Next
चविष्ट पदार्थांची मेजवानी
मानसी मगरे
Wednesday, January 31 | 09:53 AM
15 0 0
Share this story

साधे, सरळ, सोपे, पण उत्तम आणि चविष्ट पदार्थ घरच्या घरी बनवण्यासाठी ‘झटपट बनवा’ हे पुस्तक चांगले मार्गदर्शन करते. विशेषतः उपवासाच्या पदार्थांसाठी हे पुस्तक खास ठरते. व्यग्र दिनक्रमात नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या गृहिणींसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. त्या पुस्तकाचा हा परिचय...
...............
आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय व्यग्र दिनक्रम असणाऱ्या नोकरदार गृहिणींना घर आणि काम अशा दोन्ही पातळ्यांवर खरं उतरायचं असतं. अशा वेळी नित्यक्रम सांभाळून घरच्यांसाठी, मुलांसाठी त्यांच्या आवडीचे, नवीन नवीन पदार्थ घरी बनवणं हेदेखील जमावं लागतं. हे करण्यासाठी सुटसुटीत रेसिपी असलेलं एखादं पुस्तक हातात असेल, तर ते अधिक सोपं होतं. अशा वेळी उपयोगी ठरेल, यासाठीच‘झटपट बनवा’ हे पुस्तक प्रभा प्रभुणे यांनी लिहिलं आहे.

उपवासाचे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आणि विविध प्रांतांतील काही चविष्ट पदार्थ घरी बनवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. प्रभा प्रभुणे यांचं हे पहिलंच पुस्तक असलं, तरी वाचकांना नेमकं काय पाहिजे असतं याचा नीट अभ्यास करून त्यांनी हे लिहिलंय, असं लक्षात येतं. साधे, सोपे, सहजपणे, कमी खर्चाचे, घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांतून बनवता येणारे असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ यात दिले आहेत. यातील रेसिपी काही वाचून, काही स्वतःच्या मनाने, काही ओळखीच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अशा पद्धतीने एकत्र करून दिल्या आहेत.

शेव, चिवडा, चकली, धिरडी, थालीपीठ, वडे व भजी, लोणची, चटणी, रायते याचबरोबर कोकणी पदार्थ, गुजराती, राजस्थानी, कर्नाटकी, वऱ्हाडी, नागपुरी, सोलापुरी, मराठवाडी अशा विविध प्रांतांतल्या विविधरंगी पदार्थांची मेजवानी या पुस्तकातून मिळते. विशेष म्हणजे उपवासाचे गोड पदार्थ आणि इतर पदार्थ या विभागामध्येही जवळजवळ ५० पदार्थांचा समावेश आहे. काही नवे, हटके तर काही जुने, विस्मरणात गेलेले, पण चविष्ट पदार्थ, जे घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून अगदी पटकन व सहज होऊ शकतील, ते यात आहेत, हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे घरातल्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचायलाच हवं.

पुस्तक : झटपट बनवा 
लेखिका : प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे
प्रकाशक : सुकृत प्रकाशन 
पृष्ठे : ११८ 
मूल्य : १६० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link