Next
फुटबॉलमधली रत्नपारखी : अंजू तुरंबेकर
BOI
Friday, April 27 | 06:45 AM
15 0 0
Share this story


शेती आणि मोठे कुटुंब यांचा चरितार्थ चालवणेसुद्धा ज्या घरात जिकिरीचे बनले होते, तिथे पालक अंजूला या खेळासाठी परवानगी देणे शक्यच नव्हते. ते त्यांच्या जागी बरोबरच होते; पण फुटबॉल खेळण्याची इच्छा अंजूला स्वस्थ बसू देत नव्हती. तिला फुटबॉलमध्ये तिचे भविष्य दिसत होते... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक अंजू तुरंबेकरबद्दल...
..............................................
अंजू तुरंबेकरखेळाच्या प्रेमापोटी आणि त्यात काहीतरी जगावेगळे करून दाखवण्याची महत्त्वकांक्षा बाळगून कोण काय काय करेल, हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना..! घरच्यांनी फुटबॉलमध्ये कारकीर्द करण्यासाठी विरोध दर्शवला, म्हणून अंजू तुरंबेकर या मुलीने चक्क घरातून पळ काढला. अथक परिश्रम केले, मेहनत केली आणि आज ती केवळ यशस्वी खेळाडूच नव्हे, तर ‘अ’ दर्जाची फुटबॉल प्रशिक्षकही बनली आहे.

गडहिंग्लजजवळील बेकनाळ हे अंजूचे गाव. या गावाचा आणि फुटबॉलचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही; पण अंजूचे शिक्षण सुरू असताना तिच्या शाळेत सूचना फलकावर लावलेली एक सूचना तिने वाचली. मुलींनाही फुटबॉल खेळण्याची संधी देणारी ती सूचना होती. त्याच क्षणी अंजूचा फुटबॉलशी पहिला संबंध आला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंजूला घरातून प्रचंड विरोध झाला. शेती आणि मोठे कुटुंब यांचा चरितार्थ चालवणेसुद्धा ज्या घरात जिकिरीचे बनले होते, तिथे पालक अंजूला या खेळासाठी परवानगी देणे शक्यच नव्हते. ते त्यांच्या जागी बरोबरच होते; पण फुटबॉल खेळण्याची इच्छा अंजूला स्वस्थ बसू देत नव्हती. तिला फुटबॉलमध्ये तिचे भविष्य दिसत होते.

मधल्या सुट्टीनंतर शाळेला दांडी मारून अंजू घरच्यांच्या नकळत ‘मास्टर्स स्पोर्टस् क्लास’मध्ये फुटबॉलचे धडे गिरवू लागली. फुटबॉलमध्येच कारकीर्द करायची असा निग्रहच तिने केला आणि बारावीनंतर पोलिस भरतीची परीक्षा देण्याच्या घरच्यांच्या आग्रहाला बळी न पडता, परीक्षेच्या वेळी अंजू चक्क पळून गेली. ती थेट पुण्यात आली आणि एका क्लबकडून फुटबॉल खेळू लागली. पुढे तिला मुंबईत आपले कसब दाखविण्याची संधी मिळाली. एकोणीस वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी ती मुंबईला गेली आणि आश्चर्य म्हणजे तिची निवडही झाली. 

खेळाडू म्हणून सराव करत असताना आणि खेळत असताना, आपण अन्य खेळाडूंना प्रशिक्षणही देऊ शकतो, असा विश्वास तिला मिळाला. या कामात तिला नामवंत प्रशिक्षक आणि ट्रेनर संतोष कश्यप यांनी मोलाचे सहकार्य केले आणि प्रोत्साहन दिले. मुंबईतील ‘मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन’ने तिला प्रथमच प्रशिक्षक बनण्याची संधी दिली.

गावातून पुण्याला आणि पुण्यातून मुंबईला असा प्रवास सोपा नव्हता. या सगळ्यांत सतत पैशांची चणचण भासायची. अशा वेळी ‘पुणे जिल्हा फुटबॉल संघटने’तील काही वरिष्ठ खेळाडू, पदाधिकारी, मुंबईतील पदाधिकारी यांची तिला मदत व्हायची. या सगळयांच्या पाठिंब्याच्या जोरावरच अंजूचा खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रवास सुरू झाला. मुंबईतील बस फाऊंडेशनकडे काही वर्षे काम केल्यावर तिला हॉलंड आणि इंग्लंड येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पदाचे अभ्यासक्रम करण्याची संधी मिळाली.

भुतानमध्ये झालेल्या ‘लेवल वन’ अर्थात ‘अ’ दर्जाच्या प्रशिक्षकपदाच्या परीक्षेत ती पास झाली. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी अंजू महाराष्ट्रातील पहिलीच तर भारतातील चौथी महिला प्रशिक्षक ठरली आहे. सध्या अंजू ‘अखिल भारतीय फुटबॉल महासंघा’च्या वतीने फुटबॉल खेळाचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार करण्याचे कामही करत आहे. एक महिला प्रशिक्षक असली तरी सर्व स्तरांवरील मुला-मुलींना ती प्रशिक्षण देते. याव्यतिरिक्त ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे एक वरिष्ठ प्रशिक्षक या नात्याने ती अन्य काही प्रशिक्षकांनाही प्रशिक्षण देते. ‘मिशन इलेव्हन मिलियन प्रोग्रॅम’ या उपक्रमाची ती तांत्रिक समिती प्रमुखही होती.

खेळाडू असताना तिने महाराष्ट्राचे कर्णधारपदही भुषवले होते.  खेळत असताना देशासाठी खेळण्याचे स्वप्न खरे तर प्रत्येक खेळाडूचे असते, मात्र अंजूचे स्वप्न थोडे वेगळे होते. केवळ खेळाडू न राहता प्रशिक्षक व्हायचे आणि नवोदित खेळाडूंमधून गुणवत्ता शोधायची, त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे व त्यातूनच देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू तयार करायचे. फुटबॉल हा आता केवळ पुरूषांचाच खेळ राहिलेला नाही, तर जागतिक स्तरावरदेखील महिलांचे फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने होतात आणि ते पाहायला मैदाने भरलेली असतात. तसे पाहायला गेले, तर इतर ठरलेल्या चार खेळांचे गुणगान आपणच करत असतो; पण आज जागतिक स्तरावर सर्वात जास्त पाहिला जाणारा, फॉलो केला जाणारा खेळ हा फुटबॉल आहे. ‘किंग ऑफ स्पोर्ट्स’ अशी सार्थ बिरूदावली मिरवणारा हा खेळ आहे. यातील स्टार कोणत्याही देशाचे असो त्यांचे चाहते सर्व जगभरात पाहायला मिळतात.

अंजू तुरंबेकर हे नाव आता भारतीय फुटबॉल क्षेत्रालाच नव्हे, तर जागतिक फुटबॉल क्षेत्रालाही नवे राहिलेले नाही. जागतिक किर्तीच्या अनेक वृत्तपत्रांनी, मासिकांनी तिची दखल घेऊन तिचे कौतुक केले आहे. अंजूच्या रूपाने भारताला किंबहुना जागतिक फुटबॉलला एक रत्नपारखी गवसला आहे. तिच्याकडून प्रशिक्षण घेत आज शेकडो मुले-मुली या खेळात दैदिप्यमान कामगिरी करत आहेत.

फुटबॉलच्या प्रेमाखातर घरातून पळून गेलेल्या मुलीबद्दल तिच्या पालकांनाही आज अभिमान वाटत असेल, की ज्यासाठी तिने घर सोडले ते तिने करून दाखवले, मिळवले आणि तेच एक ऋण म्हणून ती नवीन पिढी घडवत आहे. आता तिच्याकडून प्रशिक्षण घेतलेले किंवा घेत असलेले खेळाडू या खेळात किती उंची गाठतात, हेच पाहायचे आहे; पण एक गोष्ट मात्र नक्की अंजूच्या कर्तृत्वाला आणि तिच्या कारकिर्दीला प्रत्येक फुटबॉल चाहता सलामच करेल यात शंका नाही.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link