Next
तुम्हें याद होगा...
BOI
Sunday, August 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गुलशन बावरा‘मेरे देश की धरती...’ या गुलशन बावरा यांनी लिहिलेल्या गीताची जादू आजही कायम आहे. अशीच त्यांची आणखीही अनेक गाणी आजही रसिकांना आनंद देत आहेत. या प्रतिभासंपन्न गीतकाराचा स्मृतिदिन सात ऑगस्ट रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘तुम्हें याद होगा...’ या गीताचा...
........
नुकताच आपला स्वातंत्र्यदिन होऊन गेला. १५ ऑगस्ट काय अन् २६ जानेवारी काय, या दोन्ही राष्ट्रीय सणांना भारतातील अनेक गावांमधून ‘उपकार’ चित्रपटातील ‘मेरे देश की धरती’ हे गीत सार्वजनिक कार्यक्रमात अगर झेंडावंदनाच्या ठिकाणी लावण्यात येते, ऐकवण्यात येते. गेली ५० वर्षे हे चालू आहे. हे गीत ‘उपकार’ चित्रपटातील म्हणून ओळखले जाते, मनोजकुमारच्या चित्रपटातील म्हणून ओळखले जाते, संगीतकार कल्याणजी-आनंदजी, गायक महेंद्र कपूर यांचेही म्हणून ओळखले जाते. पण या गीताचा गीतकार...?

तसा हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार हा दुर्लक्षितच राहतो आणि अनेक वेळा चित्रपटप्रेमींकडूनसुद्धा! परंतु एक उत्कृष्ट देशप्रेमाचे गीत, प्रत्येक वर्षात चार-पाच वेळा भारतभर सार्वजनिक ठिकाणांवरूनही ऐकवले जाते, ते इतके सुंदर गीत कोणी लिहिले आहे?

तशी त्या गीतकाराची ख्याती प्रचंड मोठी नाही. तरीही तो ‘ये मौसम रंगीन समा...’सारखे (मॉडर्न गर्ल) हलकेफुलके मनोरंजनाचे गाणे लिहून गेला आहे. तर कधी त्याने ‘चांदीकी दीवार न तोडी...’सारखी (विश्वास) व्यथा मांडली आहे. ‘यारी है इमान मेरा...’ (जंजीर) अशी मैत्रीची महती त्याने कव्वालीमधून मांडली आहे. ‘कस्मे वादे निभाएंगे हम...’ असे म्हणत त्याने ७०च्या दशकात तरुण पिढीला ‘वादा कर ले सजना...’ अशा शपथा घ्यायला लावल्या होत्या.

अशी एक-दोन नव्हे, तर २४० गीते या गीतकाराने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटांतून रसिकांना दिली. त्याच गीतकाराने ‘मेरे देश की धरती...’ हे गीत लिहिले आहे. ‘गुलशन बावरा’ हे त्यांचे नाव! हा ऑगस्ट महिना त्यांच्या स्मृतीचा महिना आहे. सात ऑगस्ट २००९ रोजी त्यांचे निधन झाले. ११ एप्रिल १९३९ रोजी पाकिस्तानातील लाहोरपासून ३० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेखुपुरा गावात गुलशन बावरा यांचा जन्म झाला होता. भारताच्या फाळणीच्या वेळी ते फक्त आठ वर्षांचे होते. त्या वेळी दंगेखोरांनी त्यांच्या डोळ्यापुढे त्यांच्या आई-वडिलांची हत्या केली होती; तेव्हा आपल्या मोठ्या भावाबरोबर लपत-छपत गुलशन बावरा जयपूरमध्ये आले. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. नंतर त्यांच्या भावाची बदली दिल्ली येथे झाल्यामुळे ते भावाबरोबर दिल्लीला गेले. तेथे त्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतले.

वयाच्या सहाव्या वर्षापासून गुलशन बावरा गीते व भजने लिहू लागले होते. काव्य लिहिण्याची प्रतिभा त्यांच्याकडे उपजत होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना रेल्वेत नोकरी लागली होती. त्यामुळेच ते १९५५मध्ये मुंबईत आले. तेथील वास्तव्यात आपल्या काव्यलेखनाच्या छंदामुळे त्यांनी अनेक चित्रपट निर्माते, तसेच संगीतकार यांच्या ओळखी करून घेतल्या. ते त्यांच्या संपर्कात राहू लागले, जेणेकरून चित्रपटासाठी गीते लिहिण्याचे काम त्यांना मिळावे.

आणि त्या प्रयत्नातच संगीतकार कल्याणजी यांनी त्यांना ‘चंद्रसेना’ (१९५९) चित्रपटासाठी गीत लिहिण्याचे काम दिले. ते त्यांनी पूर्ण केले. एकच गीत त्यांनी लिहिले. नंतर कल्याणजींनी ‘सट्टाबाजार’ चित्रपटासाठी तीन गाणी गुलशन बावरा यांच्याकडून लिहून घेतली. ही तिन्ही गीते लोकांना भावली. शांतिभाई पटेल त्या चित्रपटाचे वितरक होते. त्यांनी जेव्हा गुलशन बावरा यांना प्रत्यक्ष पाहिले, तेव्हा किरकोळ अंगकाठी, कपाळावरील केसांची झुलपे व साधा चेहरा पाहून ते म्हणाले, ‘अबे, हा मुलगा कोणत्याही अंगाने गीतकार वाटतच नाही. हा तर ‘बावरा’ (वेडा) वाटतो आहे.’ बस! याच वेळी गुलशन बावरा यांचे हे नाव पक्के झाले. वास्तविक त्यांचे मूळ नाव गुलशन मेहता असे होते; पण शांतिभाईंनी मेहताचे बावरा केले.

यानंतर कल्याणजींबरोबर गुलशन बावरा यांनी ‘ओ तेरा क्या कहना’, ‘दिल्ली जंक्शन’ आणि ‘घर घर की कहानी’ असे तीन चित्रपट १९५९ व १९६० अशा दोन वर्षांत केले. १९६१मध्ये गुलशन बावरा यांनी रेल्वेतील नोकरी सोडून पूर्ण वेळ गीतकार म्हणूनच कामास सुरुवात केली. ‘फर्स्ट लव्ह’, ‘नीली आँखें’ हे दोन चित्रपट संगीतकार दत्ताराम यांच्याबरोबर, तर ‘मॉडर्न गर्ल’ व ‘गर्ल्स हॉस्टेल’ असे दोन चित्रपट त्यांनी संगीतकार रवी यांच्याबरोबर केले. ते १९६१-६२ हे वर्ष होते. १९६३पासून त्यांनी पुन्हा संगीतकार कल्याणजी-आनंदजींबरोबर कामाला सुरुवात केली आणि १२-१३ वर्षे या जोडीने अनेक मधुर गीते रसिकांना दिली. ‘दूल्हा-दुल्हन’, ‘परिवार’, ‘उपकार’, ‘विश्वास’, ‘सच्चा-झूठा’, ‘जंजीर’, ‘हाथ की सफाई’ अशा अनेक चित्रपटांतून गुलशन बावरांची अर्थपूर्ण गीते व कल्याणजी-आनंदजी यांचे मधुर संगीत रसिकांना आनंद देऊन गेले व आजही देते. संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. तेथे लिहिलेली गीते मात्र हलकीफुलकी अशीच होती. ‘खेल खेल में’, ‘कस्मे वादे’, ‘सनम तेरी कसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘पुकार’ इत्यादी चित्रपटांतील गीते आपण ऐकली, तर वरील विधानाची सत्यता आपणाला पटेल.

जवळजवळ ४० वर्षांच्या कारकिर्दीत गुलशन बावरा यांनी शंभर चित्रपटांसाठी गीते लिहिली. गीते लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी जवळजवळ तीस चित्रपटांत कामेही केली. त्यामध्ये ते आपल्याला अभिनयाचे फार मोठे दर्शन घडवत नाहीत; पण छोटे छोटे रोलही त्यांनी चांगल्या पद्धतीने केले. ‘उपकार’ या चित्रपटापासून त्याची सुरुवात झाली. तीन चोर, गहरी चाल, ज्वारभाटा, झूठा कही का, जंजीर इत्यादी चित्रपटांत गुलशन बावरा पडद्यावर दिसले होते. याव्यतिरिक्त १९६५मध्ये त्यांनी ‘सस्सी पुन्नू’ या पंजाबी चित्रपटामध्येही अभिनय केला होता.

‘उपकार’मधील ‘मेरे देश की धरती...’ या गीताबद्दल त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले होते. त्यानंतर ‘जंजीर’मधील ‘यारी है इमान मेरा...’ या गीताकरिताही त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावरचे दुर्दैव म्हणजे मध्य प्रदेश सरकारने त्यांना ‘किशोरकुमार अॅवॉर्ड’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात तो सोहळा होण्याआधीच सात ऑगस्ट २००९ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.

अशा या प्रतिभासंपन्न गीतकाराला विसरणे योग्य ठरत नाही. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ दिग्गज गीतकारांची नावे व रचनाच चर्चेत राहतात. त्यामध्ये गुलशन बावरांचे नाव पटकन येत नाही. असे घडणार हे त्यांना माहीत होते की काय कोण जाणे? कारण ते १९५८ मध्येच लिहून गेले होते  - ‘तुम्हें याद होगा कभी हम मिले थे.’

होय! आजचे सुनहरे गीत तेच आहे. १९५९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सट्टाबाजार’ या चित्रपटात हे गीत होते. हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांनी ते गायले होते. या गीताची मधुर चाल आणि सुंदर वाद्यमेळ हे कर्तृत्व संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे! हे गीत म्हणजे तसा दोन प्रेमिकांचा संवाद आहे; पण प्रेमात मीलनाचे काही दिवस संपल्यावर दोघे दुरावतात आणि काही काळाने एकमेकांची आठवण येत असतानाचे त्यांचे मनोगत मांडताना गुलशन बावरा साधे साधे शब्द वापरून गीत तयार करतात. 

तो...  

मोहब्बत के राहो में मिलकर चले थे’

तुला आठवते ना, कधी काळी आपण भेटलो होतो (आणि) प्रेमाच्या वाटेवरून एकमेकांसोबत काही काळ चालत राहिलो होतो.

प्रियकराचे हे मनोगत! पण दुरावलेली व दुखावलेली प्रेयसी म्हणते...

‘भूला दो मोहब्बत में हम तुम मिले थे 
सपनाही समझो के मिलके चले थे’

(अरे माझ्या प्रिया) तू आणि मी प्रीतीच्या वाटेवरून चालताना एकमेकांना भेटलो होतो, हे तू विसरून जा. आपण त्या वाटेवरून मिळून चाललो होतो, हे एक स्वप्न होते असे तू समज. (आणि मला विसरून जा)

तिच्या आठवणीने तो म्हणतो...

‘डूबा हूँ गम की गहराईयों में 
सहारा है यादों का तनहाईयों में’ 

(तुझ्या विरहामुळे निर्माण झालेल्या) दुःखाच्या खाईत मी बुडून गेलो आहे. आता एकटेपणात (तुझ्या प्रीतीच्या त्या मधुर) स्मृतींचा (मला फक्त) आधार आहे.

‘ती’ त्याला सांगते...

‘कहीं और दिल की दुनिया बसा लो 
कसम है तुम्हे वो कसम तोड डालो’

तू तुझे मन आता दुसरीकडे गुंतव (व मला विसरून जा) (आपण घेतलेली प्रेमाची) ती शपथ तू आता तोडून टाक (आणि मला विसरून जा! तू हे असेच करावेस अशी मी तुला) ही शपथ घालते आहे.

हे असे प्रेयसीचे सांगणे; पण त्यावर तो म्हणतो...

‘नई दिल की दुनिया बसा न सकूंगा 
जो भूले हो तुम वो भूला न सकूंगा’  

(तुला विसरून) प्रेमाची नवीन दुनिया (मी) वसवू शकणार नाही. तू जे विसरून गेली आहेस (विसरून जा म्हणत आहेस) ते मी विसरू शकणार नाही.

प्रियकराचे हे विचार ऐकल्यावर प्रेयसी अखेरीस म्हणते -

‘अगर जिंदगी हो अपने ही बस में 
तुम्हारी कसम हम न भूले वो कसमें’

(हे एवढे तू सांगतोस, ते ऐकून माझ्या प्रिया मी तुला अखेर एवढेच सांगते की) हे जीवन माझ्या हातात असेल, तर (या जीवनात मला माझ्या इच्छेने जगता आले तर) तुझी शपथ (घेऊन मी सांगते, की आपल्या दोघांच्या) प्रीतीच्या आणाभाका मी (कधीही) विसरणार नाही. (आपले प्रेम विसरणार नाही.)

असे हे गुलशन बावरांचे गीत. त्यासाठी हेमंतकुमार यांचा घनगंभीर आवाज, स्वरसम्राज्ञीच्या स्वरातील प्रेयसीची व्याकुळता आणि कल्याणजी-आनंदजींचे मधुर संगीत सारेच ‘सुनहरे’!

या चित्रपटाचे नायक-नायिका बलराज साहनी आणि मीनाकुमारी हे होते. परंतु हे गीत पडद्यावर साकार करण्याचे भाग्य याच चित्रपटातील अन्य कलावंत सुरेश व सहनायिका विजया चौधरी यांना लाभले होते. तेच जर ते मीनाकुमारी व बलराज साहनी यांना मिळाले असते तर...? चार चाँद लग जाते!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anand vaidya About 298 Days ago
Classic song of hemant Kumar Hemant da is my favourite singer
0
0

Select Language
Share Link
 
Search