Next
‘जेष्ठांनी समाजातील दरी सांधण्याचे कार्य करावे’
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 03:33 PM
15 0 0
Share this story

‘दी स्टार सिनिअर्स’तर्फे औंध येथील पं. भीमसेन जोशी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी स्टार सिनिअर्स फेस्टिवल’प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर आणि जेष्ठ नागरिक.

पुणे : ‘जेष्ठ नागरिक असुया, स्पर्धा आणि द्वेष यापासून दूर राहिले, तर त्यांचे उर्वरित आयुष्य ते आरोग्यदायी आणि आनंददायी जगू शकतात. समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून जेष्ठ नागरिकांनी समाजोपयोगी कामात आपले योगदान देऊन समाजातील आहेरे आणि नाहीरे या वर्गांतील दरी साधण्याचे महत्वाचे काम करावे,’ असे आवाहन नगरसेविका माधवी सहस्रबुद्धे यांनी केले.

‘दी स्टार सिनिअर्स’ या संस्थेतर्फे औंध येथील पं. भीमसेन जोशी सांस्कृतिक भवन येथे ‘दी स्टार सिनिअर्स फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या चर्चासत्रांचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले होते. त्यामध्ये ‘डायपर टू होम’ या संस्थेचे संस्थापक सुभाष गुप्ते, सांगवी जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निंबाळकर, सिनिअर एक्स्प्रेसच्या संस्थापक डॉ. निधी मिश्रा, ‘सिल्वर इनिंग्ज’चे संस्थापक शैलेश मिश्रा, ‘हार्मोनी-सेलेब्रेटेज’ या मासिकाच्या कार्यकारी संपादिका आरती मेनन, ‘माया केअर’ या संस्थेच्या संस्थापक संचालक विद्या गोखले, ‘एएससीपी’चे उपाध्यक्ष मधुकर पवार, ‘एएससीपी’च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी पवार यांनी सहभाग घेतला.

कर्नल (निवृत्त) एस. जी. दळवी, कर्नल (निवृत्त) ए. श्रीधरन आणि लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) कुमार फुले यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’, पाणी बचत, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ याबद्दल माहिती देऊन जेष्ठ नागरिक या क्षेत्रात आपले योगदान कसे देऊ शकतात आणि अशा समाजोपयोगी कामात सहभागी होऊन उर्वरित आयुष्य कसे आनंददायी होऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘विशिष्ट वय झाल्यानंतर मला जगून काय करायचे असा विचार मनामध्ये येतो; परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने, प्रतिष्ठेने कसे जगायचे याचा मार्ग जेष्ठ नागरिकांनी शोधला पाहिजे. अनुवंशिकतेने मिळालेली तब्येत ही वयाच्या २५ वर्षापर्यंत पुरते; मात्र २५ ते ६० वयापर्यंत आपण जी हेळसांड करतो त्यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. ज्यांची तब्येत चांगली त्यांना भाग्यवान समजले पाहिजे; मात्र, या चांगल्या तब्येतीचा समाजासाठी उपयोग करता आला पाहिजे. जेष्ठत्वाचा पाया फार लहानपणी तयार व्हायला हवा. तसे झाल्यास वृद्धत्व ही कटकट वाटणार नाही. तरुणपणीच्या अनेक गोष्टी आपल्याला आठवतात; मात्र त्या आपण आयुष्यातून पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे घडलेल्या गोष्टींबद्दल जास्त खंत न करता वयाची दुसरी इनिंग जेष्ठांनी आनंदाने खेळली पाहिजे.’

‘जेष्ठ म्हणून दैनंदिन जीवन जगतात आपल्या कर्तृत्त्वाचा अनाठायी अभिमान मुलांना, नातवंडांना सांगत बसू नका. मोठेपणाची झूल उंबऱ्याच्या बाहेर ठेवा. उंबराच्या आत पती, पत्नी, सासू, सासरे, आजोबा या भूमिकेत वावरा, त्यामुळे घरातल्या गोष्टी खूप आनंदात होतील. जेष्ठ नागरिकांना काम करताना अनेक वेळेला निराशा आलेली असते; परंतु ती निराशा तात्कालिक असते. अनुभव त्यांच्या पाठीशी असतो त्यामुळे ते चांगले काम करू शकतात. आपण कोणत्या क्षेत्रात काम केले अथवा कुठल्या कामाचा अनुभव आहे त्यांचा वापर समाजोपयोगी कामासाठी करा किंवा नवीन क्षेत्राची माहिती घेऊन काम करा,’ असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

‘साधने किती, पैसा किती यापेक्षा समाधान किती हे २१ व्या शतकात महत्त्वाचे आहे. आहे त्यात समाधान मानले पाहिजे नाहीतर त्यातून अस्थिरता निर्माण होते हे पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे. अनेक घरांमध्ये अस्थिरता झिरपते आहे. यापासून दूर राहण्यासाठी सुरक्षा, सुबत्ता, संस्कृती आणि सहभाग या चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.

स्वागत व प्रास्ताविक ‘दी स्टार सिनिअर्स’चे संस्थापक डॉ. आश्विन नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्निग्धा देशमुख यांनी केले. आभार आशिष गुप्ता यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link