Next
राम गणेश गडकरी, स. अ. शुक्ल, ग. ल. ठोकळ
BOI
Saturday, May 26 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘महाराष्ट्राचे शेक्सपियर’, ‘प्रेमाचे शाहीर’, ‘विनोदी साहित्यातील बिरबल’ अशा सार्थ विशेषणांनी गौरवण्यात येणारे राम गणेश गडकरी, कवी, गीतकार आणि नाटककार स. अ. शुक्ल आणि कथाकार, कादंबरीकार ग. ल. ठोकळ यांचा २६ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
राम गणेश गडकरी 

२६ मे १८८५ रोजी नवसारीमध्ये (गुजराथ) जन्मलेले राम गणेश गडकरी हे सरस्वतीच्या दरबारातील प्रतिभासम्राट साहित्यिक म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांना ‘महाराष्ट्राचे शेक्सपियर’, ‘प्रेमाचे शाहीर’, ‘विनोदी साहित्यातील बिरबल’ अशा अनेक विशेषणांनी नावाजलं गेलं. 

‘गोविंदाग्रज’ नावाने ते कविता करत असत. वाग्वैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत आणि चारोळ्यांपासून ते कैक पानं भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अतिशय वैविध्यपूर्ण कविता त्यांनी लिहिल्या. 

त्यांच्या अद्भुत प्रतिभाशक्तीचा प्रत्यय देणारी ‘पहिले चुंबन’ ही कविता -

जें मनास शिवले नाही । ठावे न कल्पनेलाही। सुख असे।
जे दिसे न कवण्या जागी। जे अवर्ण्य वाणीलागी। सुख असे।
कविताही प्रतिभाशाली। कल्पितां जयातें थकली। सुख असे।
एकदा । कष्टता सदा । पुढति नच कदा- ।
अनुभवा येई । ते पहिले चुंबन देई । सुख असे॥१॥

चित्रासह रमणी बसली। नवयौवन शोभा ठसली। तन्मुखी।
करि ठेवुनी कोमल गाला । करि विचार न कळे कसला। सारखी।
डोले न अथवा हाले । मग कुठले बोले चाले। चित्र ते।
रंजना। मुग्धयौवना। करित कल्पना।
भावी कालाची । (तुज ठावे) त्या दिवसाची। दिवस तो॥२॥

चित्र हे पाहुनी असले । नेत्रांचे सार्थक झाले। वाटले।
परि तरंग अद्भुत उठले। अनुभवा न पूर्वी आले। जे कधी।
जाउनी चोरट्या चाली । झाकिले नयन करजाली। न कळता।
संभ्रमे । दचकली गमे। त्वरित विभ्रमे।
श्रमवि कर दोन्ही। काढाया नयनावरुनी । मम करा॥३॥

तो बघुनी उघड्या गाला। उन्माद मानसी भरला। स्वैरसा।
संमोह पडे नयनांला। मज विसर जगाचा पडला। क्षणभरी।
ठेवुनी मुख सखीच्या गाली। आणिली गुलाबी लाली। त्यावरी।
हासली। फार लाजली। दूर जाहली।
एक निमिषांत। झिडकारुनी माझा हात। हसतची॥४॥

हा खेळ एक निमिषांचा। एकदाच अनुभव त्याचा । नच पुन्हा ।
ते वारे आले गेले। जन्माचे सार्थक झाले। परि गमे।
ते निमिष, स्थिती ती, सुख ते। चित्ताच्या दृष्टिस दिसते॥ सारखें! ॥
स्वानंद - कमलमकरंद। सुधानिस्यंद।
भूवरी आणी। जे वर्णावे ते कोणी । सुख तसे॥५॥

एकदाच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा। एकदां।
आयुष्य न त्याला क्षणही। जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदा ।
मनि चटका लावायासी। पाठवी दैव जणु त्यासी। एकदा।
निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी।
मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥६॥

किर्लोस्कर कंपनीत नाटकांसाठी पदं लिहिता लिहिता त्यांनी नाटकंही लिहिली. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन, प्रेमसंन्यास, राजसंन्यास, वेड्यांचा बाजार ही त्यांची नाटकं अजरामर आहेत. ‘बाळकराम’ या टोपणनावानं त्यांनी केलेलं विनोदी लेखन ‘संपूर्ण बाळकराम’ नावानं उपलब्ध आहे. 

त्यांची एक अद्भुत निर्मिती म्हणजे ‘एकही जोडाक्षर नसलेलं' 'चिमुकली इसापनीती.’ हे पुस्तक त्यांनी बाळगोपाळांसाठी लिहिलंय. 

निष्प्रेम चिरंजीवन ते जगी दगडालाही मिळते। अधिक तया । क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा । त्यापुढे कितीही ।।’ असं आगळं तत्त्वज्ञान ते सांगून गेले. 

२३ जानेवारी १९१९ रोजी सावनेरमध्ये (नागपूर) त्यांचं निधन झालं.

(राम गणेश गडकरींच्या काही कवितांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी, कवितांचे अभिवाचन पाहण्यासाठी  https://goo.gl/Ye3W6Q येथे क्लिक करा. त्यांचं साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/vUizrY येथे क्लिक करा.)
........

सदाशिव अनंत शुक्ल 

२६ मे १९०२ रोजी जन्मलेले सदाशिव अनंत उर्फ स. अ. शुक्ल हे कवी, नाटककार, पटकथाकार आणि लघुकथाकार म्हणून प्रसिद्ध होते. ‘कुमुदबांधव' नावाने त्यांनी काव्यलेखन केलं होतं. त्या काळी त्यांची ‘तू तिथे अन्‌ मी इथे हा’सारखी अनेक भावगीतं आणि ‘दूर व्हा सजणा येऊ नका’ अशी चित्रपटगीतं लोकप्रिय होती.

असत्याचे प्रयोग, आम्ही एकशेपाच, वीर अभिमन्यू, चंदनबन, चंद्रावर मधुचंद्र, चार चांदण्या, जंगल्या भिल्ल, जनता अमर आहे, जयजयवंती, जयद्रथ वध, झुणका भाकर, देव जागा आहे, नवलनगरची राजकन्या, नवी राजवट, नाटक...नाटक भाग १ ते ३, बनला बैरागी राजा, मंगला, सं. साध्वी मीराबाई, रंगतरंग, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२७ जानेवारी १९६८ रोजी त्यांचं निधन झालं.
.......

गजानन लक्ष्मण ठोकळ 

२६ मे १९०९ रोजी जन्मलेले गजानन लक्ष्मण ऊर्फ ग. ल. ठोकळ हे कथाकार, कादंबरीकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध होते.  

गावगुंड, टेंभा, ठिणगी, कडू साखर, कोंदण, मीठभाकर, क्षितिजाच्या पलीकडे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२२ जुलै १९८४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link