Next
‘समाजस्वास्थ’ नाटक आता ‘यू-ट्यूब’वर
BOI
Thursday, July 19, 2018 | 05:38 PM
15 0 0
Share this story

पुणे : तब्बल शतकभरापूर्वी देशात ज्या विषयाची चर्चादेखील वर्ज्य होती, अशा संततिनियमनासारख्या विषयावर जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे समाजसुधारक रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ्य’ हे गाजलेले नाटक आता ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी सबटायटल्ससह हे नाटक रसिकांना पाहता येणार आहे. 

लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी र. धों. कर्वे यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या विषयांवर जनजागृती करण्यासाठी १५ जुलै १९२७ रोजी त्यांनी ‘समाजस्वास्थ’ नावाचे मासिक सुरू केले. या मासिकाला १५ जुलै २०१८ रोजी ९० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून ‘रधों’च्या कार्याचा वेध घेणारे आणि ‘नाटकघर’ संस्थेची निर्मिती असणारे ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सव्वा वर्षापूर्वी नाटककार अजित दळवी यांनी हे नाटक लिहिले आणि  रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शनासोबतच ‘रधों’च्या भूमिकेची जबाबदारी पेलत विविध ठिकाणी, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्याचे ७६ प्रयोग केले. आता हे नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यामातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, ते या लिंकवर उपलब्ध आहे.

याबाबत अतुल पेठे म्हणाले, ‘व्यक्ती व समाजाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करण्याच्या हेतूने ९० वर्षांपूर्वी १५ जुलै १९२७ ला प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ या बंडखोर पुरोगामी मासिकाची सुरुवात केली. स्वत:च्या पदराला खार लावून सलग २६ वर्षे चार महिने त्यांनी हे मासिक सातत्याने पराकोटीच्या निष्ठेने काढले. त्यातील अनेक लेख वादळी आणि वादग्रस्त ठरले. मासिकावर खटलेही भरले गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि लैंगिक स्वातंत्र्य या संदर्भातले हे महत्त्वाचे लढे होते. मासिकावरील दुसरा खटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रा. कर्वे यांच्या बाजूने लढले होते. या तेजस्वी लढ्यांवर बेतलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे गेल्या १६ महिन्यांत विविध गावांत आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत एकूण ७६ प्रयोग झाले. आता जगभर पसरलेले प्रेक्षक आणि अभ्यासकांसाठी ते आम्ही ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून खुले करीत आहोत.’

हे नाटक ‘यू-ट्यूब’वर अपलोड झाल्यापासून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक जणांनी पाहिले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link