Next
‘इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान’
संबित पात्रा यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, July 20, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण  समारंभात बोलताना डॉ. संबित पात्रा

पुणे : ‘इतिहासाची जाणीव असल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी येथे केले. 

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवारी डॉ. पात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकारासाठीच्या पुरस्कारासाठी ‘आज का आनंद’चे समूह संपादक श्याम आगरवाल,  युवा नवोदित पत्रकार पुरस्कारासाठी दै. दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीचे सिद्धाराम पाटील, व्यंगचित्रकार पुरस्कारासाठी बारामतीचे शिवाजी गावडे आणि सोशल मीडिया पुरस्कारासाठी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’चे विश्वनाथ गरुड यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकारासाठी २१ हजार रुपये रोख आणि उर्वरित तीन पुरस्कारांसाठी प्रत्येकी अकरा हजार रोख, मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह श्रीकृष्ण कानेटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी डॉ. पात्रा म्हणाले, ‘देशाने राजकीय नेत्यांना डोक्यावर बसवून ठेवले आहे, ही देशाची दुर्दैवी परिस्थिती आहे. संपन्नतेसाठी संवाद आवश्यक आहे आणि त्यासाठी विश्व संवाद केंद्राचे कार्य महत्त्वाचे आहे. तुमच्या देशात मोठी व्यक्ती होऊ शकत नाही, हे पाश्चात्यांनी आपल्या मनावर बिंबवले आहे. इंग्रजांनी जाणीवपूर्वक येथील ज्ञान नष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ते ज्ञान पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. भारतातून भारतीयता काढून घेतल्यास भारत भारत राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक वर्गाने आपापले आदर्श भारतीय परंपरेतून शोधायला हवेत. आरोग्य क्षेत्राने चरक आणि धन्वंतरींना आदर्श मानायला हवे, नोकरशाहीने विश्वकर्मांना आदर्श मानायला हवे, तर पत्रकारांनी नारदांना आदर्श मानायला हवे. देश आणि राष्ट्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण राष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे’. 

पत्रकार म्हणून देवर्षी नारदांच्या भूमिकेचे विवेचन करताना ते म्हणाले, ‘सत्तेजवळ राहूनही सत्ताधाऱ्यांकडून काही मागायचे नाही हे नारदांकडून शिकायला हवे. तसेच देशाचा इतिहास पुढील पिढ्यांसाठी संग्रहित व्हावा, ही पत्रकारांची जबाबदारी आहे. देव आणि असुर यांच्यासह सर्व मानवांचे कल्याण व्हावे, यासाठी नारदांनी कार्य केले. त्याचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा’. 

पुरस्कारार्थी विश्वनाथ गरुड, सिद्धाराम पाटील, श्याम आगरवाल व शिवाजी गावडे यांच्यासह संबित पात्रा आणि मान्यवर

या वेळी श्याम अगरवाल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘मी पत्रकारितेत आलो हा केवळ योगायोग होता. वृत्तपत्र चालविण्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर वेडेपणा पाहिजे. वृत्तपत्रे स्वातंत्र्यापूर्वीही होती; मात्र त्या वेळी वृत्तपत्रांचा खप मर्यादित होता. आजच्या काळात संपादक व पत्रकारांची जबाबदारी खूप वाढली आहे’. 

मनोहर कुलकर्णी म्हणाले, ‘देवर्षी नारदांना केवळ विश्व संवाद केंद्राने नव्हे, तर अनेकांनी पहिले पत्रकार मानले आहे. नारद हे पहिले संदेशवाहक आहेत. ‘सदक्षणाय खलनिग्रहणाय’ हे त्यांचे ब्रीद होते. नारदांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे; मात्र आपण नारदांचे स्मरण पुरेशा प्रमाणात करत नाही’. 

महेश आठवले म्हणाले, ‘वाक्याचा अर्थ कसा लावायचा याचे अनेक नियम आहेत. पत्रकारांनी हे समजून घ्यायला हवे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, भाषेचा अर्थ कळावा यासाठी डीईएस प्रयत्न करत आहे’. 

कानेटकर यांनी आभार प्रदर्शन केले, तर आसावरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search