Next
‘एकपात्री कला रंगभूमीसाठी वरदान’
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 02:49 PM
15 0 0
Share this story

एकपात्री कलाकार परिषदेतर्फे आयोजित ‘रंग एकपात्रीचे’ कार्यक्रमात दिलीप हल्याळ यांचा सत्कार करताना सुहासिनी देशपांडे व डॉ. सतीश देसाई. शेजारी अरुण पटवर्धन, मकरंद टिल्लू, चैताली माजगावकर आदी.

पुणे : ‘नेपथ्य, प्रकाश योजना, कलाकारांचे मानधन या वाढत्या खर्चामुळे सध्या रंगमंदिरात नाट्य प्रयोग कमी होताना दिसतात; मात्र, संयोजनाच्या सहजतेमुळे आणि सादरीकरणाच्या ताकदीमुळे गावोगावी एकपात्री कार्यक्रमांची संख्या वाढते आहे. नवनवीन कलाकार घडवून रंगभूमीला पुढे नेण्यात एकपात्री महत्त्वाचे योगदान देत आहे. म्हणून एकपात्री कला ही रंगभूमीसाठी वरदान ठरत आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी केले.

प्रसिद्ध एकपात्री कलाकार स्व. मधुकर टिल्लू यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषदेतर्फे ‘रंग एकपात्रीचे’ या विशेष कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, हसायदान फाउंडेशनचे मकरंद टिल्लू, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष अरुण पटवर्धन, सचिव चैताली माजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलागौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप हल्ल्याळ यांचा सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते सत्कार यावेळी करण्यात आला.

देशपांडे म्हणाल्या, ‘नाटकांत अनेक पात्र असतात. त्यामुळे सादरीकरण सोपे जाते; मात्र एकपात्री कलेत सगळी पात्र एकाच व्यक्तीला निभवावी लागतात. अशावेळी त्या कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो. याच कसदार अभिनयाच्या जोरावर एकपात्री कलाकार प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये मी काम केले आहे; मात्र, एकपात्री कला सादर करण्याची माझी इच्छा आहे.’

डॉ. देसाई म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कौतुकाची थाप मिळालेल्या मधुकर टिल्लू यांचे एकपात्री कलेसाठीचे योगदान मोठे आहे. मधुकरजी हे मराठी गझल, शायरी आणि एकपात्री कलेतले दादामुनी आहेत. त्यांचा हा वारसा तिसरी पिढी अतिशय समर्थपणे पुढे नेत आहे, याचा आनंद वाटतो.’

मकरंद टिल्लू म्हणाले, ‘मराठी रंगभूमीवर एकपात्री कलेची मोठी परंपरा आहे. पहिल्या पिढीतील कलाकार असलेल्या मधुकर टिल्लू यांनी नव्या पिढीतील कलाकार तयार करण्याचे काम केले. त्यांच्याच प्रेरणेतून काम करत असलेली एकपात्री कलाकार परिषद या उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत आहे.’

सुहासिनी देशपांडे यांनी ‘चिरंजीव आईस’ या नाटकातील प्रसंग आणि डॉ. देसाई यांनी ‘हेमा मालिनी’ यांच्या नववारी साडीचा किस्सा सांगत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राशींचे रंगतदार स्वभाव विश्वास पटवर्धन यांनी सादर केले. खान्देशी ठेवा कल्पना शिरोडे यांनी दिला. ‘नटखट नारायण सादर करून अरुण पटवर्धन यांनी रंगत आणली, तर किस्से सांगून दीपक रेगे यांनी, आवाजाच्या जादूने योगेश सुपेकर यांनी, विनोदी सादरीकरणाने दिलीप हल्याळ आणि मंजिरी धामणकर धम्माल केली. हशा आणि टाळ्यांनी रसिकांनी दाद दिली. सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले. तर आभार चैताली माजगावकर यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link