Next
...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Friday, April 13, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story

कर्ला शाळेतील शिक्षिका वृषाली नाचणकर (डावीकडून दुसऱ्या), मुख्याध्यापिका संजीवनी भागवत (डावीकडून तिसऱ्या) आणि अनुप्रिता कोकजे (उजवीकडून तिसऱ्या) यांच्या कार्याची दाखल घेऊन या महिला दिनाला त्यांचा सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी : आजच्या व्यावहारिक जगात सगळ्याच क्षेत्रांचा बाजार झाला आहे. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही; मात्र रत्नागिरी शहराजवळील कर्ला येथील मराठी शाळेत अशा तीन शिक्षिका आहेत, ज्यांनी ती शाळा बंद होण्यापासून वाचवली; शिवाय या शाळेला एक वेगळी ओळखही त्यांनी मिळवून दिली आहे. आपली शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनावी, हे ध्येय त्यांनी उराशी बाळगले असून, त्यासाठी त्या तिघी जणी कंबर कसून काम करत आहेत. राज्यात मराठी शाळांकडे पाठ फिरविण्याचे आणि मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढलेले असताना या मराठी शाळेला संजीवनी देण्याचे आदर्शवत काम या शिक्षिकांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या कर्ला मराठी शाळेतील विद्यार्थिनी .रत्नागिरी शहराजवळच्या कर्ला गावात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा असून, शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी भागवत, शिक्षिका वृषाली नाचणकर आणि अनुप्रीता कोकजे या त्रयीच्या प्रयत्नांनी ही शाळा बहरली अन् फुलली आहे. या तिघीही कर्ला शाळेत येण्यापूर्वी भौतिक सुविधांनी युक्त असलेल्या चांगल्या शाळेत कार्यरत होत्या. २०११मध्ये यांची बदली कर्ला शाळेत करण्यात आली. त्या वेळी या शाळेची दुरवस्था झाली होती. शाळेच्या इमारतीचे छप्पर खाली उतरले होते. हात वर केल्यावर हे छप्पर हाताला सहज लागत होते. ते काही ठिकाणी पडण्याच्या स्थितीत होते. कौले फुटली होती. त्यामुळे पावसाचा जलाभिषेक मुलांना होत होता. शाळेला कंपाउंड वॉल नव्हती. वर्ग खोल्यांमध्ये असलेल्या फरश्याही फुटल्या होत्या आणि शाळेतील मुलांची संख्या अवघी सहा ते आठ एवढीच होती. एखादी शाळा सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची १२ मानके/निकष असतात. त्यातील दोन-चार निकषांचा अपवाद वगळता उर्वरित निकष पूर्ण नसल्याने ही शाळा बंद होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मुलांनी काढलेल्या रांगोळ्याही शाळा बंद झाली असती, तर या तिघींनाही अन्य शाळेत बदली मिळाली असती; मात्र गावाच्या हितासाठी आणि शाळेत येणाऱ्या त्या आठ-दहा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा बंद पडू द्यायची नाही, असा निर्धार या तिघींनी केला. इमारतीच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडून मिळणारे वार्षिक अनुदान अपुरे असल्याने अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी त्यांनी पदरमोड केली; तसेच सुरुवातीला त्यांनी रत्नागिरी शहरातील दानशूर व्यक्तींची भेट घेतली आणि त्यांच्याकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. शहरातील बांधकाम व्यावसायिक गुंदेचा आणि जैन संघटनेने त्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी बांधकामासाठी चिरे पुरवले आणि त्यातून शाळेची तात्पुरती कंपाउंड वॉल उभी राहिली. त्यानंतर इमारतीची दुरुस्ती हाती घेण्यात आली. त्यासाठी पाठपुरावा केल्यावर प्रशासनाने काही निधी उपलब्ध करून दिला. त्यातून छप्पराची उंची वाढवून त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यावर नवीन कौले बसविण्यात आली. त्यानंतर पुढच्या टप्प्यात इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली; तसेच ‘दी गिफ्ट ट्री’ संस्थेकडून मोफत मिळालेली झाडे परिसरात लावण्यात आली. यामुळे इमारत आणि परिसराचे सुशोभीकरण झाले. काही दानशूर व्यक्तींनी शालोपयोगी साहित्यही शाळेला दिले.

एवढे सगळे झाले, तरी पुरेशा पटसंख्येअभावी शाळा बंद होण्याची टांगती तलवार होतीच. ठरावीक कुटुंबांतील मुले सोडल्यास गावातील सर्व मुले रत्नागिरी शहर परिसरातील नामांकित मराठी, इंग्रजी शाळांत शिकत होती. त्यांच्या पालकांचे मन वळविण्याचे शिवधनुष्य या तिघींनी उचलले. मुख्याध्यापिका भागवत यांनी ‘ही शाळा तुमचीच असून, आम्ही केवळ सांभाळतोय. हे सगळे वैभव तुमचे आहे,’ असा विश्वास गावातील लोकांमध्ये निर्माण केला. त्यानंतर पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. ते शाळेत येऊ लागले आणि इथे काहीतरी चांगले घडत आहे याची खात्री त्यांना पटली. ग्रामस्थांचे खूप चांगले सहकार्य मिळू लागले. दरम्यानच्या कालावधीत शाळेतील मुलांची संख्या १८वर पोहोचली. आता गावातील सर्व लहान मुले कर्ला शाळेच्या अंगणवाडीत येतात आणि तीन-चार पालकांनी आपल्या पाल्याचे नाव चांगल्या खासगी शाळेतून काढून या शाळेत घातले. या शाळेतील मुले खासगी शाळेतील मुलांशी अभ्यासाबरोबरच इतरही बाबतींत स्पर्धा करत आहेत, त्या स्पर्धेत टिकत आहेत आणि स्वतःला सरस सिद्ध करत आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत या कर्ला जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी क्रमांक पटकावून आम्ही कुठेही कमी नाही हे दाखवून दिले. त्याचबरोबर चित्रकला, रांगोळी स्पर्धेतही यश मिळवत आहेत. या शाळेतील मुलांचे इंग्रजीही चांगले आहे, असे भागवतबाई अभिमानाने सांगतात.

कर्ला शाळेतील मुलांसमवेत शिक्षिका, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य.या धडपडीबाबत मुख्याध्यापिका भागवत म्हणाल्या, ‘आजही आम्हाला अनेक वस्तूंची गरज पडते, त्या वेळी दानशूर व्यक्तींकडे गेल्यावर त्यांना आम्ही ‘शाळेत या, आमच्या मुलांची प्रगती बघा आणि मगच आम्हाला मदत करा,’ असे सांगतो. ही शाळा उभी करण्यासाठी आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य निकिता बोरकर, मिलिंद हातफळे, वैभवी धुळप, श्रद्धा बंदरकर, प्रियांका माईण, साक्षी गोरे, वेदिका हातफळे, पूजा परशुराम, अनुया बाम, प्रेरणा जोशी, श्रुती आलीम, समीक्षा वालम, मुग्ध ढेपसे, मानसी राज्ये, नेहा नांदगावकर, प्रीती चव्हाण, पलक जोशी, मानसी कामतेकर यांची आम्हाला सर्वतोपरी मदत होत आहे. आम्हाला जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, पालक, कर्ला गावचे सरपंच दीपक सुर्वे, केंद्रप्रमुख हसीना शिरगावकर यांचे मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन मिळते. त्यांच्यामुळेच आम्ही हा टप्पा गाठू शकलो. नाईक कंपनीचे मॅनेजर शकूरभाई, फकी शेठ, किशोर चव्हाण, अप्पा चौघुले, शंकर आलीम, श्री. वालीम, श्री. माईण, नंदकुमार शेट्ये, स्वाती सोनार, श्री. मोरे, उदय लिमये, राजीव लिमये, संजीव लिमये, चंद्रशेखर भाटकर, देवेंद्र झापडेकर, श्री. कीर, श्री. सुपल आदी दानशूर व्यक्तींचे मोठे सहकार्य शाळेला मिळाले. स्वराज्य मित्रमंडळाने शाळेच्या इमारतीची सर्वप्रथम रंगरंगोटी करून दिली.’

‘अजूनही या शाळेसाठी खूप काही करायचे शिल्लक आहे. आमची शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनेल, या दृष्टीने काम करायचे आहे. प्रारंभी आम्ही आलो तेव्हा पहिलीचा आणि पाचवीचा वर्ग नव्हता. त्यामुळे पटसंख्या कमी होती. आज आमच्या शाळेत १८ मुले शिकत असून, येत्या शैक्षणिक वर्षात ही संख्या २०च्या वर जाईल, याची आम्हाला खात्री आहे,’ असा विश्वास भागवत व्यक्त करतात.

कर्ला मराठी शाळेच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि अन्य मान्यवर

क्रीडा स्पर्धेतील यशस्वी मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवआपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान बाळगून कर्ला मराठी शाळेतील या तिन्ही शिक्षिकांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्यातल्या मराठी शाळांवर संक्रांत येत असताना एका गावातील ही शाळा टिकवण्यासाठी या शिक्षिकांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या या धडपडीला सलाम! आपल्यालाही त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ द्यायचे असेल, तर त्यांच्याशी जरूर संपर्क साधा.

संपर्क :
संजीवनी भागवत : ९५६१६ १०५६६
वृषाली नाचणकर : ९४०३७ २८४०६
अनुप्रीता कोकजे : ९४०३४ ६२९२३  

(कर्ला मराठी शाळेबद्दलचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रज्ञा प्रकाश मुरकर About 340 Days ago
मराठी शाळा वाचवण्यासाठी आपली असलेली अखंड धडपड कौतुकास्पद देवाघरचे काम करताय खूप आनंद होत आहे
1
0
Jyotsna Sandeep Sohoni About 340 Days ago
We are proud of you and Idol of. Our village.
0
0
Poonam Shetye About 340 Days ago
खुपच छान! आभिमानास्पद कार्य
0
0
Good luck nn About 340 Days ago
Good
0
0
jyotsna Sandeep Sohoni About 340 Days ago
I fell proud of you and respect also.
0
0
Shefali Gamre About 340 Days ago
Very nice ,,&Really hard work,,hats off to all three teachers,
1
0

Select Language
Share Link