Next
माहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य
‘मृत्युंजय’कार पुरस्कार सोहळ्यात डॉ. विवेक सावंत यांचे प्रतिपादन
विवेक सबनीस
Wednesday, September 19, 2018 | 02:20 PM
15 0 1
Share this story

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र खेर यांना प्रदान करताना डॉ. विवेक सावंत

पुणे :
‘मराठी भाषा व साहित्याचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची ओरड एकीकडे सुरू आहे; मात्र माहिती-तंत्रज्ञानाच्या साह्याने मराठीची अस्मिता जपणे, तिचे अस्तित्व टिकविणे याबरोबरच मराठीचे संवर्धन करणेही शक्य आहे. तंत्रज्ञानात वेगात प्रगती होत असून, मराठी माणसाने मराठीचा वापर बोलताना, तसेच संगणक व मोबाइल फोनवरही करण्यासाठी जास्तीत जास्त संघटित होण्याची गरज आहे,’ असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांनी पंधराव्या ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत पुरस्कार सोहळ्यात केले. १८ सप्टेंबर २०१८ रोजी शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात ‘मराठी भाषा, साहित्य व तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. सावंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र खेर यांना, तर समाजकार्य पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांना डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुण्यातील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर दिवंगत सावंत यांच्या पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी सावंत आणि मृत्युंजय प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते. 

‘मराठी भाषा, साहित्य व तंत्रज्ञान’
‘मुले व नातवंडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातलेल्या आणि मराठीचे काय होणार या नावाने गळे काढणाऱ्या वर्गापासून प्रथम सावध राहिले पाहिजे,’ असा इशारा डॉ. सावंत यांनी दिला. ते म्हणाले, ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनीही सर्वसामान्यांना येणारी मराठी भाषा ही इंग्रजीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ती ज्ञानभाषा व्हायला हवी, अशी रणनीती तयार केली होती. त्या अर्थाने मराठी भाषा ही केवळ मनोरंजनापुरती न राहता ज्ञान व उत्तम साहित्य निर्माण करणारी व्हायला हवी. त्यासाठी मराठीतील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यवहार सुधारण्याकरिता प्रमाणभाषाही दुर्बोध न करता ती लोकभाषेशी जोडली गेली पाहिजे.’ 

मराठीतून ज्ञाननिर्मिती
‘यात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असून मराठीतून ज्ञाननिर्मिती व उत्तम साहित्याची एक परिसंस्था (इकोसिस्टिम) तयार होणे गरजेचे आहे,’ असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘आपल्या मोबाइल फोनवरील मराठी की-बोर्डवर मराठीत टंकलेखन करा व तेथील माइकसमोर जास्तीत जास्त मराठीतून बोला. त्याचे ध्वनीआरेखन (व्हॉइस पॅटर्न) नोंदले जाऊन त्यातून माहितीचे मोठे साठे (कॉर्पस) गुगलवर बनतील. त्यातून स्वयंसुधारित व स्वयंदुरुस्त (सेल्फ-इम्प्रूव्हिंग व सेल्फ-करेक्टिंग) भाषा व तिचे अन्य भाषांमधील निर्दोष भाषांतर मराठीत उपलब्ध होईल.’

वसुधैव मार्केटम्
डॉ. सावंत म्हणाले, ‘गुगलवरील सर्व पाने व माहिती आजच्या वेगवान तंत्रज्ञानाने संपूर्ण मराठीतून मिळणे लवकरच शक्य होणार आहे. ही सेवा गुजराती भाषेत आधीच उपलब्ध झाली. कारण ते तांत्रिक व्यवहारात त्यांचीच भाषा वापरतात. तंत्रज्ञानाला स्थानिक व जागतिक बाजारपेठेची भाषा कळते. त्या अर्थाने तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक जगाकडे ‘वसुधैव मार्केटम्’ या दृष्टीने पाहातात! हे लक्षात घेतले तर आपणही तंत्रज्ञानात केवळ मराठीचाच वापर करण्याचा आग्रह धरला पाहिजे.’ 

भाषेच्या अमरत्वाचे पॅटर्न्स
‘मोबाइलवरचा हाताने लिहिला जाणारा मजकूर (हँडरायटिंग मोड) व बोलता येणारा (स्पीच मोड) मजकूर आपण टंकलिखित न करता जसाच्या तसा दुसऱ्याला मराठीतून पाठवू शकणार आहोत. मोबाइलवर हे आजही शक्य आहे,’ असे डॉ. सावंत यांनी या वेळी सप्रमाण दाखवून दिले. ‘केवळ आपल्या बोलण्यातून गुगलवर मराठी भाषेच्या अमरत्वाचे पॅटर्न्स तयार होण्यास मदत होईल. यातूनच बोलण्यातून जलद अनुवाद (व्हॉइस ट्रान्स्लेशन) शक्य होऊन मराठी शेतकरी ब्राझीलच्या शेतकऱ्याशीही आपल्या भाषेतून संवाद करू शकणार आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या या प्रचंड झेपेमुळे ग्रामीण, शहरी, गरीब व वंचित मुलांना आयुष्याची १५ वर्षे इंग्रजी शिकण्यात खर्च करावी लागणार नाहीत. कारण जगातील सर्व ज्ञान मराठीतच उपलब्ध होईल! फक्त या संक्रमण काळात मराठीला आपण नीट सांभाळले पाहिजे व तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरापासून जागृत केले पाहिजे.’ 

परंपरा तंत्रज्ञानामुळे अधिक समृद्ध
‘साहित्य व तंत्रज्ञानाचा संबंध असून, तो स्वत:शी, समाजाशी व निसर्गाशी संवाद साधत समाजाला सुसंस्कृत बनवतो. मराठीतील या मौखिक व लिखित परंपरा तंत्रज्ञानामुळे यापुढे अधिक समृद्ध होतील,’ असा विश्वाीस डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानामुळे काम न करणाऱ्या वर्गाची निर्मिती होत असली, तरीही मानवी क्षमता वाढून, नव्या ऊर्मी व सर्जनशीलता वाढणे तंत्रज्ञानामुळे शक्य होईल. तो समाज खूप विषमतावादी झाला, तर त्याला समतावादी बनवताना साहित्यिकांची साहित्याची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. असे घडले, तर महात्मा गांधींना अभिप्रेत असणारी मानवी अर्थशास्त्रीय संकल्पना प्रत्यक्षात येईल व भाषिक आशयाला महत्त्व निर्माण होईल.’     

‘मृत्युंजय’चा महिमा
आपल्या प्रास्ताविकात डॉ. सागर देशपांडे यांनी शिवाजी सावंत यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी मृत्युंजय कादंबरी ज्या ठिकाणी लिहिली, त्या आजरा येथील त्यांच्या कामाचा गौरव केला. ‘मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे गेल्या १४ वर्षांमध्ये १४ साहित्यिक आणि तितक्याच सामाजिक संस्था वा व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. दिल्लीत माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीही मृत्युंजय कादंबरीसंबंधी आपले विचार मांडले होते. हजरतबल दर्ग्यात अतिरेक्यांशी लढताना आपल्याला मृत्युंजय या कादंबरीचा आधार होता, असे एका जवानाने सांगितले होते,’ असे डॉ. देशपांडे म्हणाले. 

पुरस्कार सोहळ्यात (डावीकडून) मृणालिनी सावंत, डॉ. सागर देशपांडे, पुरस्कार विजेते राजेंद्र खेर, डॉ. विवेक सावंत, पुरस्कार विजेत्या रेणू गावस्कर आणि अमिताभ सावंत.

वडिलांना मिळालेला पुरस्कार मलाही मिळाल्याचा आनंद : डॉ. राजेंद्र खेर
‘शिवाजीराव सावंत यांच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारामुळे धन्य झाल्याची जाणीव होत आहे. वडील भा. द. खेर यांना तिसरा व मला आता १५वा ‘मृत्युंजय’कार पुरस्कार मिळत असल्याचा आनंद आहे,’ अशी भावना साहित्यिक राजेंद्र खेर यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली. ‘माझ्यासारख्या लेखकालाही बळ देण्याचे औदार्य शिवाजीरावांनी दाखवले. तसेच स्वत:च्या लेखनाने मराठी साहित्य समृद्ध करण्याचे अलौकिक कर्तृत्व मला प्रेरणादायी ठरले. इसवी सनापूर्वीचे साहित्यिक दालनच शिवाजीरावांनी आपल्यापुढे उभे केले आहे. ती प्रेरणा घेऊन मी ‘गीतांबरी’ किंवा ‘धनंजय’ यांसारख्या यशस्वी कादंबऱ्या लिहू शकलो. ज्यांचा चांगला परिणाम होतो, ते साहित्य असून त्यातून केवळ सत्य न शोधता चांगले विचार मांडता आले पाहिजे. सतारीत जसा पंचम व षड्ज लागला, तर आपोआप गंधार व्यक्त होतो, तसे बुद्धी व आध्यात्म यातून चांगल्या साहित्याची निर्मिती होत गेल्याची अनुभूती लिहित असताना येत गेली,’ असे खेर म्हणाले.

रेणू गावस्कर यांना पुरस्कार प्रदान करताना डॉ. विवेक सावंत

पुरस्कारामुळे धन्यता : रेणू गावस्कर
‘हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल धन्यता वाटते आहे; मात्र वंचित मुलांसाठी मला अजून खूप काही करायचे असल्यामुळे संकोच वाटतो,’ असे रेणू गावस्कर यांनी सांगितले. ‘मृत्युंजय कादंबरीतून कर्णाच्या उतुंग दातृत्वाची जाणीव झाली. समाजाला काही तरी देत राहिले पाहिजे, याची जाणीव माझे बोट चिमुकल्या मुलांनी हाती धरून व माझे माझे गुरू बनून करून दिली. अमीर या मुलाचे ते चिमुकले नाजूक बोट हातात नसते, तर आज ते शक्य झाले नसते. वंचित, गरीब, अनाथ व देवदासींच्या मुलांना प्रेम देण्याची प्रेरणा त्यातून येते. आजही आपले बालपण बाजूला ठेवून काम करणाऱ्या मुलांना त्यांच्या खेळाच्या व शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून लांब राहावे लागत असल्याची जाणीव होऊन मन तुटते. आणखी बऱ्याच मुलांपर्यंत अजून पोहोचायचे आहे, याची जाणीव या पुरस्कारामुळे होते,’ असे गावस्कर म्हणाल्या. 
   
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले, तर अमिताभ सावंत यांनी आभार मानले. 

(शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा, तर त्यांची अन्य पुस्तके मागविण्यासाठी येथे क्लिक करा. राजेंद्र खेर यांची पुस्तके मागविण्यासाठी येथे, तर रेणू गावस्कर यांची पुस्तके मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(राजेंद्र खेर आणि रेणू गावस्कर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijaya paturkar. About 154 Days ago
Nice
0
0

Select Language
Share Link