Next
धातुकाम मासिकाची वर्षभरात मोठी झेप
BOI
Thursday, September 27, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this storyमॅन्युफॅक्चरिंग उद्योगातील भारतीय कामगारांना इंग्रजी भाषेचा मोठा अडसर होतो. ही बाब हेरून तांत्रिक माहिती मराठीतून उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘धातुकाम’ हे मराठी मासिक जून २०१७मध्ये सुरू झाले. वर्षभराच्या कालावधीत या मासिकाने मोठी झेप घेतली असून, हे मासिक दर महिन्याला १५ हजार कंपन्या आणि संस्थांपर्यंत पोहोचते. या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी मासिकाचा उपयोग होत असल्याच्या प्रतिक्रिया वाचकांकडून येत आहेत. या मासिकाची कल्पना, आतापर्यंतचा प्रवास याबाबत मासिकाचे संपादक दीपक देवधर यांची अमोल अशोक आगवेकर यांनी घेतलेली ही मुलाखत.
.......
दीपक देवधरहॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटाचा हिंदीत किंवा हिंदी चित्रपटाचा मराठीत रिमेक झाल्याचे आपण पाहिले असेल. इंग्रजीतील अनेक कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्याचेही माहीत असेल; पण तंत्रज्ञान विषयाला वाहिलेल्या आणि मराठीतून प्रसिद्ध होणाऱ्या एखाद्या मासिकाचा अंक इंग्रजी भाषेतून काढा, अशी मागणी झाल्याचे ऐकिवात नसेल. मराठी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘धातुकाम’ या तांत्रिक विषयावरील मासिकाने मात्र ही किमया साधली आहे. या मासिकातील दर्जेदार मजकूर वाचून हे मासिक इंग्रजीत काढण्याची मागणी वाचक करत आहेत. अशा या मासिकाचे संपादक दीपक देवधर यांच्याशी साधलेला हा संवाद.

- तंत्रज्ञानाविषयीचे मासिक मराठीतून सुरू करण्याचा विचार कसा सुचला?
- बेंगळुरूमध्ये मशीन टूल्स या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एस. मायक्रोमॅटिक आणि प्रगती ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे अध्यक्ष अशोक साठे आणि याच क्षेत्रातील (पुण्यातील) ज्येष्ठ इंजिनीअर भारत जोशी यांना मराठीतून तंत्रज्ञानविषयक माहिती देणारे लेखन करण्याची कल्पना २००७-०८मध्ये सुचली होती. त्यातून उद्यम प्रकाशनाची संकल्पना पुढे आली. संपूर्ण युरोप, चीन, जपान, कोरिया, थायलंड, तैवान हे देश मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांत भारताच्या कित्येक पटींनी पुढे आहेत. या सगळ्या देशांपेक्षा भारत मागे का पडतो याचे उत्तर साठे यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की या सर्व देशांतील तंत्रज्ञांना, कामगारांना इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांच्या भाषेत मिळते. आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमतरता नाही; पण भाषेचा मोठा अडसर आहे. तो दूर झाला, तर मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाला खूप चालना मिळेल. दुसरी बाब म्हणजे आपल्याकडे एकदा पदवीचे शिक्षण झाले आणि माणूस नोकरीला लागला, की नवे ज्ञान घेत नाही. ही पद्धत मोडीत काढण्याचाही विचार होता. त्यातून २०१४ला उद्यम प्रकाशन ही संस्था सुरू झाली. त्यातूनच पुढे धातुकाम मासिकाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

- उद्यम प्रकाशनाच्या वतीने कोणते उपक्रम चालवले जातात?
- अभियांत्रिकीबद्दल माहिती देणारी पुस्तके आणि धातुकाम हे मासिक प्रकाशित करणे हे दोन उपक्रम उद्यम प्रकाशनाच्या वतीने आम्ही राबवतो. नवशिक्षित कामगाराला वर्कशॉप टेक्नॉलॉजी, तसेच इतर मशीन व तंत्रांविषयी या विषयाची मूलभूत माहिती पुस्तकांतून सचित्र देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संदर्भ पुस्तक, सुलभ यंत्रशाळा, प्रगत यंत्रशाळा या विषयांवरील पुस्तके येत्या दोन-तीन महिन्यांत बाजारात येतील. अगदी सामान्य कामगारांनाही ती वाचता येतील. त्याचबरोबर या क्षेत्रातील नवे प्रयोग, उत्पादने यांसह प्रत्यक्ष कारखान्यांतील तांत्रिक सुधारणा अशा विषयांचा अंतर्भाव असलेले धातुकाम हे मासिक आम्ही जून २०१७पासून सुरू केले. 

- धातुकाम मासिकाचा वाचकवर्ग कोणता आहे आणि का? 
- लघु-मध्यम उद्योगांत वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम करणारा मनुष्य हा धातुकाम मासिकाचा मुख्य संभाव्य वाचक आहे. मग तो अनुभवी कामगार, इंजिनीअर, व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा मालकही असेल. सध्याची परिस्थिती पाहता इंजिनीअरिंग उत्पादन प्रक्रियेत होणाऱ्या एकूण ‘व्हॅल्यू ॲडिशन’पैकी ९० ते ९५ टक्के काम लघु-मध्यम उद्योगांत होते. मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या छोट्या असेंब्ली आणि छोटे यंत्रभाग हे लघु-मध्यम उद्योगांत तयार होतात. देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमाण आता वाढले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तू देणे (Quality), त्या कमी किमतीत देणे (Cost) आणि कमी वेळात मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे ही तीन आव्हाने आता लघु-मध्यम उद्योगांसमोर आहेत. मोठ्या कंपन्यांतील व्यवस्थापक, इंजिनीअरना प्रदर्शने, कार्यशाळा, परिषदांना जाता येते आणि त्यांना बाहेरच्या जगातील माहिती मिळते. ते ‘अपडेट’ राहतात. लहान उद्योगांतील व्यवस्थापकांना ही संधी मिळत नाही. तिथे कंपनीतील उपलब्ध कौशल्ये आणि अनुभवांच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि येणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधली जातात. बाहेरच्या जगात कोणत्या प्रक्रिया सुधारल्या आहेत किंवा कोणती नवी साधने आली आहेत, जेणेकरून उत्पादन सुधारता येईल, हे या लघु-मध्यम उद्योगातील लोकांना कळणे गरजेचे असते. ते या मासिकाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सगळे ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे; पण मासिक थेट तुमच्या हातात पोहोचते. ते कामगाराला सोयीचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक कंपनीत होणाऱ्या प्रक्रिया सुधारणा इतर कंपनीतील माणसांना माहिती व्हाव्यात, हाही मासिकाचा उद्देश आहे.

- जे देश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आघाडीवर आहेत, त्या देशांतील एखाद्या मासिकाचे उदाहरण समोर होते का?
- अमेरिकेत ‘मॉडर्न मशीन शॉप’ हे खूप प्रसिद्ध मासिक आहे. हे मासिक ९० वर्षे चालू आहे. त्या मासिकाचे उदाहरण आम्ही डोळ्यांसमोर ठेवले होते. केवळ मशिनिंग याच विषयावर जर हे मासिक इतकी वर्षे चालू शकते, तर देशी भाषांमध्ये हे चालायला काहीच अडचण येऊ नये, असे आम्हाला वाटले. 

- तुमच्यापैकी बहुतांश लोक इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेले आहेत. तांत्रिक मासिक असल्याने त्याचे विषय, मजकूर याची तयारी कशी केली?
- मासिक काढायचे आम्ही २०१५मध्ये ठरवले आणि आमचा पहिला अंक जून २०१७मध्ये प्रकाशित झाला. दोन वर्षे आम्ही या अंकाचे स्वरूप, विषय, मांडणी यांच्या तयारीला दिली. पहिल्यांदा कल्पना होती, की संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग विषयावर मासिक काढावे; पण नंतर ती मागे पडून आम्ही केवळ मशिनिंगवर मासिक काढायचे ठरवले. लेखक शोधायला सुरुवात केली. मराठीत इंजिनीअरिंग विषयात लिहिणारे खूप कमी लोक होते. तसेच ज्या उद्योगांच्या मालकांना लिहायला सांगितले, त्यांना लिहिण्याची सवय नव्हती. इंग्रजी लेखांचे मराठी अनुवाद करणारी टीम तयार केली. दुसरा पर्याय म्हणजे आम्ही त्यांची मुलाखत रेकॉर्ड करतो, त्यावरून लेख लिहून त्यांना पुन्हा पाठवतो व त्यांनी मान्यता दिली की लेख छापतो. वाचकाला लेख वाचून त्यातील कल्पनांची अंमलबजावणी करण्यासारख्या दोन गोष्टी लेखातून मिळायला हव्यात, असे धोरण आम्ही ठेवले आहे. लेखात मांडलेल्या विषयाचे प्रत्यक्ष उदाहरण (केस-स्टडी) लेखात असायलाच पाहिजे असा दंडक आम्ही मजकुराबाबत पक्का केला आहे. लेखासाठी वर्कशॉपशी संबंधित तांत्रिक विषयच असला पाहिजे, हेही एक परिमाण आहे. लघु-मध्यम उद्योगांनी आपल्या कारखान्यांत केलेल्या सुधारणांच्या ‘केस स्टडी’ आम्ही प्रत्येक अंकात देतो. शक्यतो भारतीय उद्योजकांच्या उत्पादनांबद्दल माहिती द्यायला प्राधान्य देतो.

- गेल्या वर्षभरात मासिकाला कसा प्रतिसाद मिळाला? 
- ‘धातुकाम’ला जून २०१८मध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही १५ हजार कंपन्या, शिक्षण संस्था आणि ‘आयटीआय’मध्ये दर महिन्याला अंक पोहोचवतो. ‘धातुकाम’चे २००० वर्गणीदार आहेत. पेपर स्टॉलवरही आता हे मासिक उपलब्ध होत आहे. ‘बुकगंगा डॉट कॉम’वरही आमचा अंक उपलब्ध आहे. (‘बुकगंगा’वरून ‘धातुकाम’चे अंक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) मासिकाचे कौतुक करणारे अनेक फोन, लेखी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आल्या आहेत. पुण्यातल्या अल्ट्रा इंजिनीअर्स कंपनीने चाकण, भोसरीच्या प्लांटवर मिळून आमचे २० अंक वर्गणी भरून घेतले आहेत. त्यांच्या शॉप लेव्हल ग्रुपमध्ये ‘धातुकाम’चा अंक दिला जातो आणि या वाचनावर चर्चाही होते. कल्याणी फोर्ज कंपनीने १५ अंकांची वर्गणी भरली आहे. ॲक्युरेट गेजिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे यांनी लेखनाबाबत खूप मदत आणि सकारात्मक सहकार्य केले आहे. ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेडचे सीओओ अमित भिंगुर्डे यांनी या उपक्रमाला सक्रिय सहकार्य दिले आहे. 

क्यूआर कोडचा वापर- ‘धातुकाम’मध्ये ‘क्यूआर कोड’चा वापर केलेला दिसतो. त्याबद्दल काय सांगाल?
- लेखासाठी ‘क्यूआर कोड’ वापरण्याची कल्पना वर्तमानपत्र वाचनातून समोर आली. मासिकातील लेखांत सगळ्या तांत्रिक संकल्पना मांडल्या जातात. एखादे मशीन कसे चालते, ती प्रक्रिया कशी होते याचे मार्गदर्शन केले जाते. ती संकल्पना शब्द आणि ड्रॉइंगबरोबरच व्हिडिओतून समजावून सांगता आली, तर वाचकाला विषय समजणे अजून सोपे होईल. म्हणून ‘क्यूआर कोड’चा वापर केला आहे. राज्यांतील विविध कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये आम्ही घेतलेल्या वाचक मेळाव्यांमध्ये लघु-उद्योजकांनी ‘क्यूआर कोड’मुळे लेख समजायला खूप मदत झाल्याची प्रतिक्रिया आवर्जून दिली. 

- दैनंदिन भाषेत तांत्रिक शब्द खूप कमी वापरले जातात. अंकात मराठी तांत्रिक शब्दांवर जोर देण्यामागची भूमिका काय?
- मराठीतून अंक काढताना समजेल अशी भाषा वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाषा कशी असावी याच्यावर खूप चर्चा झाली. आता असे ठरले आहे की, ज्या इंग्रजी शब्दांचे सहज मराठीकरण करता येईल असे शब्द मराठीच वापरायचे. उदाहरणार्थ, यंत्रण हा शब्द लिहिला, की कंसात मशिनिंग लिहायचे आणि पुढे लेखात यंत्रण शब्द वापरायचा. इंग्रजी शब्द मराठी करण्याचा आग्रह आहे, जेणेकरून मराठीत ते शब्द रूढ होतील; पण ‘टूल’ या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्यायी शब्द ‘हत्यार’ असा आहे. मराठीत हत्यार शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यामुळे अट्टाहासाने ‘हत्यार’ हा शब्द न वापरता ‘टूल’ हा इंग्रजी शब्दच आम्ही वापरतो. 

(दीपक देवधर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link