पुणे : ‘आज आपण केवळ पारंपरिक शिक्षणाकडे न पाहता, बदलत्या जीवनोपयोगी शिक्षणाची दारे ठोठावणे गरजेचे आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे समाजोपयोगी आणि चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे; तसेच विद्यापीठ हे प्रत्येक विद्याशाखांमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवणारे अभ्यासक्रम तयार करत आहे,’ असे उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या कांतीलाल शहा सभागृहात केरळ पूरग्रस्त मदतनिधी हस्तांतरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, महाविद्यायालाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, निरूपा कानिटकर, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘विद्यार्थी जेव्हा मोठा होतो तेव्हा विद्यापीठही आपोआप मोठे होत असते. आपण नुसते नोकरी शोधणारे न होता नोकरी देणारेही व्हावे’, असे आवाहनही डॉ. करमळकर यांनी या वेळी केले.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष भेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी, प्राध्यापक यांनी केरळ पुरग्रस्थासाठी मोठा निधी संकलित केल्याबद्दल आभार मानले; तसेच करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास केंद्र स्थापण्याबाबतचा मनोदयही व्यक्त केला.
या वेळी पाच लाखांचा निधी संकलनाचा धनादेश कुलगुरूंकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरूंच्या हस्ते पूजा माने, सानिया खान, प्रतिक्षा काळेबगा, निशिगंधा लिबोरे, स्वाती बधाले, जुई जांभुळकर, सुनीता बोंबले, धनश्री मुनोत, श्वेता ठोसर, आकांक्षा झवेरी, वैभवी परदेशी, महेश असवले आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख बीएस्सी विभागप्रमुख प्रा. स्मिता भेगडे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले यांनी केले. निरूपा कानिटकर यांनी आभार मानले. या वेळी संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.