Next
एकमेवाद्वितीय रॉयल ऑपेरा हाउस
BOI
Sunday, December 31, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

रॉयल ऑपेरा हाउस, मुंबई

मुंबईतील रॉयल ऑपेरा हाउस या वास्तूला ‘युनेस्को’तर्फे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी दिला जाणारा गुणवत्ता पुरस्कार यंदा मिळाला. ही वास्तू अनेक बाबतींत एकमेवाद्वितीय आहे. मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला, या वास्तूचे सौंदर्य उलगडणारा विशेष लेख प्रसिद्ध करत आहोत. 
................
ऑपेरा हाउस चिन्हसोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीमध्ये मुख्यत: संगीत व वक्तृत्वकलेसंबंधीचे कार्यक्रम सादरीकरणाच्या जिज्ञासेतून अद्भुत अशी ‘बरोक’ (Baroque म्हणजे  जिज्ञासू) शैली उदयास आली. बरोक म्हणजे रसिकांच्या मनावर भुरळ घालणारे आभासी स्तंभ, कलासौंदर्याने अंतर्बाह्य नटवलेल्या भिंती, आकर्षक रंगांचा उपयोग, लाकूड व प्लास्टरमधील नक्षीकाम, मानवी आकारातील मार्बल पुतळे, मार्बल फरशी, आकर्षक भित्तिचित्रे, छत, भिंत व स्तंभावरील झगमगणारे सोनेरी रंगाने सुशोभित केलेले नक्षीकाम, अंतर्गत सजावट, इत्यादी. लुइस ल् वाव याने आरेखित केलेले पॅलेस ऑफ व्हर्सिलस, तसेच फ्रेंच राजा चौदावा लुइससाठी आरेखित केलेला ज्यूल्स हार्डोइन मानसर्ट ही बरोक शैलीची सर्वोत्तम उदाहरणे आहेत! इटलीतील मिलान येथील १७७८मध्ये बांधलेले ‘ल् स्काला ऑपेरा हाउस’ जगप्रसिद्ध समजले जाते! तसेच, पॅरिसमधील पलाइस गॅनिअर व लंडनमधील रॉयल ऑपेरा हाउस इत्यादी वास्तुशिल्पांना ‘They are another world of beauty’ असे म्हटले जाते! 

इटलीतील मिलान येथील ल् स्काला ऑपेरा हाउस

बालक शिल्प (फोटो सौजन्य : मिड डे)केवळ संगीत मैफलींसाठी ‘बरोक’ शैलीत बांधलेली भारतातील रॉयल ऑपेरा हाउस ही एकमेव इमारत आहे. या इमारतीच्या दर्शनी भिंतीच्या त्रिकोणी शिखरमाथ्यावरील (Podium) निरागस बालक शिल्पे व त्रिकोणी खोबणीतील निरनिराळ्या वयोगटातील व्यक्तींची शिल्पे कला-मनोरंजन दर्शवणारी सांकेतिक प्रतीके आहेत. ही प्रतिकात्मक दृश्ये इमारतीच्या कार्यपद्धतीचा अंदाज रसिकांपर्यंत पोहोचवण्याइतपत सूचक आहेत! तसेच, उत्तराभिमुख प्रवेशद्वाराच्या छतावरील बैठ्या प्रसन्न मुद्रेतील बालकशिल्पाच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस चक्र असून, त्या बालकाचा उजवा हात ईश्वरकृपा दर्शवणाऱ्या देवतेसमान सूचक वाटतो! ऑपेरा हाउसच्या उत्तरेकडील भिंतीचा काही भाग मालाड खाणीतील फिकट पिवळसर घडीव दगडात बांधला आहे. तसेच, दर्शनी भिंतीवरील उंची दर्शवणारे आभासी कॉरिन्थियन स्तंभ, मिश्र आकारातील लाकडी तावदानी कमानदार खिडक्या व त्याच आकाराशी मेळ साधणाऱ्या पांढऱ्या रंगातील उठावदार दुपाखी महिरपी, स्टेनग्लास, घोटीव इटालियन मार्बल बलुस्टर्स, खिडक्यांभोवतीचा नक्षीदार गिलावा व कोरीव दगडी कमानीवर आधारित अरुंद बाल्कन्यांचे संरक्षक कवच व त्यावरील पाने-फुलांच्या आकारातील नक्षीकाम इत्यादींच्या कला-सौंदर्यपूर्ण सुसंगतीतून ‘बरोक’ शैलीची नमुनेदार वैशिष्ट्ये सौंदर्यविवेक दृष्टिकोनातून आकर्षक आहेत!

मुंबईतील रॉयल ऑपेरा हाउस नूतनीकरणाआधी (डावीकडे) आणि नूतनीकरणानंतर (उजवीकडे)

ऐतिहासिक पार्श्वभूमी व स्थानमहत्त्व 
ब्रिटिशकालीन मुंबईचा फोर्ट परिसर व्यापारी केंद्र म्हणूनच विकसित झाला होता. तत्कालीन फोर्ट परिसराच्या विस्ताराचे निमित्त साधून सत्ताधारी व धनिक एतद्देशीयांनी निवासासाठी मुंबईच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याजवळील वाळकेश्वरचा पहाडी भाग निवडला, तर काहींनी भायखळा, परळ भागातील प्रशस्त जागेत जाणे पसंत केले. ऑपेरा हाउस सध्याच्या चर्नी रोड रेल्वे स्टेशनसमोरील मामा परमानंद रोडवरून गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या डाव्या वळणावर उभे आहे. या जागेपासून गिरगावमार्गे फोर्ट, चौपाटीमार्गे वाळकेश्वर व सँडहर्स्ट रोडमार्गे भायखळा परिसरात जाणे सोयीस्कर होते म्हणून सत्ताधारी व धनिक एतद्देशीयांना नजरेसमोर ठेवून ऑपेरा हाउससाठी जागा निवडण्यात आली होती. या इमारतीचा पायाभरणी समारंभ १९११मध्ये किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते झाला होता. ऑपेरा हाउस सन १९१५मध्ये पूर्ण झाले. 

पोडियमवरील शिल्पे (नूतनीकरणाआधी आणि नूतनीकरणानंतर) फोटो : राहुल पाटीलगेल्या शंभर वर्षांत या इमारतीने अनेक चढ-उतार पाहिले. सन १९३०पासून सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला. आयडियल पिक्चर्स कंपनीने १९३५मध्ये संगीत नाट्यगृहाचे सिनेमागृहात रूपांतर केले. सन १९५२मध्ये गोंडलचे महाराज विक्रमसिंगजी जडेजा यांनी ही इमारत विकत घेतली. सन १९८०नंतर घराघरात व्हिडिओ पोहोचल्यामुळे अनेक सिनेमागृहे ओस पडली. म्हणून हे सिनेमागृहसुद्धा बंद करावे लागले. पुढील काही वर्षे ही जागा जाहिरातींच्या शूटिंगसाठी वापरली जात असे; पण कालांतराने सिनेमागह कायमचे बंद करण्यात आले. तब्बल २२ वर्षे ही इमारत बंद होती! २००४मध्ये ‘वर्ल्ड मॉन्युमेंट फंड’ देणाऱ्या संस्थेने रॉयल ऑपेरा हाउसचे नाव जगातील सर्वाधिक चिंताजनक ५० इमारतींच्या यादीत नमूद केले होते! त्यानंतर २०१२मध्ये भारतात पुरातन वास्तूंबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रॉयल ऑपेरा हाउस इमारतीस जागतिक स्मारकयादीत घेण्यात आले. ज्योतिंद्र सिंघजी जडेजांनी ऑपेरा हाउसच्या नूतनीकरणाची जबाबदारी वास्तुसंवर्धन आर्किटेक्ट आभा नारायण लांभा अँड असोसिएट्सकडे सोपवली. अनेक कारणांनी खिळखिळ्या झालेल्या इमारतीचे पुनरुज्जीवन  करण्यास सात वर्षे लागली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत सादर झालेले संगीतमय शिवचरित्र

तत्कालीन ऑपेरा हाउसमध्ये कलेचे सादरीकरण केलेल्यांच्या यादीत बालगंधर्व, लता मंगेशकर, कृष्णा मास्तर, बापू पेंढारकर, मास्टर दीनानाथ, ज्योत्स्ना भोळे लोंढे, पटवर्धनबुवा व पृथ्वीराज कपूर या तत्कालीन भारतीय दिग्गज संगीतकार, गायक आणि कलाकारांचा समावेश आहे. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनंतर २६ नोव्हेंबर २०१७ रोजी १०० टक्के मराठमोळ्या रसिकांच्या उपस्थितीत ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या संगीतमय प्रयोगाचे सादरीकरण रॉयल ऑपेरा हाउसमध्ये झाले. या प्रयोगाला, त्याच कालावधीत जन्मलेले ९६ वर्षीय महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ओजस्वी निवेदन लाभले! गेल्या शंभर वर्षातील मराठी भाषेतील हा पहिला संगीतमय ‘शिवचरित्र’ प्रयोग असावा. पुनरुज्जीवित ऑपेरा हाउसचे उद्घाटन २०१६मध्ये झाले. या अनोख्या शैलीतील इमारतीला ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठीचा ‘गुणात्मक’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.  

उत्तराभिमुख सज्जा (नूतनीकरणाआधी आणि नूतनीकरणानंतर)

उत्तर-पूर्व कोपराआराखडा : सन १९०९मध्ये मूळ रचनाकाराने संगीतनाट्यगृहाचा आराखडा तत्कालीन सत्ताधारी व धनिक रसिकांची आवड आणि नाट्यसंगीतगृहाच्या गरजा ध्यानात घेऊन बनवला आहे, हे या इमारतीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून दिसून येते. एकोणिसाव्या शतकात जगभरातील वास्तुविशारदांवर युरोपीय शैलींचा पगडा होता. ब्रिटिशकालीन मुंबईतील बहुतांश सार्वजनिक इमारती गॉथिक शैलीत, तर इतर इमारती व्हिक्टोरियन निओ-क्लासिकल, इंडोसारासेनिक व आर्ट डेको शैलीत बांधलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, परदेशातही म्हणावी तशी प्रसिद्धी न लाभलेल्या ‘बरोक’ शैलीत ऑपेरा हाउस बांधण्याचे धाडस करमणूक क्षेत्रात मान्यता मिळवलेले मॉरिस इ. बँडमन व कोलकाता येथील कोळसा व्यापारी जहांगीर फ्रामजी कारका या द्वयीने केले होते! ऑपेरा हाउसमध्ये प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत या जागेतील प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट रसिकाला वेगळेपणाची जाणीव करून देत असल्यासारखे वाटते! जवळपास ५७४ आसनांची व्यवस्था असलेल्या या तीन स्तरांच्या प्रेक्षागृहातील तिन्ही बाजूंनी अलंकृत केलेला भव्य रंगमंच या प्रेक्षागृहाचे हृदयस्थान असावे. आजतागायत मुंबईत अनेक नाट्यगृहे बांधण्यात आली; पण १९८०च्या दशकात जगप्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्ट फिलिप्स जॉन्सनने आरेखित केलेले ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’ (NCPA) व पृथ्वी थिएटर या तोडीचे दुसरे नाट्यगृह बनले नाही! ‘ऑपेरा हाउस’ या दोन शब्दांच्या नावाने ओळख मिळालेल्या इमारतीला पुढे ‘रॉयल’ हे विशेषण लागण्याची कारणे या जागेला प्रत्यक्ष भेट दिल्यास समजून येतात! हे एकमेवाद्वितीय संगीतनाट्यगृह पाहण्याचा अनुभव घेतल्यानंतर आढळलेल्या काही गोष्टी येथे मांडत आहे.नक्षीदार छत व झुंबरमूळ संरचनेतील बाह्य वास्तुकला सौंदर्य 
रॉयल ऑपेरा हाउस इमारतीचे काही बाह्य घटक नजर खिळवून ठेवणारे आहेत, ते असे -
- पदपथासह इमारतीचा उत्तर-पूर्व दर्शनी भाग आणि कलात्मकरीत्या काटछाट केलेले वृक्ष या इमारतीचाच एक भाग असल्यासारखे भासतात. मुंबईत असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते!
- स्वागतकक्ष दालनात, इमारतीचा १०० वर्षांचा इतिहास व तांत्रिक माहिती छायाचित्रांसह पाहायला मिळते.
- मालाड खाणीतील फिकट पिवळसर दगडातील भिंत व खिडक्यांच्या आकारात वळण घेणाऱ्या उत्तर-पूर्व भिंतीस धरून ठेवणाऱ्या पांढऱ्या रंगातील महिरपीची कलात्मक व कल्पक मांडणीतील लयबद्धता कमालीची मोहक आहे.
- पांढऱ्या रंगात इतर रंगांना सामावून घेण्याची क्षमता अधिक असते, हे ऑपेरा हाउसच्या दर्शनी रंगसंगतीवरून कळते.
- इमारतीच्या तळघरातील आग नियंत्रण व प्रेक्षागृहातील आरोग्यघातक कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन व्यवस्थेतील दूरदृष्टी अचंबित करणारी आहे!
- एकाच रांगेतील समान आकारातील अर्धगोलाकार खिडक्यांची पार्श्वभूमी लाभलेला पहिल्या मजल्यावरील उत्तराभिमुख लांब-रुंद गच्चीचा कठडा शानदार इटालियन संगमरवरी खांबांनी (Balusters) सजलेला आहे. सूर्यास्तानंतरच्या संधिप्रकाशात ही जागा अधिक खुलून दिसते. म्हणून, खऱ्या अर्थाने ही इमारत राजसी (Royal) म्हणून घेण्यास पात्र आहे!

डोमवरील चित्रेरॉयल ऑपेरा हाउसच्या अंतर्गत रचनेतील काही घटक मनोवेधक व नजर खिळवून ठेवणारे आहेत. ते असे -
- स्वागत कक्षातील आठ पाकळ्यांच्या डोमच्या पोकळीत डकवलेली तत्कालीन जगप्रसिद्ध लेखक, विल्यम शेक्सपियर, कवी, विल्यम वर्डस्वर्थ व ख्यातनाम संगीतकारांची छायाचित्रे!
- स्वागत कक्ष व मेजवानी सदनाच्या (Banquet hall) भिंती पांढऱ्या व पिस्ता रंगछटांनी सुशोभित केल्या आहेत. या दोन्ही रंगांशी सोनेरी रंग जवळीक साधणारा आहे!

काही अद्भुत घटक रसिकांच्या मनातील उत्सुकता वाढवतात. उदाहरणार्थ, स्वागतकक्षातील मानवी आकारातील अप्रतिम मार्बल पुतळे. ते सेल्फीवेड्या प्रेक्षकांसाठी प्रॉप्स बनले आहेत! विविध आकार व शैलीतील एकाधिक स्तरातील आकर्षक झुंबरे, मंद विद्युत रोषणाई, तिकीट खिडकीचा अपारंपरिक आकार व पुरातन महत्त्व लाभलेल्या वस्तू, इत्यादी...
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केलेली प्रेक्षागृहातील स्वतंत्र व्यवस्था (BOX), प्रेक्षागृहाच्या दोन्ही भिंतींवरील अरुंद बाल्कन्यांचे थर इत्यादी...
- स्वच्छतागृहात एकाच रंगातील (Mono color) भित्तिचित्रे डकवण्याची कल्पनाही नावीन्यपूर्ण आहे!

रंगमंचकाही घटक तांत्रिकदृष्ट्या सरस आहेत. उदाहरणार्थ, प्रेक्षागृहातील त्रिस्तरीय आसनव्यवस्था व प्रेक्षक-रंगमंच समन्वय (ध्वनिस्पष्टता), शेवटचे आसन व रंगमंचातील अंतर, दोन पंक्तीतील आसनांमधील व मार्गिकेची ऐसपैस रुंदी इत्यादी.
- प्रत्येक मजल्यावरील स्वागत कक्षांना जोडणारी दोन्ही टोकांवरील जिन्यांची रचना. 

चौकोनी आकारातील भव्य रंगमंच प्रेक्षागृहाचे आकर्षण आहे. विविध पद्धतीने अलंकृत केलेले चौकटीवरील नक्षीकाम व स्तंभ, रंगमंचापासून पुढे ओढलेले फॉल्स सीलिंग (Gramophone) भोंग्याच्या आकारात केले आहे. त्यामुळे ध्वनी शेवटच्या आसनापर्यंत पोहोचतो, इत्यादी. त्याचबरोबर प्रकाश, ध्वनी (Acoustic) वातानुकुलित योजना नाट्यसंगीत मैफलीस पूरक व अत्याधुनिक दर्जाची आहे.

वैशिष्ट्यपूर्ण तिकीट खिडकीकाही गोष्टी खटकल्या. त्या अशा – 
स्वच्छतागृहांचे खुजे दरवाजे, स्वागत कक्षातून स्वच्छतागृह व नाट्यगृह प्रवेशद्वाराच्या मार्गिकेतील अपुरी जागा.
- जिन्यातील प्रत्येक पायरीवरील कलात्मक खाच! (कदाचित, त्या काळात एकावेळी एकानेच चढ-उतार करावा यासाठी केलेली हिकमत असावी. परंतु वर्तमानात दुरुस्ती अपेक्षित आहे!)
-  प्रेक्षागृहातील एकूण सोनेरी व लाल रंगकामाचा अतिरेक, नक्षीकामातील बेजोड रंगकाम, ओबड-धोबड नक्षीकाम व त्यावर लेपलेला रंग, जिन्याच्या कलत्या भागावरील टवके, लाकूड व व्हिनियरवरील पॉलिशचे डाग, इत्यादी...

आपल्या जीवनात कलेचं स्थान खूप महत्त्वाचे आहे. संगीत ही एक अशी कला आहे, की जी संगीतबद्ध केल्यानंतर तिच्या सादरीकरणासाठी विशिष्ट वातावरणनिर्मितीची गरज असते. युरोपमध्ये संगीत मैफल सादरीकरणासाठी अनेक इमारती बांधल्या गेल्या. कलात्मक दृष्टिकोनातून वातावरणनिर्मिती केलेल्या इमारतीतील संगीतश्रवणाचा आनंद वेगळा असतो हे या इमारतीच्या आंतर्बाह्य रचनेतून दिसून येते. तत्कालीन मुंबईत बांधलेल्या काही अप्रतिम इमारतींप्रमाणे या इमारतीच्या मूळ रचनाकाराचे नावही गुलदस्त्यातच राहिले! 

मॉरिस बँडमनआत्ता ‘युनेस्को’कडून मिळालेल्या पुरस्कारात, ऑपेरा हाउसची इमारत बांधणारे मॉरिस बँडमन व जहांगीर कारका, सध्या इमारतीचा मालकी हक्क असलेले गोंदल संस्थानचे महाराज, संवर्धन वास्तुविशारद आभा लांभा व मूळ रचनाकारांचाही खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. या संदर्भात खुद मॉरिस बँडमनचे विधान खूपच बोलके आहे. तो म्हणतो, ‘Nobody, however, is likely to remember the man who started it’. मॉरिस बँडमन खऱ्या अर्थाने या अद्भुत वास्तुसौंदर्यामागचा ‘खेळिया’ होता! ऑपेरा हाउसच्या निर्मितीप्रमाणेच मॉरिस बँडमनचा भारतातील वास्तव्याचा इतिहासही खूप मनोरंजक आहे! वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झालेल्या मॉरिस बँडमनच्या निधनाची नोंद तत्कालीन भारतवर्षातील वर्तमानपत्रांनी घेतली होती! त्यास ‘Theater pioneer of the East’ व ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ‘Pioneer of musical comedy’ असे त्याला गौरवले होते!

स्वागत कक्षातील डोम व संगमरवरी पुतळेमुंबईतील पुरातन इमारतींचे संवर्धन व सौंदर्य जपणुकीचे महत्त्व :
अंतर्बाह्य सौंदर्यसंपन्न असलेल्या रॉयल ऑपेरा हाउस इमारतीच्या दर्शनी भागासमोरील उंच वृक्षांचे सडसडीत खोड व झुपकेदार हिरवी पाने जणू काही या भिंतीशी संवाद साधत असल्यासारखी भासतात! मूळ रचनाकाराच्या कल्पनेतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या समुचित (Collage) सादरीकरणास संवर्धन वास्तुविशारद आभा लांभाने, वृक्ष-फांद्यांच्या कलात्मक काटछाटीतून वृक्षाचा व्यास, विस्तार व उंचीच्या माध्यमातून पुनरुज्जीवित इमारतीच्या दर्शनी भागास उजाळा देण्यासाठी केलेला प्रयत्न स्पृहणीय आहे! या कला-संवेदनशील दृश्यातून परिसराचा चेहरा बदलल्याचे जाणवते! एकेकाळी ब्रिटिश राजवटीतील अनेक गव्हर्नरनी सौंदर्यपूर्ण मुंबई घडवण्यासाठी अपार कष्ट घेतले होते. ऑपेरा हाउससारख्या अनेक सुंदर इमारती संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुरातत्त्व खात्याने या शाश्वत ठेव्याचे महत्व ओळखून या इमारतीला ‘ग्रेड-१’ दर्जा दिला आहे.

नक्षीदार डोम व झुंबरभविष्यातील औद्योगिक विकासाचे दुष्परिणाम, पर्यावरण ऱ्हास, बदलती जीवनशैली, दुर्लक्ष व दिरंगाईने घेतलेल्या निर्णयामुळे वारसा वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या जाणिवेतून ‘युनेस्को’ने जगभरातील समस्येची गंभीर दखल घेऊन १६ नोव्हेंबर १९७२ रोजी ‘वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन’ची स्थापना केली होती. भारताने १४ नोव्हेंबर १९७७ रोजी कन्व्हेन्शनमध्ये प्रवेश केला. वरील धोरण स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. ‘हेरिटेज रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर बॉम्बे १९९५ अॅक्ट’नुसार, मुंबईतील ६१५ ठिकाणे वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आली. त्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, स्थापत्य क्षेत्राशी संबंधित वास्तूंसह बाणगंगा, खोताची वाडी अशा धार्मिक, सांस्कृतिक परिसरांचा समावेश आहे. अनेक वर्षे या वास्तू आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होत्या. १६ ऑक्टोबर १९१६ रोजी बांधलेली इमारत जवळपास शंभर वर्षांनंतर, २०१६ साली पुनरुज्जीवित करण्यात आली. एके काळी सुंदर शहर बनवण्याच्या कल्पनेतून साकारलेल्या मुंबईची पुरातन ओळख अस्पष्ट होत चालली आहे व पुरातन सौंदर्यही लुप्त होत चालले आहे, याचा विचार सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘युनेस्को’ने मांडला होता हे आता खरे ठरत आहे! उपनगरीय मुंबईतील वर्तमान विकास धोरणातून सौंदर्यपूर्ण शहर घडण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. म्हणून अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता असलेला ठेवा आपण सर्वांनी जपायला हवा! मुंबई शहराची ‘खरी ओळख’ (True Identity) टिकवून ठेवण्यात पुरातन इमारतींचाच मोठा वाटा असणार आहे, हे पुनरुज्जीवित झालेल्या इमारतीतून दिसून येते! म्हणून, पुरातन इमारतींच्या पुनरुज्जीवनाचे कार्य यापुढेही चालू ठेवावे लागेल! रॉयल ऑपेरा हाउसच्या पुनरुज्जीवन कार्याशी जोडल्या गेलेल्या सर्व कला-सौंदर्यप्रेमींना नव वर्षाच्या शुभेच्छा!!! 

रॉयल ऑपेरा हाउसची वेबसाइट : http://royaloperahouse.in/

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(‘युनेस्को’चा २०१७चा पुरस्कार मिळालेल्या मुंबईतील चारही वास्तूंचे सौंदर्य उलगडणारे लेख वाचण्यासाठी https://goo.gl/E1oNsy येथे क्लिक करा.)

त्रिस्तरीय प्रेक्षागृह व बाल्कनी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
purushottam karhade About
very informative and feel like visiting Opera house after reading this article .
0
0

Select Language
Share Link
 
Search