लहान वयात लग्न झालं, की वय आणि जबाबदाऱ्या यांची सांगड घालताना दमछाक होते. यात मग मुलापेक्षाही मुलगी जास्त होरपळली जाते. सासरची लोकं, त्यांच्या आवडी-निवडी, घरातील काम हे सगळं सांभाळताना ती न सुटणाऱ्या ‘समायोजन समस्यां’ना सामोरी जात असते... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या ‘समायोजन समस्ये’बद्दल....
..........................................
२० वर्षांच्या शाल्मलीला घेऊन तिचे आई-वडील व तिचा नवरा भेटण्यासाठी आले. आल्यावर तिच्या वडिलांनी सर्वांची अगदी सविस्तर ओळख करून दिली. शाल्मलीचे वडील सरकारी खात्यात गेली अनेक वर्षं काम करत होते. तिची आई गृहिणी होती. तर तिचा नवरासुद्धा सरकारी खात्यातच नोकरीला लागला होता. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे शाल्मली जेमतेम १८ वर्षांची असताना घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं.

सुरुवातीचे काही महिने चांगले गेले, पण आता मात्र शाल्मली सारखी आजारी पडायला लागली. तिला सारखी चक्कर येते. तिची सतत अंगदुखी व डोकेदुखीची तक्रार असते. डॉक्टरांची औषधं घेतली, की तेवढ्यापुरतं बरं वाटतं. आठवडाभर बरं वाटलं, की पुन्हा त्रास सुरू होतो. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या, पण त्या सगळ्या नॉर्मल आहेत. परवा डॉक्टर म्हणाले, की तिच्या मनावर कसला तरी ताण असावा. ज्यामुळे तिला सतत हा त्रास होतो. कारण कोणत्याच शारीरिक आजाराचे निदान होत नसले, तरी तिला हा त्रास सारखाच होतो. त्यांनी सुचवले म्हणून आम्ही तिला समुपदेशनासाठी घेऊन आलोय. खरं तर तिला ताण जाणवावा असं काहीच नसल्याचं सगळे सांगत होते, पण तिला काय होतंय ते कोणालाही समजत नव्हतं.
सगळ्यांचं हे बोलणं सुरू असताना शाल्मली मात्र काहीच बोलत नव्हती. ती खुर्चीत अगदी शांत बसून होती. मधून-मधून घाम पुसत होती आणि पाणी पीत होती. तिचा चेहरा अगदी गंभीर होता. आल्यापासून ती एकदाही हसली नाही किंवा बोलली नाही. सर्वांबरोबर चर्चा करून इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतल्यावर यावर काही सत्रं घ्यावीत, असं ठरलं. सत्रांना सुरुवात केली. अर्थातच या सत्रात शाल्मली फारशी बोलली नाही. विचारलेल्या प्रश्नांची तिने मोजक्याच शब्दांत उत्तरं दिली. थोडा संवाद साधल्यावर हे सत्र थांबवून पुढच्या सत्राची वेळ निश्चित केली. ठरल्याप्रमाणे शाल्मलीचा नवरा तिला घेऊन आला. तिला आत सोडून, तो बाहेर थांबला. सत्राच्या सुरुवातीला ती शांतंच होती पण संवाद वाढत गेल्यावर व तिला विश्वास वाटायला लागल्यावर तिने हळूहळू बोलायला सुरुवात केली. पुढच्या तीन-चार सत्रांत तिच्याशी, तिच्या नवऱ्याशी व आई-वडिलांशी अशी सर्वांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं, की तिला ‘अॅडजेस्टमेंट प्रॉब्लेम’ म्हणजेच ‘समायोजन समस्या’ तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. ज्याचा परिणाम शारीरिक त्रासात परिवर्तीत होत होता.
शाल्मली माहेरी खूप लाडात वाढली होती. घरात सर्वांचीच ती लाडकी असल्याने तिच्यावर कधीच कोणती जबाबदारी पडली नव्हती. घरकाम, स्वयंपाक याची तिला अजिबात सवय नव्हती. ती जेमतेम १८ वर्षांची झाली आणि चांगल स्थळ आलं म्हणून घरच्यांनी लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने विरोध केला, पण संपूर्ण माहिती मिळाल्यावर तिलाही मुलगा आवडला व तिने आई-वडिलांच्या निर्णयाला सहमती दिली. पुढे चार-पाच महिन्यांत त्यांचं लग्नही झालं.

लग्नानंतरचे सात-आठ महिने छान गेले, पण नंतर घरकाम, स्वयंपाक, सगळ्यांच्या आवडी-निवडी जपणं, सुनेच्या, पतीच्या वाढत गेलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं तिला अवघड होऊ लागलं. या जबाबदाऱ्यांची अजिबातच सवय नसल्याने त्या सांभाळताना तिची ओढाताण व्हायला लागली. सासरच्या मंडळींचा जाच नव्हता, पण तिच्या कामाचा वेग, गोंधळल्यामुळे सतत होणाऱ्या चुका यावरून तिला सारखं बोललं जायचं. नवरा कधी तिच्या बाजूने तर कधी तिच्या विरोधात बोलायचा. या सततच्या ताणामुळे ती सारखी अस्वस्थ असायची. आई- वडिलांना वाईट वाटेल, नातेवाईक नाव ठेवतील, म्हणून ती याबाबत माहेरीही कोणाला काही सांगत नव्हती. ही सततची अस्वस्थता आणि घुसमट यामुळेच तिच्या सध्याच्या साऱ्या समस्या वारंवार उद्भवत होत्या आणि म्हणूनंच त्याची कोणतीही शारीरिक कारणं सापडत नव्हती.
शाल्मलीची ही समस्या लक्षात आल्यावर तिच्या कुटुंबियांना याची कल्पना दिली. तिच्या या लक्षणांमागील कारणं त्यांना समजावून सांगितली. तिच्या मनावरील हा ताण कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी काय काय प्रयत्न करावेत. छोटे-छोटे पण महत्वाचे कोणते बदल करावेत याबाबत सविस्तर चर्चा करून माहिती दिली. शाल्मलीलादेखिल काही प्रयत्न तसेच बदल करण्याबाबत सुचवले. त्याला काही औषधोपचारांची जोड दिली. साऱ्यांच्याच प्रयत्नांमुळे शाल्मलीची समस्या हळूहळू सुटत गेली.
(केसमधील नाव बदलले आहे.)
- मानसी तांबे – चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)