पुणे : नव्यानेच स्थापन झालेल्या ‘महारेरा तक्रार निवारण मंचा’स घर ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मंचाची पुण्यातील पहिली सुनावणी नुकतीच घेण्यात आली. या वेळी घर खरेदीबाबतच्या दोन तक्रारींची यशस्वी सोडवणूक करण्यात आली.
‘महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण’ अर्थात ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या प्रकल्पांबद्दल उदभवणाऱ्या तक्रारींसाठी ‘तक्रार निवारण मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे.
या वेळी ‘क्रेडाई’चे अमर मांजरेकर, आय. पी. इनामदार, मनीष जैन आणि अनिल फरांदे, तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे शाखेचे संजीव कुलकर्णी, केशव बर्वे, तनुजा रहाणे व कल्पिता रानडे अशा एकूण चार खंडपीठांद्वारे ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. सुनावणी झालेल्या सहा तक्रारींपैकी दोन तक्रारींची विस्तृत स्वरूपात सुनावणी घेण्यात आली असून त्या यशस्वीपणे सोडवण्यात आल्या आहेत. उर्वरित चार तक्रारीही ऐकून घेण्यात आल्या आणि त्या सोडवण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला.
बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते. हे वाद तक्रारींच्या स्वरूपात महारेराकडे निवारणासाठी जातात. या समस्या सोडविण्याचा एक सकारात्मक प्रयत्न म्हणून या तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली आहे.