Next
किसी का दर्द मिल सके तो ले उधार...
BOI
Thursday, March 28, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नंदा बराटेपुण्यातल्या कर्वेनगरमधलं नंदादीप हे पाळणाघर कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालवलं जातं. नंदा बराटे या महिलेनं १९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या पाळणाघराची कीर्ती आज सगळीकडे पसरलीय. मुलांना सांभाळण्यापासून शिस्त लावण्यापर्यंत आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नंदाताई आपुलकीनं करतात. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज नंदाताईंची प्रेरक गोष्ट...
............
एके दिवशी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी ती मला अचानक भेटली. साधी राहणी, चेहऱ्यावर सात्त्विक आणि प्रेमळ भाव, प्रसन्न चेहरा! त्या कार्यक्रमात माझ्यासारखीच तीही प्रमुख पाहुणी होती. तिच्याविषयी मला कुतूहल वाटू लागलं. ती काय करते हे लवकरच मुलाखतीद्वारे उलगडलं जाणार होतं. आणि काहीच वेळातच तिचा प्रवास माझ्यासमोर उलगडला गेला. मी थक्क झाले. त्यानंतर मात्र तिला भेटायची मला ओढ लागली. प्रत्यक्ष तिचं काम, तिची मुलं बघण्याच्या अनिवार इच्छेनं मी भर उन्हात तिच्या पत्त्यावर जाऊन पोहोचले. माझ्या स्वागतासाठी ती गेटमध्ये हसतमुखानं उभी होती - माझी नव्यानं झालेली मैत्रीण - नंदा बराटे!पुण्यातल्या कर्वेनगर भागात (काकडे पॅलेस) पिवळ्या रंगाची एक दुमजली इमारत दिसते. गेटवर झळकणारी पाटी तिथं नंदादीप पाळणाघर असल्याचं आपल्याला सांगते आणि आतली चिमुकल्या मुलांची किलबिल त्या पाटीला दुजोरा देतानाचं दृश्य बघायला मिळतं. आज शहरात सगळीकडेच पाळणाघरं असतात, त्यात काय विशेष, असं आपल्याला कोणालाही वाटेल; पण हे पाळणाघर विशेषच आहे! या पाळणाघराविषयी जाणून घेण्यासाठी नंदा बराटे या स्त्रीला जाणून घ्यावं लागेल.

नंदाचा जन्म एका सधन खात्या-पित्या घरात झाला. मोठं कुटुंब! घरात पाहुण्यांची ये-जा; मात्र घरात पुरुषप्रधान सत्तेचं वर्चस्व असल्यानं मुलांना वेगळे नियम आणि मुलींना वेगळे नियम होते. मुलांना सगळ्या सुविधा उपलब्ध आणि मुलींनी मात्र घरातली कामं करावीत आणि मोठ्यांच्या आज्ञा निमूटपणे पाळाव्यात असं वातावरण! अशा वातावरणात नंदा वाढत होती. मनात या भेदभावाविषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. एकाच घरातल्या मुलांमध्ये केवळ मुलगी असल्यामुळे दुजाभाव का, याचं उत्तर मिळत नव्हतं. नंदा या प्रश्नांना घेऊन मोठी होत होती. नंदा १६ वर्षांची झाली आणि तिच्या आई-वडिलांनी तिला न विचारताच तिचं लग्न ठरवलं. मुलगा तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठा होता. मुलाचं वय बघायचं नसतं, हे मनावर ठसलेला तो समाज होता. मुलगी उजवून टाकायची आणि आपलं ओझं हलकं करायचं इतकाच घरातल्यांचा उद्देश होता. नंदा सासरी आली. सासरी येताच एक कटू सत्य तिला समजलं. तिच्या सासरच्यांनी तिच्या नवऱ्याला असलेला कॅन्सर आणि त्याच्या अनेक व्याधींबद्दल तिला आणि तिच्या माहेरच्यांना अंधारात ठेवून हे लग्न केलं होतं. लग्न होताच अनेक अडचणींना तोंड देत नंदा दिवस काढू लागली. नवऱ्याची कॅन्सरची गाठ एकीकडे वाढत होती, इतरही त्रास त्याला चिडचिडं बनवत होते आणि त्याचं आजारपण काढतानाच एके दिवशी तो हे जग सोडून कायमचा निघून गेला. नंदा लग्नानंतर तीनच वर्षांत विधवा झाली. तिची रवानगी अर्थातच तिच्या माहेरी करण्यात आली. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह नंदाताईविधवा झालेली मुलगी पुन्हा घरात आल्यावर माहेरच्यांचा नाईलाज झाला होता; पण त्याचबरोबर दुसरीकडे एक बिनपगारी काम करणारी मोलकरीण आयतीच मिळाली होती. दिवसभर नंदाला कामाला जुंपण्यात आलं. तिचं दुसरं लग्न करावं असंही काही दिवसांनी तिच्या आई-वडिलांच्या आणि भावांच्या मनात आलं; पण तोपर्यंत नंदा कणखर बनली होती. आपण कष्टाला मागे हटणार नाही, पण आता दुसऱ्या लग्नाला, पुन्हा त्या कडवट अनुभवांना सामोरं जाणार नाही, असं तिनं निक्षून सांगितलं. तिला आता आयुष्यात पुन्हा कधी लग्न करायचं नव्हतं. नंदाच्या मोठ्या बहिणीनं नंदामधली चिकाटी, तिची शिक्षणाची आवड ओळखली होती. तिनं नंदाला आत्मविश्वास देऊन, पाठीवर थाप मारून तिला हिंगण्याच्या स्त्री शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून दिला. नंदाचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. तिनं तिथं बालवाडीचा कोर्स पूर्ण केला. काहीतरी करायची आस आता तिच्या मनाला लागली होती. तिनं सातवीपर्यंतच्या मुलामुलींच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. आता काही पैसे गाठीशी पडू लागले होते. कर्वे शिक्षण संस्थेत तिला नोकरीही मिळाली.

अशातच नंदाचा भाऊ निवडणुकीसाठी उभा राहिला. त्याच्या प्रचारासाठी अख्खं घर कामाला लागलं. नंदाही मागे नव्हती. एके दिवशी एका कच्च्या साध्या घरासमोर एक लहान, दोन-चार वर्षांचं मूल समोर ताटली घेऊन बसलेलं तिनं बघितलं. या ताटलीतल्या भाकरीचे तुकडे ते मूल आणि समोरून आलेला कुत्रा असं दोघंही खात होते. त्या मुलाकडे बघायला आसपास कोणीही नव्हतं आणि तो जिथे बसला होता, त्या घराला कुलूप लागलेलं होतं. नंदाला ते दृश्य बघवलं नाही. तिनं शेजारीपाजारी चौकशी करून आपण या मुलाला आपल्या घरी घेऊन जात आहोत, असं सांगितलं आणि पत्ता देऊन त्या पत्त्यावर त्याच्या आईला पाठवावं, असं सांगितलं. संध्याकाळी त्या मुलाची आई नंदाताईचं घर शोधत आली. आपलं मूल तिथे सुखरूप पाहताच तिचा जीव भांड्यात पडला; मात्र नंदाताईनं तिला इतक्या लहान मुलाला एकटं सोडून गेल्याबद्दलचा जाब विचारताच ती रडवेली झाली. ती म्हणाली, ‘मी लोकांकडे घरकाम करते. जिथे जाते, तिथे लहान मूल आणायचं नाही असं सांगतात. मग मी मुलाला ठेवायचं कुठे?’

ती बाई तिच्या बाळाला घेऊन गेली; पण नंदाच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं. मध्यमवर्गीय, नोकरी करणाऱ्या स्त्रिया बिनधास्तपणे आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवून जातात. त्या पाळणाघराची फीदेखील मोजतात. त्यांच्यासाठी तशा प्रकारच्या सुविधाही उपलब्ध होतात; पण इथं कसंबसं पोट भरणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या मुलांचं काय, त्यांची मुलं कोणाजवळ सोडायची, पाळणाघराचे पैसे देणं त्यांना परवडेल तरी कसं? रात्रभर नंदाला झोप लागली नाही. सकाळ होताच तिनं मनाशी एक निश्चय केला. घरात भावांजवळ आपला मनोदय बोलून दाखवला. नंदाच्या वडिलांनी बरीच जमीन घेऊन ठेवली होती. त्यातला एक प्लॉट नंदाला द्यावा, असं सगळ्या बहिणींनी भावांना सांगितलं. भावांनी नंदाच्या नावानं एक प्लॉट दिला. तिथं सुरुवातीला तिनं दोन खोल्या बांधल्या. या दोन खोल्यांमध्ये शिकवण्या सुरूच होत्या; मात्र आता नंदाच्या मनात वेगळं काही करायचं होतं. तिनं संपूर्ण वस्तीतल्या कष्टकरी बायकांची अवस्था बघितली. दिवसभर लोकांच्या घरची धुणीभांडी करायची आणि रात्री घरी आल्यावर दारू प्यालेल्या नवऱ्याचा मार खायचा. या सगळ्यात पदरी पडलेल्या मुलांकडे लक्ष द्यायला, त्यांच्या शिक्षणाचा विचार करायला त्यांच्याजवळ फुरसतच नव्हती. विचार केला, तरी त्यातून उपाय कसा काढायचा हेही त्यांना ठाऊक नव्हतं. 

नंदा या स्त्रियांना भेटली आणि तिनं धुणी-भांडी करणाऱ्या कष्टकरी स्त्रियांच्या मुलांसाठी नंदादीप नावाचं पाळणाघर सुरू केलं. सुरुवातीला २५ रुपये फी आकारली. तेवढीही द्यायला अनेक बायकांना जमायचं नाही; पण त्यासाठी नंदानं कधी सक्ती केली नाही. काम करणाऱ्या बायकांसाठी पाळणाघराची ही मोठी सोय झाली होती. त्या कामाला जाताना झोपेतून मुलाला उठवत आणि तसंच नंदाकडे नेऊन सोडत. त्या मुलानं तोंडदेखील धुतलेलं नसे. हळूहळू नंदानं या बायकांना शिस्त लावली. आंघोळ घातल्याशिवाय आपल्याकडे मूल सोडायचं नाही, असं स्पष्ट बजावलं. मग मुलं आंघोळ करून पाळणाघरात येऊ लागली. नंदा या मुलांची आईच झाली. मुलांना वळण लावणं, त्यांच्या तोंडच्या शिव्या घालवणं, त्यांना प्रार्थना शिकवणं, त्यांना जेवणाआधी हात धुवायला लावणं अशा कितीतरी गोष्टी तिला सुरुवातीला कराव्या लागल्या. मुलांना अशी शिस्तीत राहायची सवय नव्हती; पण नंदाच्या प्रेमानं ती मुलं तयार झाली. आज १९ वर्षं पूर्ण झालीत. नंदाचं नंदादीप पाळणाघर कर्वेनगरमध्ये सुरू आहे. नंदाकडे आज १०८ मुलं आहेत. काही मुलं पाळणाघरातली, तर काही बालवाडीत जाणारी, काही केवळ अभ्यासापुरती येणारी! ही मुलं बघितली, तर ही कष्टकऱ्यांची मुलं आहेत हे ओळखायलादेखील येणार नाही, असा कायापालट नंदानं त्यांच्यात केला आहे. यातल्या काही मुलांच्या कहाण्या मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. काहींची आई लहान बाळाला सोडून पळून गेलेली, तर काहींच्या घरात भांडणामुळे आईनं आत्महत्या केलेली, काहींच्या घरातल्या भांडणानं मुलं भांबावून गेलेली... प्रत्येकाची कथा वेगळी; पण आपल्या स्पर्शातून, आपल्या बोबड्या बोलांतून या कथा नंदाजवळ पोहोचतात. मुलांना आज नंदा आपली दुसरी आईच वाटते आणि नंदासाठीदेखील ही मुलं म्हणजे तिचं जग बनलं आहे. आज नंदाला तिथल्या परिसरातले लोक आदरानं नंदाताई म्हणतात. नंदाताईनं केवळ मुलांसाठीच नाही, तर पालकांसाठीदेखील नियमित बैठका घ्यायला सुरुवात केली. कुटुंबाचं महत्त्व, नातेसंबंधांचं महत्त्व, चांगल्या जीवनाची दिशा, बालसंगोपन, अडचणींवर मात करण्यासाठीचे मार्ग, यावर इथं संवाद घडत राहतो. आपली मुलं इथं सुसंस्कारित होताहेत, शिकताहेत आणि आपल्यालाही शिकायला मिळतंय, हे आता इथल्या पालकांना कळून चुकलंय. नंदाताई प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह भाड्यानं घेऊन तिथं या चिमुकल्यांचं स्नेहसंमेलन घेते. सगळे पालक, त्यांचे मित्र, त्यांचे नातलग आपल्या मुलांचं कौतुक बघायला नाट्यगृहात येतात. नंदाताईमुळे आज हे दिवस दिसताहेत, याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या डोळ्यांतला आनंद नंदाताईला अतीव समाधान देऊन जातो. नंदा बराटे आज खूप तृप्त मनानं जगते आहे. तिच्या कष्टानं तिचं यश समोर उभं आहे. तिचे भाऊ-वहिनी, नातलग आज अभिमानानं तिच्याबद्दल बोलतात. तिची भाची रोहिणी तिच्या कामात तिला हातभार लावतेय. नंदाताईकडे आज १६ बालवाडी शिक्षिका कामाला आहेत. इथे काही तरुण मुलीदेखील येऊन दिवसभर अभ्यास करतात. त्यांना कुठलीही फी आकारली जात नाही. झोपडपट्टीत राहून आपल्या मुलीला वाईट वळण लागण्यापेक्षा ती नंदाताईच्या डोळ्यासमोर असली तर बरं, असा विचार त्या मुलींचे पालक करतात. पुढला जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल, या प्रश्नाचं उत्तर देताना नंदाताई म्हणते, ‘मला हेच जगणं पुन्हा जगायला आवडेल. या निरागस मुलांनीच मला जगण्याची दिशा दाखवली आणि माझ्या जीवनात आनंद भरला. यापेक्षा दुसरं काहीच मला नकोय.’ नंदाताई बराटे यांच्यासारखी माणसं बघितली, की जगातल्या सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींवरचा विश्वास वाढतो. दुसऱ्यांच्या जगण्यात, त्यांच्या आनंदात आपलं जगणं शोधणारी नंदाताई बराटेसारखी माणसं खरोखरच विरळा! 

नंदाताईच्या पाळणाघराला कधीही जरूर भेट द्या. तिची हसरी, चुणचुणीत मुलं बघा, त्यांच्याशी संवाद साधा आणि आनंदाची ओंजळ भरलेले क्षण सोबत घेऊन परत या!

संपर्क : नंदा बराटे – ९३२६० ५८४७५

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 149 Days ago
How I wish , there were more.
3
0

Select Language
Share Link
 
Search