Next
‘चांद्रयान-२’ २२ जुलैला झेपावणार!
BOI
Thursday, July 18, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:श्रीहरिकोटा :
भारताचे चांद्रयान-२ आता २२ जुलै २०१९ रोजी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी चंद्राकडे झेपावणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले. पूर्वनियोजनानुसार ते १५ जुलै रोजी पहाटे २.५१ वाजता प्रक्षेपित होणार होते; मात्र ऐन वेळी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे त्याचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते. झालेला बिघाड दुरुस्त करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याने पुढील तारीख जाहीर करण्यात आली आहे.

चांद्रयान-२ ही भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आहे. जेव्हा हे यान चंद्रावर उतरेल, तेव्हा तसे यश मिळवणाऱ्या देशांत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताचा चौथा क्रमांक लागेल. त्यामुळे या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. १५ जुलै रोजीच्या प्रक्षेपणाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते; मात्र उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी यंत्रणेत काही बिघाड झाल्याचे लक्षात आले. तो बिघाड फार मोठा नव्हता, तरीही कोणताही धोका न पत्करता मोहीम तातडीने स्थगित करण्यात आली. या मोहिमेसाठी सुमारे ९७८ कोटी रुपये खर्च झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या मोहिमेचा खर्च कमी आहे.

‘जीएसएलव्ही मार्क थ्री’ या भारताच्या मजबूत आणि अत्यंत सक्षम अशा प्रक्षेपकाद्वारे हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. बिघाडाच्या स्वरूपासंदर्भात कोणतीही माहिती ‘इस्रो’कडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एका शास्त्रज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रक्षेपकाच्या इंधनटाकीमध्ये हेलिअम भरल्यानंतर दाब घटत असल्याचे लक्षात आले. त्यावरून इंधनटाकीतून गळती होत असल्याचे स्पष्ट झाले.

‘ऑक्सिडायझर म्हणून द्रवरूप ऑक्सिजन आणि इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन भरल्यानंतर हेलिअम भरला जात होता. हेलिअम बॉटलचा दाब ३५० बारपर्यंत नेऊन तो ५० बारपर्यंत नियंत्रित करायचा, अशी पद्धत आहे; मात्र हेलिअम भरल्यानंतर दाब कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गळती होत असल्याचे स्पष्ट झाले,’ अशी माहिती शास्त्रज्ञाने दिली. आता मात्र ‘इस्रो’ने २२ जुलै ही तारीख निश्चित केल्याने बिघाड दुरुस्त करण्यात शास्त्रज्ञांना यश आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘अशाच प्रकारची गळती ‘चांद्रयान-१’च्या वेळेसही झाली होती; मात्र ती दुरुस्त करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आणि ती मोहीम पूर्णतः यशस्वी झाली,’ असे ‘इस्रो’चे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘अशा प्रकारच्या अडचणी येणे नवे नाही; मात्र बिघाड वेळेत लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली,’ असेही नायर यांनी म्हटले आहे.

चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच अंधाऱ्या भागावर जाणार आहे. २००८मधील ‘चांद्रयान-१’ने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. त्यामुळे चांद्रयान-२ काय काय शोध लावते आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

चांद्रयानाविषयी...
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यानाचे प्रक्षेपण होईल. जीएसएलव्ही मार्क थ्री हा प्रक्षेपक यानाला पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सोडेल. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात आल्यावर यान त्याच्या पृष्ठभागाकडे खेचले जाईल. त्यातील विक्रम हे वाहन (लँडर) चंद्रावर उतरणार असून, त्यातील प्रज्ञान हे रोव्हर चंद्रावर प्रत्यक्ष फिरून माहिती गोळा करणार आहे. या वेळी ‘ऑर्बायटर’ चंद्राभोवती परिवलन करून या कामावर नजर ठेवणार आहे. चंद्राचा उगम आणि उत्क्रांती याबद्दलची माहिती या मोहिमेतून कळणार आहे. आम्ही या मोहिमेसाठी संपूर्णपणे सज्ज आहोत, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.

(चांद्रयानाचा टीझर सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search