Next
‘मराठी माणसाची लक्षणीय प्रगती’
विवेक सबनीस
Tuesday, May 01, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून मराठी माणसांनी, महाराष्ट्र राज्याने खूप गोष्टी मिळवल्या; मात्र अनेक गोष्टींचे उद्दिष्ट अद्यापही साध्य झालेले नाही. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने, इतिहासातील काही महनीय व्यक्तींच्या विचारांना उजाळा देऊन आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींशी संवाद साधून राज्याच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...
..............
मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात क्रांतिकारक विजय मिळवला, तो दिवस म्हणजे एक मे १९६०. ‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागली, गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ ही शाहीर अमर शेख यांची ललकारी तेव्हा सर्वत्र दुमदुमली! गेल्या पावणेसहा दशकांमध्ये मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा लक्षणीय विकास झाल्याची प्रतिक्रिया आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी दिली. 

फोटो सौजन्य : prahaar.in‘जीवनातील माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये याचि देही याचि डोळा दिसली, म्हणजे माझी कोणतीच इच्छा उरणार नाही,’ असे जाहीर उद्गार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भारतरत्न महर्षी कर्वे यांनी वयाच्या १०१व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा काढले होते! मुंबईतील या सभेच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. आयुष्याच्या अखेरीला कळकळीची इच्छा व्यक्त करणाऱ्या या बुजुर्गाचे भावपूर्ण आवाहन ऐकून श्रोते त्या वेळी गहिवरले होते! 

संयुक्त महाराष्ट्र झालेल्या या मधल्या काळात मराठी माणसाला काय मिळाले आणि मराठी भाषा किती वाढली याबाबत मतमतांतरे आहेत. असे असले तरीही गेल्या पावणेसहा दशकांमध्ये मराठी माणसाला खूप काही मिळाले आणि मराठी भाषेला काही मिळायचे राहून गेले अशी संमिश्र प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी व्यक्त केली. 

डॉ. सदानंद मोरेगेल्या शंभर-दोनशे वर्षांमधील सामाजिक, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले, ‘भाषावार प्रांतरचनेनुसार लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य स्थापन झाले ही चांगली गोष्ट आहे. गेल्या पावणेसहा दशकांमध्ये महाराष्ट्रात काय चांगले झाले, असे म्हणत असताना काहीच झाले नाही असेही म्हणणे चूक आहे. कालप्रवाहात अशा दोन्ही गोष्टी घडत असतात. आपले राज्य जास्तीत जास्त चांगले कसे चालवता येईल याचे प्रयत्नही बरेच झाले.’ 

‘भाषावार प्रांतरचनेमुळे त्या त्या भाषेला बळ मिळत गेले. मराठी भाषेचे प्रश्न सुटतील ही अपेक्षा मात्र अजून म्हणावी तितकी पूर्ण झाली नाही. मराठी संपूर्ण राजभाषा होणे अपेक्षित होते. मराठी माणसासाठी या कालखंडातील सुरुवातीची २५ वर्षे चांगली परिस्थिती होती. नंतर ती तितकी राहिली नाही. ग्रामीण व शहरी भागांचे प्रश्नग व त्यांचे स्वरूप बदलत गेले. शेतकऱ्यांचे प्रश्नग बदलत गेले व अधिक गुंतागुंतीचे बनले. शहरी भागासंबंधी सांगायचे तर आपल्याकडच्या गिरण्या संपल्या. जगभरात, तसेच इंग्लंडसारख्या देशांतही अशा प्रकारचेच बदल होत गेले आहेत. संयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत, हे आपली कृती व कर्म यावर आवलंबून आहे,’ असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. 

उल्हास पवारकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व भाष्यकार उल्हास पवार यांनी मराठी राज्याच्या निर्मितीवेळी १०५ मराठी जनांनी दिलेल्या बलिदानाप्रीत्यर्थ त्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, ‘अनेक राजकीय नेते व पुढारी यांनी हा लढा लावून धरला, त्याप्रमाणेच साहित्यिक, पत्रकार व संपादकांनीही त्याला मोठा हातभार लावला आहे. १९४६मधील बेळगावच्या संमेलनात संमेलनाध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकरांनी संयुक्त महराष्ट्रासंबंधीचा ठरावच मंजूर करून घेतला होता. यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ हे सारेच यात आघाडीवर होते. काँग्रेस कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा इंदिरा गांधींनीही यासंबंधी प्रस्ताव मांडला होता.’ 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या १०५ जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईत उभारलेले हुतात्मा स्मारकप्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणि पेंडसे यांच्यासारख्या मंडळींच्या पाठिंब्यातूनच संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नांची पूर्तता झाली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ‘असे असले तरी ज्या कारणासाठी म्हणजे मराठी भाषेत महाराष्ट्राचा कारभार होणे अपेक्षित होते तसे प्रयत्न झाले, पण ते अगदी हळूहळू होत राहिले. मराठीतून राज्यकारभार या धोरणाची अधिक प्रामाणिकपणाने कार्यवाही होणे अपेक्षित होते, ते मात्र झालेले दिसत नाही,’ असे ते म्हणाले.

मराठी माध्यमातून शिक्षण हा विषयही मागे पडत गेल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. रामकृष्ण मोरे यांनी सेमी इंग्रजी माध्यमाद्वारे मुलांचे मराठीतून इंग्रजी माध्यमात जाणे थोपवण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी मराठीतून शिक्षणासंबंधी शिक्षणसंस्थांकडून व्हायला हवे तसे प्रयत्न झाले नाहीत. तसेच पालकांमध्येही या बाबतीत उदासीनता वाढत गेली. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बिगर मराठी भाषांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केल्याचे श्रेय मुख्यमंत्री देशमुख व शिंदे यांना जाते.’

‘मराठी मातृभाषेतून शिक्षण घेऊन मोठे शास्त्रज्ञ बनलेले डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. वसंत गोवारीकर ही नावे आपण विसरू शकणार नाही. विरोध इंग्रजीला नसून, मातृभाषेकडे दुर्लक्ष होता कामा नये,’ असे सांगून पवार म्हणाले, ‘केवळ मराठी भाषाच नव्हे, तर मराठी खेळ, पोषाख आणि अगदी खाद्य संस्कृतीवरही याचा परिणाम झाला आहे. त्याउलट दक्षिण व उत्तरेकडील बहुतेक राज्यांनी आपली भाषिक सांस्कृती अधिक जपली आहे. तसेच दक्षिणेकडील सर्व प्रांतांत स्थानिक भाषेची जपणूक होताना ते इंग्रजीचा वापरही उत्तम करताना दिसतात. आपण मराठी संस्कृतीबद्दल केवळ तावातावाने बोलतो, प्रत्यक्षात तसे वागत नाही. असे असले तरीही भागवत व संतवाङ्मयाची मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. मराठीत आज चांगले साहित्य, उत्तम नाटके, दलित व आदिवासी साहित्य यात मोलाची भर पडताना दिसते.’
  
प्रा. सुहास पळशीकरप्रसिद्ध राजकीय विश्लेाषक प्रा. सुहास पळशीकर म्हणाले, ‘मराठी भाषा, तिचे भवितव्य व तिचा विकास याबद्दल होत असणारी चर्चा निरर्थक आहे. सरकारपेक्षा हा प्रश्न  लोकांच्या पातळीवर सुटला गेला पाहिजे. मुख्य म्हणजे मराठी भाषेपुढील नवीन आव्हाने पाहता त्यातून निर्माण होणारे असमाधान हे एक प्रकारे चांगले लक्षण आहे. कारण त्यातूनच मराठीचा विकास होईल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मराठी माणूस किंवा त्यापेक्षा मराठी समाज महाराष्ट्र स्थापनेनंतर तुलनेने समाधानकारक राहील, अशी अपेक्षा होती. प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र हा मुंबईच्या जिवावर आहे; पण महाराष्ट्र राज्य म्हणून मराठवाडा व विदर्भ यांच्यात कोणतीही सांस्कृतिक एकात्मता दिसत नाही. तसेच त्यांची स्वत:ची ओळख निर्माण झाली नाही. कारण मुंबईबाहेर महाराष्ट्राची भौतिक प्रगती समाधानकारक नाही. याचे कारण आपण मराठी समाज म्हणून सर्वांगीण विचार केलेला दिसत नाही.’
 
राजकीय परिस्थितीसंबंधी बोलताना प्रा. पळशीकर म्हणाले, ‘राजकीय नेते हे सगळीकडे वा सगळ्या राज्यांमध्ये सारखेच असतात. असे म्हटले जायचे, की महाराष्ट्रातील राजकारण एकेकाळी सभ्यतेच्या पातळीवर होते; पण आज राजकीय कार्यकर्त्यांचे खून, दाभोळकर-पानसरे हत्या, महिलांवरील अत्याचार वगैरे लक्षात घेता तसे चित्र दिसत नाही. आपल्याकडे राजकीय आव्हाने पुष्कळ आहेत.’ 

‘उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तसेच केरळ अशा राज्यांइतका महाराष्ट्राचा भूप्रदेश मर्यादित नाही,’ असे सांगून प्रा. पळशीकर म्हणाले, ‘यातूनच महाराष्ट्राचे राजकीय, प्रशासकीय कामकाज व विकास याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. महाराष्ट्राचा आहे तो मोठा आकार तोच ठेवून विकास व प्रशासन यासाठी कार्यक्षमतेबाबत काही ठोस काम करावे लागेल.’ 

डॉ. न. म. जोशीमराठी भाषा व साहित्य यासंबंधी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठीपणाला एक निश्चित असे अधिष्ठान लाभले. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी तातडीने मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्वतंत्रपणे स्थापना केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठीतल्या विश्विकोशाच्या कामाला सुरुवात केली. त्यापूर्वी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी ज्ञानकोशाच्या कामाचा आरंभ केला होता. याचा एक चांगला परिणाम म्हणजे साहित्य चळवळीला चालना मिळाली.’
 
‘१९६०पूर्वी साहित्य संमेलने ही केवळ अभिजन वर्गासाठीच मर्यादित होती, ती बहुजनांसाठीही झाली,’ असे सांगून न. म. जोशी म्हणाले, ‘या साहित्य जागृतीतून सर्वसामान्य मराठी माणूसही साहित्य प्रवाहात अनिवार्यपणे येऊ शकला. मराठी साहित्य हे खऱ्या अर्थाने बहुमुखी झाले व त्यातून या चळवळीचे ईप्सित साध्य झाले. यातून संमेलनासाठी मोठा खर्च होतो, अशा टीका मान्य केल्या तरी साहित्याचा प्रसार मोठा झाला. विशेष म्हणजे वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांना प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार याच काळात मिळाला. तसेच गावाकडील माणूस व शेतकरीही कविता लिहू लागला, हीच मराठीची थोरवी आहे.’

फोटो सौजन्य : MeMumbai.com

‘असे असूनही मराठी शिक्षणावर मात्र इंग्रजी भाषेचे आणि माध्यमाचे आक्रमण झाले. माहिती तंत्रज्ञानामुळे इंग्रजीकडे ओढा वाढून मराठी शाळा ओस पडण्यास पालकही कारणीभूत आहेत. असे असले तरी, एके काळी याच मराठी शाळेत शिकून मोठे झालेले बी. जी. देशमुखांसारखे प्रशासकीय अधिकारी उत्तमरीत्या इंग्रजी बोलत होते,’ असे न. म. जोशी म्हणाले.

‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीने मराठी माणसाला स्वत:ची अस्मिता सापडली,’ असे सांगून न. म. जोशी म्हणाले, ‘किर्लोस्कर, ओगले आणि गरवारे यांच्यासारखे मराठी उद्योगपती याच काळात निर्माण झाले. ग्रामीण भागातील अनेक माणसे परदेशात जाऊन संशोधन करू लागली. असे असतानाही मराठीला वाईट दिवस आले आहेत, अशी आज होणारी ओरड साहित्यबाह्य आणि संस्कृतीबाह्य आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजाचा सांस्कृतिक दृष्टिकोन बदलायला हवा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीप्रमाणे एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यासारख्या नैतिक अधिष्ठान लाभलेल्या नेत्यांचे नेतृत्व लाभले, तर भविष्यात मराठी माणूस आणखी मोठी भरारी घेईल.’

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील दिवंगत नेत्यांचे विचार :
प्रा. ग. प्र. प्रधानज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जात असे. येथे बहुसंख्य जनता मराठी असतानाही मुंबईचे स्वतंत्र राज्य व्हावे, असा निर्णय तेव्हा पं. नेहरूंनी नेमण्यात आलेल्या फाजलअली, कुंझरू आणि पणीकर समितीने घेतला. या अन्यायाविरोधात मराठी जनता पेटून उठली आणि मुंबई, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, तसेच सौरुरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा करून संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा केली. जनतेचा हा उठाव दडपून टाकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दंडशक्तीचा वापर केल्याने व मुंबईतील गोळीबारात १०५ जण हुतात्मा झाले. भांडवलदारांप्रमाणेच मराठी भाषक कामगारांच्या श्रमातून मुंबईचे वैभव निर्माण झाले आहे. मराठी जनतेचा लढा गुजराती जनतेच्या विरुद्ध नाही, हे लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची भूमिका सोडायला हवी, अशी मागणी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एस. एम. जोशी, भाई डांगे, आचार्य अत्रे आणि मराठवाड्याचे उत्तमराव पाटील यांनी नेतृत्व केले होते. १९५७च्या विधानसभा निवडणुकीत पश्चितम महाराष्ट्रात काँग्रेसचा संपूर्ण पराभव झाला आणि मतदारांनी निःसंदिग्धपणे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने कौला दिला. हा विजय जनतेच्या इच्छाशक्तीचा आहे, अशी भूमिका आम्ही मांडली होती.  

एस. एम. जोशीएस. एम. जोशी (संयुक्त महाराष्ट्र स्थापनेपूर्वी) :
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे आपले साध्य असून, आपल्याला मोठे परिवर्तन घडवून आणायचे आहे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही लोकशाहीच्या स्वयंसिद्ध तत्त्वावर आधारलेली असल्याने ती लोकशाहीच्या व शांततेच्या मार्गानेच मिळवली जाईल. भाषेच्या आधारावर घटक राज्ये निर्माण होत असताना आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र हवा आहे. यासाठी आपल्याला वैचारिक क्रांती करायची आहे. 

एस. एम. जोशी (एक मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर) :
महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा लोकशक्तीने राज्यशक्तीवर मिळवलेला विजय आहे. नवमहाराष्ट्राची निर्मिती नवमूल्यांच्या प्रस्थापनेनेच होऊ शकते. त्यासाठी सत्तेपेक्षा विधायक कर्तृत्वशक्ती जनतेत निर्माण करायची गरज आहे. 

एस. एम. जोशी (महाराष्ट्र राज्याला २५ वर्षे झाली तेव्हा) :
संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर सत्ता अधिक लोकांकडे आली, लोकशाहीचे विकेंद्रीकरण काही प्रमाणात झाले. असे असले, तरी सत्ता आता खालच्या व मागासलेल्या लोकांच्या हातात जाण्याची प्रक्रिया थांबली आहे. अशा वेळी जागृत जनसंघटनेच्या आधारे सत्तेचे विकेंद्रीकरण व समतेकडे नेणारी सामाजिक परिवर्तनाची कामे निरनिराळ्या मार्गांनी व्हायला पाहिजेत. परिवर्तनाचे अडकलेले चक्र पुनश्च गतिमान व्हायला हवे. 

आजही या सगळ्याचा विचार मराठी माणसाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, एवढेच या निमित्ताने वाटते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 66 Days ago
The influence of Hindi in the Marathi cine-industry is obvious , and is increasing . Is Marathi of any importance to any non-Marathi cinema ?
0
0
Aparna Gajare About 139 Days ago
आचार्य अत्रे नी या साठी खुपमोठा लढा दिला होता. त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल बरीच प्रकरणे आली आहेत
0
0
Anand G Mayekar About
Maharashtra chya Nirmiti sathi jyani hautatmya patkatle, jya mahatmyani hi mashal petavili Ani tevat thevli tya sarvana Sashtang Dandwat. Apla Maharashtra Chirau hovo his vidhatyakade prarthana. Jai Maharashtra,Jai Bhavani.
0
0

Select Language
Share Link
 
Search