्या जंगलांमध्ये एकही जिराफ आढळत नाही. जिराफ हा मुख्यत्वे आफ्रिकेच्या जंगलात आढळून येणारा प्राणी आहे; मात्र आफ्रिकेच्या जंगलांत राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात जिराफाचं मांस हे खूप स्वादिष्ट अन्न समजलं जातं. इतकंच नाही, तर त्यांच्यात होणाऱ्या लग्नामध्ये वधू पक्षाकडून वर पक्षाला जिराफाचे केस देण्याची विचित्र प्रथा आहे. यामुळेही जिराफांना मारलं जातं.जिराफांची संख्या कमी होऊ नये, यासाठी तुषार प्रयत्नशील आहे. तुषारनं कोलकात्यामधलं अलीपूर आणि म्हैसूर इथल्या प्राणिसंग्रहालयातल्या जिराफांचा अभ्यास करून तिथल्या कर्मचाऱ्यांना जिराफांची निगा कशी राखावी याविषयीचं प्रशिक्षण दिलं. तिथल्या पर्यटकांनाही त्यानं जिराफाच्या वैशिष्ट्यांविषयी मौलिक माहिती देण्याचं काम केलं. जिराफांचा स्वभाव आणि त्यांच्यावरचा अभ्यास यातूनच तुषारनं ‘अॅनालिसिस ऑफ बिहेविअर अँड वेल्फेअर इन कॅप्टिव्ह रॉथचाइल्ड जिराफ’ या शीर्षकाचा एक शोधनिबंध लिहिला आणि तो आफ्रिकेतल्या जिराफ कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनला पाठवला. जगभरातून आलेल्या शोधनिबंधांतून पहिल्या ३० निबंधांमध्ये तुषारच्या निबंधाची निवड करण्यात आली. जिराफांवर काम करणाऱ्या जगभरातल्या अभ्यासकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी तुषारला निमंत्रण पाठवण्यात आलं. 

तुषारला जिराफांवरचा आणखी अभ्यास करण्यासाठी खरं तर पूर्ण वेळ देण्याची गरज आहे; मात्र आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सध्या तो एक खासगी नोकरीही करतो आहे. तुषारची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या जिराफाच्या अभ्यासासाठी आणि कामासाठी त्याला मनापासून सलाम!

संपर्क : तुषार कुलकर्णी - ९८६७१ ४११५२

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search