Next
गायींमुळे मिळाली समृद्धी
मोहन काळे
Monday, October 16 | 08:00 PM
15 0 0
Share this story

शेतकऱ्यांना सुखाची शिदोरी मिळवून देणाऱ्या गायीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा दिवस ‘वसुबारस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोरज मुहूर्तावर सवत्स धेनूची पूजा केली जाते. त्या निमित्ताने आज पाहू या शेजबाभुळगाव (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते शशिकांत शंकर पुदे यांची गोष्ट. त्यांनी देशी गायींचे संवर्धन केल्यामुळे त्यांचा परिवार व शेती समृद्ध बनली आहे.
......
कामधेनू हा शब्द गायीसाठी वापरला जातो, याला कारण आहे. गायीपासून मिळणारे दूध, दही, ताक, लोणी, तूप एवढेच नव्हे, तर शेण आणि मूत्रही औषधी आहे, उपयुक्त आहे. देशी गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकाचा काही ना काही उपयोग होतो.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी देशी गायींचे संवर्धन करीत आहेत. त्यांच्या घरातील दूधदुभत्याची गरज भागून छोट्या कुटुंबाचा प्रपंचही गायींवर चालत आहे. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करूनही काही शेतमजुरांनी गायींचे संवर्धन केल्याचे चित्र दिसत आहे. शशिकांत पुदे यांनीही जातिवंत खिल्लार गायींचे संवर्धन करून शेतीचा कायापालट केला आहे. या देशी गायींच्या संवर्धनामुळे त्यांना आजवर कधीही बँक किंवा खासगी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली नाही.
पुदे यांचे घराणे लिंगायत. दुकानदारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. घरच्या थोड्याफार जमिनीत चारा-पाण्याची व्यवस्था करून त्यांनी देशी गायींचा सांभाळ केला. त्यांच्याकडे गेल्या दोन पिढ्यांपासून देशी गायी असल्या, तरी त्यांनी २००९ पासून जातिवंत खिल्लार गायी व वळूंचा सांभाळ केला. आई पार्वती यांच्या आग्रहाखातर त्यांनी घरातील गायी कायम राखल्या. चार भावांचे एकत्र कुटुंब गायींच्या संवर्धनामुळे सुखा-समाधानाने नांदत आहे.

त्यांच्याकडील जातिवंत गायी व वळू त्यांनी चांगल्या पद्धतीने जोपासले असल्यामुळे विविध ठिकाणच्या प्रदर्शनातही त्यांना ठेवता आले. त्यामुळे पुदे कुटुंबाच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली. एकेका गायीची किंमत एक लाख रुपयांपर्यंत गेली, तर वळूंची कमाई दिवसाला एक हजार ते कधी कधी पाच हजार रुपयांवर गेली. गायींना चांगली किंमत मिळत असली, तरी गोठ्यातील गायींची संख्या मात्र त्यांनी कधी कमी होऊ दिली नाही.

वासरे व खोंडांच्या विक्रीतून त्यांची मोठी उलाढाल होत आहे. त्यातूनच त्यांनी पारंपरिक शेतीत बदल करून सेंद्रिय शेती सुरू केली. गोमूत्र व शेणाच्या स्लरीचा शेतीत चांगल्या प्रकारे वापर केल्यामुळे त्यांच्या शेतात फळबागांचे प्रयोग यशस्वी झाले. कोरडवाहू भागात न येणारी काजू, सुपारी व लिची ही फळपिके त्यांच्या शेतात चांगल्या पद्धतीने बहरली. यापैकी काजू व सुपारीचे उत्पन्न सुरू झाले आहे. केवळ गोमूत्र व शेणाच्या स्लरीचा वापर केल्यामुळे जमीन तर सुपीक झालीच. शिवाय फळबागा व इतरही शेतमालाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली. गायींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आजच्या घडीला सुमारे १५ एकर बागायती जमीन खरेदी करणे पुदे कुटुंबीयांना शक्य झाले आहे.

‘आज आमची ४७ एकर बागायती शेती तयार झाली आहे. गायींमुळे या भागात अपारंपरिक असलेल्या फळांचे उत्पन्न घेता आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली. घरातील सर्व सदस्य दररोज गोमूत्र प्राशन करत असल्यामुळे त्यांचे आरोग्यदेखील सुधारले आहे. आता उत्पन्नवाढीचा पुढचा टप्पा म्हणून गोमूत्र अर्क, साबण, फेसपॅक, धूपकांडी, पारिजातक अर्क, तुळशी अर्क आदी उत्पादन बनवणार आहोत,’ असे पुदे यांनी सांगितले.  

पुदे यांच्याकडे सध्या सात जातिवंत खिल्लार गायी आहेत. गायींच्या व वळूंच्या स्वभावगुणावरून त्यांनी त्यांची नावे ठेवली आहेत. खिल्लार गायींच्या संवर्धनासाठी त्यांना मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राची मदत झाली. आदर्श गोपालक म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याचा आदर्श अन्य शेतकऱ्यांनीही घेण्यासारखा आहे. त्यांना शुभेच्छा!

गायीमधल्या ३३ कोटी देवांची गोष्ट

गायीमध्ये ३३ कोटी देव आहेत, असे मानले जाते. त्यासाठी पुराणातील एका गोष्टीचा दाखला दिला जातो. ती गोष्ट अशी - एकदा नारदमुनी पृथ्वीवर संचार करून स्वर्गात देवसभेत गेले. सभेत देवांनी नारदांना पृथ्वीवरील क्षेमकुशल विचारले. त्या वेळी नारद म्हणाले, ‘देवा, सध्या पृथ्वीवर हाहाकार माजला आहे. लोकांना अन्न मिळत नाही. लोक रोगराईने त्रस्त आहेत.’ त्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, अशी विनंती त्यांनी देवांना केली. या गंभीर विषयावर सर्व देवतांची सभा झाली. गायीच्या शरीरात आपले स्थान निर्माण करण्याचे सर्व देवतांनी ठरविले. त्याप्रमाणे सर्व देवता एकत्र आल्या. धन्वंतरी आणि लक्ष्मी वेळेवर आले नाहीत. त्यांची वाट पाहून इतर देवतांनी गायींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर धन्वंतरी व लक्ष्मीचे आगमन झाले. त्यांच्यासाठी शेण व मूत्राची जागा शिल्लक राहिल्याचे सांगितले. त्याप्रमाणे धन्वंतरीने गोमूत्रात, तर लक्ष्मीने गोमयामध्ये जागा स्वीकारली. म्हणून गोपालकाच्या घरी आरोग्य व लक्ष्मीचा वास असतो, असे म्हटले जाते.

संपर्क : शशिकांत पुदे - ९७६५४ १५१९१

(पुदे कुटुंबीयांच्या घरी आज वसुबारसेच्या निमित्ताने सवत्स धेनूची पूजा झाली. त्याचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amol Anand Pude About 363 Days ago
🙏🙏🙏🙏🙏🙏
0
0
Akash Bhuse About 364 Days ago
👌👌👌👌👌👌👌
0
0
M B chenigund About 364 Days ago
Khupach chan
3
0

Select Language
Share Link