Next
पंतप्रधानांच्या हस्ते २५ रुसा प्रकल्पांचे डिजिटल उद्घाटन
BOI
Wednesday, February 06, 2019 | 01:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘भारतीयांचे जीवन सुसह्य आणि सुखकर होण्यासाठी केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. राष्ट्रावर कोणतीही आपत्ती किंवा कठीण परिस्थिती ओढावल्यास तत्परतेने एकमेकांना मदतीचा हात देऊन आपल्याला लाभलेल्या संसाधनांची जपणूक करणे ही भारताच्या प्रगतशील मार्गाची शक्ती आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नुकतेच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दुसऱ्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या कार्यक्रमांतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २५ ‘रुसा’ अंतर्गत प्रकल्पांचे अनावरण झाले. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दोनशे महाविद्यालयातील अंदाजे एक लाख विद्यार्थी डिजिटली, तर दोन कोटी पस्तीस लाख विद्यार्थी सोशल साईट्सद्वारा सहभागी झाले होते. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज येथे झालेल्या रुसा दोन प्रकल्पाच्या या डिजिटल उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, झेवियर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र शिंदे, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी पंतप्रधान म्हणाले, ‘आजच्या घडीला चीन आणि अमेरिकेनंतर भारत हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे स्टार्टअप असलेले राष्ट्र बनले आहे. मागील चार वर्षात भारतात पंधरा हजारांहून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून शहरासोबत ग्रामीण भाग तांत्रिकदृष्ट्या विकसित करण्याचा; तसेच भारतातील तरुणांच्या नवकल्पनांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रुसा कार्यरत आहे. रुसाच्या माध्यमातून जवळपास पावणेचारशे जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत. तसेच देशातील तरुण पिढीचा क्रीडा क्षेत्रात रस वाढावा; तसेच क्रीडा रसिक निर्माण होण्यासाठी केंद्र सरकार ‘खेलो इंडिया’ सारखे कार्यक्रम राबवत आहे.’ 

रुसा अंतर्गत ७० नवीन शासकीय महाविद्यालये, एक महिला विद्यापीठ, तसेच साठहून अधिक नवकल्पनांच्या उद्योगांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ त्याचप्रमाणे नंदूरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय महाविद्यालयाचे डिजिटल अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी विविध राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

विनोद तावडे
‘नोकरदार नाही, नोकरी देणारे बना’

‘आजच्या स्पर्धात्मक युगात सर्व काही झपाट्याने बदलत आहे. केवळ पदवीधर असणे पुरेसे नाही. पदवीसोबत अंगी कौशल्य असणे ही काळाची गरज आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाने तुम्ही स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकता; तसेच स्वतःला एक जबाबदार नागरिक म्हणून सिद्ध करू शकता,’ असे विनोद तावडे यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी झेवियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. सेंट झेवियर्स महाविद्यालयातील उद्योजकता सेल आणि कौशल्य केंद्राचे उद्घाटन तावडे आणि आमदार राज पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले.

‘शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. या संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायतत्ता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता योग्य प्रकारे अंमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधांकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियाना अंतर्गत (रुसा) आर्थिक साहाय्य देण्यात येते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link