Next
पर्ल बक, शंकर रामाणी, कमलाबाई टिळक
BOI
Tuesday, June 26, 2018 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

साहित्याचं नोबेल मिळवणारी पहिली अमेरिकन लेखिका पर्ल बक, गोव्याच्या मातीतले कवी शंकर रामाणी आणि कथाकार कमलाबाई टिळक यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.....
पर्ल बक 

२६ जून १८९२ रोजी वेस्ट व्हर्जिनियामध्ये जन्मलेली पर्ल बक ही कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारी ती पहिली अमेरिकन लेखिका. वडिलांच्या मिशनरी सेवेमुळे तिची जवळपास चाळीस वर्षं चीनमध्ये गेली. त्यामुळे तिने तिथलं जीवन खूप जवळून पाहिलं होतं आणि त्या अनुभवांवर तिने पुष्कळ लिहिलं. अर्थातच तिला चिनी भाषा उत्तम येत होती. १९३० साली ‘इस्ट विंड वेस्ट विंड’ ही तिची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. पाठोपाठच आली ‘गुड अर्थ’ ही तिची दुसरी जबरदस्त कादंबरी. 

पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या चीनमधल्या एका खेड्यातल्या वँग कुटुंबाच्या जीवनावर तिने लिहिलेली ‘गुड अर्थ’ ही कादंबरी तुफान गाजली. वँग लुंग, त्याची बायको ओ-लान आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा. त्याचेच पुढे तिने आणखी दोन भाग लिहिले ते ‘सन्स’ आणि ‘ए हाउस डिव्हायडेड’ या नावांनी. ही त्रिधारा कादंबरी तिला १९३२ सालचं पुलित्झर पारितोषिक देऊन गेली आणि या कादंबऱ्या आणि इतर साहित्य यांमुळेच तिला पुढे १९३८ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ‘गुड अर्थ’ कादंबरीवर १९३७ साली ‘एमजीएम’ने पॉल म्युनी आणि लुइझ राइनरला घेऊन सिनेमाही काढला होता आणि त्याला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होती. पर्ल बकची जवळपास सत्तर पुस्तकं प्रसिद्ध झाली. 

सहा मार्च १९७३ रोजी तिचा अमेरिकेत मृत्यू झाला.
..........
शंकर रामाणी 

२६ जून १९२३ रोजी वेरे गावात (गोवा) जन्मलेले आनंद पांडुरंग ऊर्फ शंकर रामाणी हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर बोरकरांच्या काव्याचा प्रभाव होता. वयाच्या १४व्या वर्षापासून ते कविता करत होते. सुरुवातीला प्रकाश साप्ताहिकातून आणि नंतर ज्योस्ना, प्रतिभा, कला या मासिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत गेल्या.

पाऊस या त्यांच्या प्रसिद्ध कवितेतल्या काही ओळी -

‘पाऊस :
उटंगार घाटपायथ्याशी,
हिरवा कंच
झाडाझाडांतून निथळणारा
सतारीवर विद्युतलयीत
मल्हाराची धून
इथे-तिथे
उधळल्यासारखा.
पाऊस :
घाटमाथ्यावरचा
नि:शब्द
आहे-नाहीच्या पलीकडला
अनंतगर्भ
अवकाशाला मिठी घालून
रोमारोमांत
पालवणारा सर्वत्र.... 

आभाळवाटा, पालाण असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘निळे निळे ब्रह्म’ या त्यांच्या कोकणी काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 

२८ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांचं निधन झालं.

(शंकर रामाणी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

कमलाबाई विष्णू टिळक 

२६ जून १९०५ रोजी जन्मलेल्या कमलाबाई विष्णू टिळक या कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

मराठी साहित्यात स्त्रियांचं भावविश्व त्यांनीच सर्वप्रथम रेखाटलं होतं. 

हृदयशारदा, अश्विनी, आकाशगंगा, युधिष्ठिर, स्त्री जीवनविषयक काही प्रश्न, स्त्री जीवनाची नवी क्षितिजे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. दहा जून १९८९ रोजी त्यांचं निधन झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search