Next
‘अब समय हमारा है...’
अनिकेत कोनकर
Tuesday, November 14, 2017 | 10:40 AM
15 0 0
Share this article:उत्तर भारतातल्या सात जिल्ह्यांतली रस्त्यावरची काही मुलं एकत्र येऊन काय करतात माहितीय? ती ‘बालकनामा’ नावाचं मासिक चालवतात. त्यातून ही मुलं आपल्या समस्या, रोजच्या जगण्याचा संघर्ष मांडतात आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघून ती पूर्ण करण्याचा अधिकार आपल्यालाही असल्याची जाणीव मोठ्यांना करून देतात. ‘अब समय हमारा है! क्या आप हमें सुन रहे हैं?’ हे एक शीर्षकच त्यांच्या निर्धाराची प्रचिती देतं. बालदिनानिमित्त जाणून घेऊ या ‘बालकनामा’बद्दल...
...............
अलीकडच्या काळात लहान मुलं बऱ्याच कारणांनी चर्चेत असतात. त्यातली बरीचशी कारणं त्यांच्या वयाला न साजेशी असतात आणि त्यातली काही चांगली आणि काही वाईट असतात. दुर्दैवानं वाईट म्हणाव्या अशा प्रकरणांचं प्रमाण वाढीला लागलंय. मग परीक्षा चुकवण्यासाठी शाळेतल्या विद्यार्थ्याचा खून करणं असो किंवा आत्महत्या करणं असो किंवा मुलींची छेडछाड करणं असो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, परिस्थितीचा मुलांवर परिणाम होत असतो, हे तर त्रिकालाबाधित सत्यच आहे. कारण ती स्पंजसारखं सगळं काही शोषून घेत असतात. तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांनाही लीलया करता येणं, ही गोष्टदेखील त्याचंच एक उदाहरण. तंत्रज्ञानाची होत असलेली प्रगती सर्वांत आधी कोण आत्मसात करत असेल, तर ती ही कोवळी पिढी. या वयात त्यांना तंत्रज्ञान अवगत होणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे; पण त्याचेही अनेक दुष्परिणाम गेल्या काही काळात दिसू लागले आहेत. मोठ्या माणसांप्रमाणेच मुलंही तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढीला लागलं आहे. 

अर्थात, वर उल्लेखलेली सगळी चांगली-वाईट उदाहरणं समाजाच्या विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. या वर्गात अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून उच्चभ्रू वर्गापर्यंतचा सगळा समाज येतो. एका अर्थानं समाजात काही तरी स्थान असलेल्या वर्गाचं हे चित्र आहे; पण रूढार्थानं समाजात स्थान नसलेल्या वर्गाचं आणि मुलांचं काय? रस्त्यावर काहीबाही वस्तू विकणारी, साफसफाई करणारी, दुकानात किंवा हॉटेलांत काम करणारी किंवा भीक मागणारीही मुलं आपल्याला आजूबाजूला दिसतात. या वर्गातल्या मुलांच्या समस्या हा सहसा कोणाच्या चर्चेचा विषय नसतो... काही अपवाद वगळता अगदी माध्यमांच्यासुद्धा. अगदीच काही तरी मोठं घडलं किंवा गंभीर घटना लक्षात आली, तरच माध्यमांमध्ये त्यांना स्थान दिलं जातं. मग अशा मुलांच्या समस्या मांडणार कोण आणि त्या सुटणार तरी कशा? दिल्लीतल्या काही मुलांनी मात्र यावर उपाय शोधलाय... 

लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही मुलंदेखील चर्चेत असतात... पण चांगल्या कारणानं... हे कारण म्हणजे त्यांचं ‘बालकनामा’ हे मासिक. होय! दिल्लीसह उत्तर भारतातल्या सात जिल्ह्यांतली काही मुलं एकत्र येऊन ‘बालकनामा’ नावाचं मासिक चालवतात. त्यांचं हे मासिक गेली १४ वर्षं म्हणजेच २००३पासून सुरू आहे. सुरुवातीला त्रैमासिक स्वरूपात प्रसिद्ध होणारं ‘बालकनामा’ २०१४पासून मासिक म्हणून प्रसिद्ध होतं आणि तेही हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत. आधी ते हिंदीतून प्रकाशित होतं आणि नंतर इंग्रजीमध्ये अनुवादित केलं जातं. दर महिन्याला हिंदीच्या पाच हजार तर इंग्रजीच्या तीन हजार प्रती प्रसिद्ध केल्या जातात. टॅब्लॉइड स्वरूपाचं, पाच रुपये किमतीचं आणि १६ पानांचं हे मासिक एक सल्लागार, एक संपादक, एक उपसंपादक, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांतील मिळून एकूण सात जिल्ह्यांत सात वार्ताहर आणि ३० खबरे अशा साधारण ३०-३५ मुलांकडून चालवलं जातं. हे अगदी खरं आहे. या सगळ्या मुलांमध्ये एक गोष्ट सारखी आहे. या प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात खूप कठीण दिवस पाहिलेत, किंबहुना आत्ताही तसे दिवस ती अनुभवत आहेत. फक्त त्यांच्यातल्या धीराच्या गुणामुळे ती या वयातही पत्रकार बनली आहेत.

ही मुलं काय आणि कशी पत्रकारिता करणार, असं मनात आलं असेल, तर पुढे वाचा. ‘रस्सी पर खेल दिखाकर जिंदगी गुजार रहे हैं मासूम बच्चे,’ ‘बच्चों की तस्करी पर नही है लगाम,’ ‘भीख नहीं, भविष्य दो’.... ही शीर्षकं वाचली, की ‘बालकनामा’च्या पत्रकारितेचा अंदाज येतो. कितीही नाही म्हटलं तरी स्वतःच्या अडचणींबद्दल दुसऱ्या कुणी लिहिण्यापेक्षा स्वतः लिहिलं, तर त्यांची तीव्रता वाचणाऱ्यांना अधिक कळते. त्याचा प्रत्यय ही आणि अशा प्रकारची शीर्षकं वाचली की येतो.

याची सुरुवात कशी झाली, ते पाहून आपण त्यांची कार्यपद्धती जाणून घेऊ. दिल्लीतल्या चाइल्डहूड एनहान्समेंट थ्रू ट्रेनिंग अँड अॅक्शन (चेतना) या स्वयंसेवी संस्थेनं मे २००२मध्ये डेहराडूनमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासंदर्भात एक कार्यशाळा घेतली होती. दिल्लीतल्या रस्त्यांवर, तसंच अन्य ठिकाणी काम करणारी ३५ मुलं या कार्यशाळेला उपस्थित राहिली होती. अशाच प्रकारे अन्य ठिकाणी रस्त्यावर काम करणाऱ्या मुलांसाठी, त्यांच्या भल्यासाठी आपण एकत्र यायचं, असं त्या मुलांनी त्या कार्यशाळेत ठरवलं आणि त्यानंतर ‘बढते कदम’ या महासंघाची स्थापना झाली. रस्त्यावरच्या किंवा अशा प्रकारे काम करणाऱ्या मुलांबद्दल बाकीच्या समाजाला फारशी काही माहिती नसते, त्यांच्याशी काही देणंघेणंही नसतं. अशा एखाद्या मुलाचं पाऊल वाकडं पडलं आणि त्याच्याकडून चोरीसारखी घटना घडली, तर त्याबद्दलच्या बातम्या सगळीकडे येतात; पण अशा मुलाने रस्त्यावरच्या कोणाचे प्राण वाचवले किंवा अन्यकाही चांगलं काम केलं, तर त्याची माध्यमं दखल घेतातच, असं नाही. हा मुद्दा या कार्यशाळेत मांडला गेला. त्यातूनच मग स्वतःचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समस्या मांडण्यासाठी स्वतःचंच माध्यम असावं, अशी गरज पुढे आली आणि तिथेच ‘बालकनामा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

विषय मिळवणं...‘बढते कदम’चे सदस्य असलेल्या १० हजारांहून अधिक मुलांशी चर्चा सातत्याने होत असलेल्या चर्चेतून, त्यांच्या निरीक्षणातून त्यांच्या समस्या पुढे येत असतात, त्यांच्याशी संबंधित कायदेशीर मुद्देही पुढे येत असतात, त्यातूनच ‘बालकनामा’चे विषय ठरतात. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, ती मुलंही ‘बालकनामा’साठी खबरे म्हणून काम करतात. ती वेगवेगळे विषय वार्ताहरांना मिळवून देतात, त्यासाठी त्यांचे अनुभव शेअर करतात आणि अधिक माहितीचे सोर्सेसही देतात. त्यानंतर दर आठवड्याला संपादकीय चर्चा होते आणि त्यातून विषय निश्चित करून त्याचे फोटो, बातम्या आदींसाठी तयारी केली जाते, तो विषय कसा मांडायचा यावर चर्चा होते आणि मग त्याबरहुकूम अंमलबजावणी करून बालकनामा तयार होतो. त्याचे विषय अर्थातच रस्त्यावरच्या छोट्या मुलांशी, त्यांच्या समस्यांशी निगडित असतात. बालमजुरी, लैंगिक छळ, पोलिसांकडून होणारा छळ अशा विषयांचा त्यात समावेश असतो. ‘बालकनामा’च्या वेबसाइटवर  लॉगिन केल्यास आपल्या ‘बालकनामा’चे मागील सर्व अंक पाहता येतात. 


संपादकीय चर्चा...‘बालकनामा’साठी काम करणारी सगळी मुलंच कठीण परिस्थितीत जगत असल्यामुळे किंवा पूर्वायुष्यात त्यांनी कठीण परिस्थितीचा अनुभव घेतलेला असल्यामुळे त्यांच्या समस्या ती अधिक प्रभावीपणे मांडू शकतात. ‘बालकनामा’ची छपाई झाल्यानंतर ते स्वयंसेवी संस्था, काही शासकीय संस्था, तसेच अन्य इच्छुक आणि देणगीदारांपर्यंत पोहोचवले जातात. त्यांचं सामूहिक वाचनही होतं आणि विषयांची, विचारांची देवाणघेवाण होते. या सगळ्यातून साहजिकच वैचारिक घुसळण होते आणि परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ त्यांना मिळतं. हे सगळं करण्यासाठी अर्थातच ‘चेतना’ या संस्थेचं मोलाचं मार्गदर्शन आणि साह्य या मुलांना मिळतं. ती संस्था जणू काही त्यांच्यासाठी मेंटॉर म्हणूनच काम करते. या वार्ताहरांपासून संपादकांपर्यंतची मुलं अगदी सात-आठ वर्षांपासून १७-१८ वर्षांपर्यंतच्या वयोगटातली आहेत. त्यामुळे शंभू, ज्योती, मुस्कान, विजयकुमार, चांदनी असे सगळेच पत्रकार वेगवेगळ्या ‘एक्स्लुझिव्ह स्टोरीज’ प्रसिद्ध करून अन्यायाला, संघर्षाला वाचा फोडत असतात. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं. त्याचे धडे या मुलांना लहान वयातच मिळत आहेत; किंबहुना ही मुलं पत्रकारिता जगतच आहेत. पत्रकार होण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरांतल्या आणि प्रामुख्यानं तळागाळातल्या घटकांच्या समस्या माहिती असाव्या लागतात किंवा जाणून घ्याव्या लागतात. मासिकाचं वितरण...नुसतं माहिती घेऊन थांबून चालत नाही, तर त्या माध्यमातून मांडून, त्यांचा पाठपुरावा करून सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही मुलं नेमकं हेच करत आहेत. त्यामुळे ही खऱ्या अर्थानं आदर्श पत्रकारिता म्हणावी लागेल. कारण अलीकडे पत्रकारितेत अनेक अपप्रवृत्ती शिरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक हितसंबंधांना बाधा येणार नाही अशा पद्धतीनं, किंबहुना वैयक्तिक हितसंबंध जपले जातील अशा पद्धतीनं पत्रकारिता केली जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. या मुलांचं मात्र तसं नाही. यात त्यांचा फायदा असला, तर तो इतकाच आहे, की साऱ्या बालकामगारांची कष्टमय जीवनातून मुक्तता व्हावी आणि त्यांना त्यांच्या मनासारखं जगता यावं; चांगली आणि मोठी स्वप्नं पाहता यावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप शिकता यावं. 

छोट्या पत्रकारांचा हा बालकनामा प्रेरणादायी आहे आणि डोळ्यांत पाणी आणणाराही आहे. ‘चेतना’ या संस्थेला देणगी देऊन या उपक्रमाला आपल्यालाही हातभार लावता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाची दखल मुख्य प्रवाहातील अनेक प्रमुख माध्यमांनीही घेतली आहे. दी गार्डियन, इंडिया टुडे, अल् जझीरा, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स या माध्यमांचा त्यात समावेश आहे. ‘रस्त्यावरील मुलांचं रस्त्यावरील मुलांनीच प्रसिद्ध केलेलं ‘बालकनामा’ हे वृत्तपत्र जगातलं एकमेवाद्वितीय आहे,’ अशा शब्दांत ‘इंडिया टुडे’नं या उपक्रमाचा गौरव केला आहे.  

मुलं म्हणजे देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक असतात, असं म्हटलं जातं. ‘बालकनामा’ची टीम म्हणजे या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. ‘अब समय हमारा है, क्या आप हमें सुन रहे हैं?’ हे ‘बालकनामा’च्याच एका अंकातलं शीर्षक आहे. आपलं उज्ज्वल भविष्य स्वतः घडविण्याबाबत असलेला त्यांचा आत्मविश्वासच यातून झळकतो, असं म्हणायला हरकत नसावी. 

(माहिती स्रोत, फोटो : http://balaknama.org. चेतना संस्थेची वेबसाइट : http://chetnango.org/)

(‘बालकनामा’संदर्भातील दोन डॉक्युमेंट्रीचे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search