Next
श्वेतश्यामल चिंतन...
BOI
Thursday, July 26, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this storyभारतातील महत्त्वपूर्ण अमूर्ततावादी चित्रकारांमधील एक प्रमुख नाव म्हणजे प्रभाकर कोलते. अमूर्त चित्रे, रचना चित्रे, केवलाकारी चित्रे इत्यादी वर्गीकरणापेक्षा कोलते सर आपल्या चित्रांना ‘अनटायटल्ड’ असे संबोधतात. त्यांच्या या संबोधनाप्रमाणेच ही चित्रे अनाम रूपातच पाहावीत, हे उत्तम. सरांच्या चित्रात सगळेच असते आणि काहीच नसतेही. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या प्रभाकर कोलते यांच्या चित्रांबद्दल...
...........
प्रभाकर कोलतेप्रभाकर कोलते हे नाव मी प्रथम ऐकले ते चित्रकार विजय शिंदे यांच्याकडून. ‘कोलते सर’ असा साधा शब्द आणि त्यात लपलेले प्रचंड मोठे व्यक्तिमत्त्व. या विचारवंत-चित्रकाराच्या भेटीनंतर, चर्चांनंतर, व्याख्यानांनंतर आणि कोलते सरांची चित्रे पाहिल्यावर मुंबईतील ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’च्या अनेक पिढ्या प्रचंड प्रभावित व प्रेरित झाल्याचा इतिहास आहे. मुळात कोलते सर चित्रकार आहेत, चांगले शिक्षक आहेत, आणखी डोकावून पाहिलं तर एक चांगले कवीदेखील आहेत; पण ही कोणतीच लेबल्स त्यांना आवडत नाहीत, हेही खरे. चित्रकार कोलते अमूर्तवादी चित्रतत्त्वाशी अक्षरशः एकनिष्ठ आहेत. अमूर्त चित्रे साकारणारे खूप चित्रकार आहेत. परंतु त्यातील कलातत्त्वे समजून घेणारे, विद्यार्थ्यांना समजावून सांगणारे आणि नव्याने काही मांडणारे अभावानेच आढळतात. कोलते सरांच्या विचारप्रकियेत, चित्रनिर्मितीत एक सातत्य आहे. असे सातत्य राखणे खूप अवघड असते. कोलते सरांच्या बाबतीत अशा सातत्याला सहजतेची, स्व-भावाची जोड आहे. चित्र निर्माण होतानाच्या प्रक्रियेला ते सर्वांत जास्त महत्त्व देतात. ‘चित्र रंगवण्याच्या सर्वांगीण क्रियेनंतर मागे उरणारा दृष्य परिणाम म्हणजे माझे चित्र असावे. हा शेष परिणाम मी क्रियेपूर्वी ठरवत नसतो किंवा आखत नसतो. एवढेच नव्हे, तर त्याची पुसटशी कल्पनाही मी करत नसतो....’ कोलते सर त्यांची चित्र तयार करण्याची प्रकिया स्पष्ट स्वरूपात आपल्यासमोर मांडतात. चित्रसंस्कृतीकडे बघण्याचा एक विचार अथवा दृष्टिकोन कोलते सर सातत्याने अधिकारवाणीने मांडतात आणि तो म्हणजे चित्र हे मूलत: ‘चित्र’ असते. ते कशाचे तरी असलेच पाहिजे, हा हट्ट ते एकांगी मानतात. चित्राबाबतची आपली सर्वसामान्य समजूत किंवा संस्कार असे असतात, की चित्र हे कशाचे तरी असायलाच हवे. सर्वसाधारण समाजाची धारणा असते, की निसर्गदृश्य, पशुपक्षी, मानव, वस्तूसमूह इत्यादींचे चित्र असते. अमूर्त कलाकारांचे चित्रतत्त्व यापेक्षा वेगळे असते. कोलते सर किंवा बहुतेक अमूर्त चित्रकार फक्त ‘चित्र’ रेखाटतात. ते कशाचे तरी चित्र काढत नाहीत. त्याला काही वेळा केवलाकारी चित्र असेही संबोधले जाते. पॉल क्ली या स्विस चित्रकाराच्या निसर्गविषयक तत्त्वज्ञानाचा कोलते सरांच्या संपूर्ण जडणघडणीवर परिणाम झाला आहे. या परिणामाचा परिपाक म्हणून कोलते सर एक स्वतंत्र दृश्यप्रक्रिया आपल्यासमोर चित्ररूपात मांडतात. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील सुदर्शन कलादालनाच्या वतीने २४ डिसेंबर २०१३ ते दिनांक सहा जानेवारी २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. कोलते सरांसारख्या एका झपाटलेल्या चित्रकाराच्या चित्रांचे पुण्यातील ते बहुधा पहिलेच एकल प्रदर्शन असावे. म्हणूनच त्या प्रदर्शनाचे महत्त्व विशेष होते. १९४६ साली नेरूरपार (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे सरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. तेथेच तरुणपणात त्यांच्यात चित्रविषयक जाणिवा तरुणपणात रुजल्या त्या त्यांचे गुरू, चित्रकार शंकर पळशीकर यांच्यामुळे. त्यांचे औपचारिक शिक्षण ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये झाले. तेथेच पळशीकर, वासुदेव गायतोंडे, तय्यब मेहता, अकबर पद्मश्री अशा दिग्गज सर्जनशील कलाकारांबरोबर कोलते सर वावरत गेले. परिपक्व होत गेले. हे अनौपचारिक शिक्षण महत्त्वाचे ठरले. पुढे स्वत:ची एक दृश्यभाषा तयार करण्यास बळ देणारे ठरले. निसर्गाची अनुकृती करण्यापेक्षा पुनर्रचना करण्यामध्ये त्यांना विशेष रस उत्पन्न झाला. अमूर्त चित्रे, रचना चित्रे, केवलाकारी चित्रे इत्यादी वर्गीकरणापेक्षा कोलते सर आपल्या चित्रांना ‘अनटायटल्ड’ असे संबोधतात. त्यांच्या या संबोधनाप्रमाणेच ही चित्रे अनाम रूपातच पाहावीत, हे उत्तम. सरांच्या चित्रात सगळेच असते आणि काहीच नसतेही. रंग नाना तऱ्हेचे, गडद, प्रभावी, निस्तेज, करडे, फिके, पारदर्शक, अपारदर्शक, मातकट, सतेज, अपारदर्शक, बहुरंगी व रंगहीनही. रंग लावण्याच्या क्रियेला काय-काय संबोधावे? फटकारे, ओघळ, खरवडणे, रंग लावून पुसणे, वारंवार रंग लावून जमा झालेले थर जोपासणे, ओढलेल्या रेषा, सोडलेल्या रेषा, रिकामे प्रतल, हलकेच ब्रश टेकवण्याची क्रिया, अशा नानाविध क्रियांचा एकत्रित परिणामाच मानावयास हवा. इथे-तिथे डोकावणाऱ्या हरतऱ्हेच्या रेषा, तरंगणारे- पडलेले, रेंगाळलेले, विसावलेले, उडणारे, उत्साही आणि कंटाळलेले असे लहानसहान शेकडो आकार त्यांचे चित्रावकाश व्यापून असतात. एकाचा प्रचंड भासावा असा भलामोठा आकार-तुकडा, त्या लहानसहान आकारांना पुढे यायला जागा देतो. कोलते सर त्यांच्या विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात प्रवेशाला वाव देतात, अगदी तसाच काहीसा.‘जेजे’मध्ये असताना सरांनी कलाकारांच्या पिढ्या सरांनी घडवल्या. अतुल दोदिया, अंजू दोदिया, विजय शिंदेंपासून संजय सावंतांपर्यंत अनेक सक्षम कलाकार सरांनी या क्षेत्राला दिले. प्रायोगिकता हा तेव्हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म होता. ‘हॅपनिंग कलाप्रकार’ विद्यार्थ्यांना समजावा म्हणून चारचाकी गाडीला संपूर्णपणे कागदांनी झाकोळून टाकण्याचा प्रयोग किंवा असे नानाविध प्रयोग सरांनी विद्यार्थ्यांमध्ये चेतना व जाणिवा निर्माण करण्यासाठी केले होते. मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातही सरांचा संपर्क आहे. औरंगाबाद येथे काही वर्षे अध्यापन केल्याने तेथे त्यांचा चाहता व शिष्यवृंद आहे. सरांनी कोल्हापूर, सांगली भागात काही वर्षांपूर्वी कार्यशाळा घेऊन आधुनिकतेची तत्त्वे पेरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या नव्या-जुन्या चित्रकार मित्रांना कलाविषयक चार गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, प्रयोग करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी आपण काही अनुभव देऊ शकतो-घेऊ शकतो, अशा सध्या उद्देशांनी सर पुण्याच्या कलावंत मंडळींच्या संपर्कात असतात. हा चित्रकार-विचारवंत वयाच्या सत्तरीतही काही पेरू पाहतोय अगदी निरपेक्ष वृत्तीने. शासकीय यंत्रणा, त्यातील निष्क्रीयता, अशैक्षणिक वातावरणाची कलाशाळा, वयाच्या केवळ ज्येष्ठत्वाचा अभिमान बाळगणारे सहकारी आणि प्रयोगांची गळचेपी या साऱ्याच्या एकत्रित परिणामातून सरांनी २२ वर्षांच्या सेवेनंतर १९९३च्या अखेरीस ‘जेजे’ सोडले. ‘जेजे’ची परंपरा संपली, असा सूर तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये होता. त्याच वर्षात मी तेथे विद्यार्थी होतो. विद्यार्थ्यांच्याच्या शैक्षणिक नुकसानाचा मूक साक्षीदार. त्या वेळी एका अर्थाने एकूणच दृश्य कलेच्या भाषेत बोलायचे, तर ‘जेजे’मध्ये ‘कोलतेमय’ वातावरण होते, हे नक्कीच. टीकाकारही कमी नव्हते व आजही टीका होतेच आहे. विद्यार्थ्यांना हरतऱ्हेची मदत करणारा, प्रचंड पोटतिडकीने बोलणारा, ऐकणे, पाहणे, लिहिणे, वाचणे सारे सारे शिकवणारा शिक्षक कलाशाळांना अपवादानेच लाभतात. मुंबईच्या कलादालनांमध्ये व कलाव्यापारात होणाऱ्या उलथापालथी व घडामोडींवर कोलते सरांचा आक्षेप आहे. गेल्या पाच-सात वर्षांत आपल्या लेखांमधून हा चित्रकार सातत्याने कलेच्या बाजारीकरणाविरुद्ध आपले मतप्रदर्शन करताना दिसतो आहे. काहीसे नकारात्मक भूमिकेकडे झुकले आहेत का, असा प्रश्न मनात यावा, इतकी टीका ते करताना दिसत आहेत. कलाक्षेत्रातील परिस्थिती याला जबाबदार असेलही कदाचित.भारतातील महत्त्वपूर्ण अमूर्ततावादी चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलते यांचे नाव आहे. भारतातील प्रतिष्ठित कलादालनामध्ये त्यांची चित्रे वारंवार प्रदर्शित होत असतात. जागतिक स्तरावर भारतीय कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या कलाकृतींचा समावेश झालेला आहे. मराठी भाषेत चित्रविषयक लेखन ते सातत्याने अनेक वर्षे करत आले आहेत. त्यांचा ‘कलेपासून कलेकडे’ हा लेखसंग्रह विशेष चर्चिला गेला आहे. सरांचा मोठा चाहतावर्ग आहे. काळ्या-पांढऱ्या स्वरूपाच्या त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहिल्यावर त्याबद्दलचे आपले अनुभव पुण्यातील चित्रकार जयंत जोशी यांनी शब्दबद्ध केले आहेत. जोशी यांच्या त्या पुस्तकाचे नाव  ‘श्वेतश्यामल चिंतन’ असे आहे. कोलते सरांची चित्रे पाहणे हा अनुभव आहे. एकूणच दृश्यकला अनुभवता याव्या लागतात. जर्मन चित्रकार जेरहार्ड रिच्टरच्या मताप्रमाणे कलेचे वर्णन करता येत नाही, कला ही फक्त सादरीकरणातूनच सिद्ध होते. ही सिद्धता हे प्रदर्शन पाहिल्यावर झाली.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Hemant Joshi About 200 Days ago
We would love to read more about him. Nitinji you have placed it beautifully. Content full !!
0
0

Select Language
Share Link