Next
परमेश्वराने डोळे सर्वांना दिलेत; पण दृष्टी ठराविक व्यक्तींनाच
ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे यांचे प्रतिपादन; लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कारांचे वितरण
प्रणित जाधव
Monday, June 24, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) चंद्रशेखर हलवाई, अॅड. एन. डी. पाटील, अंकुश काकडे, युवराज गाडवे, अॅड. शिवराज कदम जहागीरदार, भाग्यश्री पाटील, डॉ. सुचेता धामणे, डॉ. जयश्री कटारे, सकिना बेदी, मनीषा साठे, नीता भोसले, अशोक गोडसे, बी.

पुणे :
‘समाजातील प्रत्येक व्यक्तीला हृदय आहे; मात्र मन काही जणांनाच आहे, जे वंचित आणि गरजूंच्या भावना समजून घेऊ शकते. कान प्रत्येकाला आहेत; पण पीडितांचा आवाज काहींनाच ऐकू जातो. त्याचप्रमाणे परमेश्वराने डोळे सर्वांनाच दिले आहेत; पण समाजातील दु:खी, कष्टी वर्गासाठी कार्य करण्याची गरज असल्याची परिस्थिती बघण्याची आणि त्याप्रमाणे कार्य करण्याची दृष्टी ठराविक व्यक्तींनाच दिली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे यांनी केले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.  पुण्यातील शिवशंकर सभागृहात २३ जून रोजी हा कार्यक्रम झाला. यंदा हा पुरस्कार मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. सुचेता धामणे, स्वतः दृष्टिहीन असूनही दृष्टिहीनांकरिता कार्य करणाऱ्या सकिना बेदी व युवा क्रीडापटू ऋतुजा भोसले यांना प्रदान करण्यात आला. ऋतुजा भोसले पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकच्या तयारीकरिता स्पेनमध्ये असल्याने तिच्या वतीने हा पुरस्कार आई नीता भोसले यांनी स्वीकारला.

ऋतुजा भोसलेच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना आई नीता भोसले

या वेळी पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी. एम. गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अॅड. एन. डी. पाटील, चंद्रशेखर हलवाई आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘कलेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी आपण हाक द्याल तेव्हा आम्ही तत्पर असू,’ असे आश्वासन पं. साठे यांनी दिले.

या वेळी डॉ. कटारे म्हणाल्या, ‘राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्यापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील महिलांनी पुण्याला खूप काही दिले आहे. जीवनात केलेले कष्ट, त्या कष्टांची असलेली जाण आणि त्यातून साकारलेली स्वप्ने या गोष्टी आयुष्यभर आपल्यासोबत टिकून राहतात. सामाजिक क्षेत्रातील मंडळी समाजहितासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटतात. आम्हीदेखील शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो; मात्र जेव्हा आम्ही शासकीय कार्यालयातून बाहेर पडून या गोष्टी बघतो तेव्हा सामाजिक संस्था व व्यक्तींचे कार्य मोठे वाटते.’

‘अंधारमय जीवन जगणाऱ्या, समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रकाश दाखविण्याचे काम पुण्यातील अनेक संस्था व व्यक्ती करीत आहेत. त्यामध्ये महिलांचा वाटा मोठा असून, एखादी स्त्री स्वबळावर काय करू शकते याची अनेक उदाहरणे पुण्यात पाहायला मिळतात. त्यामुळे इतर महिला व मुलींनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा,’ असे भाग्यश्री पाटील म्हणाल्या.

पुरस्कार स्वीकारताना डॉ. सुचेता धामणे

पुरस्कारविजेत्या डॉ. सुचेता धामणे म्हणाल्या, ‘ज्यांच्या आयुष्यातील प्रकाशच हरवून गेला आहे, त्यांचे आयुष्य अर्थमय व्हावे, याकरिता आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. सामान्य व्यक्ती आपले स्वत:चे आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत असते; मात्र समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या महिलांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल उचलायला हवे. ‘जोपर्यंत भारतातील स्त्रियांची परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत भारत महासत्ता होणार नाही,’ असे स्वामी विवेकानंदांनी केलेले विधान अगदी योग्य आहे.’

आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली, हे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्या म्हणाल्या, ‘एकदा अहमदनगर महामार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला एक महिला निर्वस्त्र स्वरूपात दिसली. जवळ जाऊन पाहिले असता ती विष्ठा खात आहे असे आढळले. तेव्हाच मनात एक विचार आला, की ज्यांच्या जीवनाची दिशाच हरवली आहे अशा कितीतरी महिला आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तेव्हाच म्हणजे १९९८ साली आम्ही माऊली सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. एक-दोन जणांपासून सुरू झालेल्या या परिवारात आता ११० स्त्रिया आणि १९ बालके आहेत.’

पुरस्कार स्वीकारताना सकिना बेदी
सकिना बेदी म्हणाल्या, ‘दृष्टिहीन व्यक्तींचे आणि त्यात ती महिला असेल, तर जगणे खूप कठीण असते. ग्रामीण भागातील दृष्टिहीन विद्यार्थिनींची परिस्थिती तर अजूनच बिकट. त्यामुळे मी चार जानेवारी १९८९ रोजी दृष्टिहीन व्यक्तींसाठी शाळा स्थापन केली. त्या कार्याला आज यश येत असून, मदतीचे अनेक हात आमच्यासोबत आहेत. हे कार्य करण्यासाठी मला माझे पती आणि माझ्या दोन मुलींकडून सतत प्रेरणा मिळत असते.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले आणि शिरीष मोहिते यांनी आभार मानले. 

(डॉ. सुचेता धामणे  यांच्या भाषणाचा काही भाग सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search