Next
‘डेंगी, मलेरिया डासांची उत्पत्ती आढळल्यास कारवाई’
नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी महानगरपालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपायोजना केल्या जात आहेत. या तपासणी दरम्यान शासकीय प्रकल्प किंवा खासगी प्रकल्‍पाच्या ठिकाणी रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज (१९ जून २०१९) विधानपरिषदेत दिली.

मुंबईतील मेट्रो प्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी गढूळ पाण्यामुळे आजार पसरविणाऱ्या डांसाच्या उत्पत्तीबाबत सदस्यांनी उपस्थ‍ित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सागर बोलत होते. ते म्हणाले, ‘मुंबई शहर व उपनगरात सूरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनच्या एजन्सीने डास प्रतिबंधाच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’नेही स्वतंत्र यंत्रणा नेमली आहे. त्यांच्यामार्फत मलेरिया व डेंगी आजाराच्या रुग्णांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत असून, महापालिकेच्या इतर विभागांशी समन्वयाने वस्तीपातळीवर साथीच्या आजाराच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.’

‘आतापर्यंत डेंगी डासांची उत्पत्ती आढळलेल्या सोसायट्या, खासगी बांधकाम व्यावसायिकांसह आदी १५१ जणांना नोटीसा जारी केल्या असून, त्यांच्याकडून १४ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. मुंबई मेट्रो लाइन-थ्रीअंतर्गत स्थानकांच्या खोदकामा ठिकाणी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रत्येक स्थानकात आवश्यक क्षमतेच्या पंपांची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मुंबई महापालिका, मेट्रो प्रशासन व संबधित कंत्राटदार यांच्या समन्वयाने नियमितरित्या डास अळीनाशक फवारणी व धुम्र फवारणी करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रसंगी प्रत्येक सोसायटीतील लोकांचा मोहिमेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. 

एका उपप्रश्नाला उत्तर देताना सागर म्हणाले, ‘मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणात विधानभवन मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यात मलेरिया पसरविणाऱ्या ऍनॉफिलिस जातीच्या डासांची उत्पत्ती दोन ठिकाणी आढळून आली असून, या ठिकाणी किटकनाशक फवारणी करून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. या परिसरात महापालिकेमार्फत ताप सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरम्यान मलेरिया व डेंगीच्या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले नाही.’

‘काही दिवसांपूर्वी या भागातील गाडगीळ परिवाराला या आजाराची लागण झाल्याची घटना घडली होती. त्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, तशी लागण यापुढे कोणत्याही परिवाराला होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे; तसेच महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या पारिसरात रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक केली जाईल,’ असेही सागर यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी शरद रणपिसे, भाई गिरकर, हेंमत टकले, रामहरी रुपनवर आणि विद्या चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search