Next
वासिंद येथे विद्यार्थी भारतीचे राज्यस्तरीय शिबिर उत्साहात
मिलिंद जाधव
Tuesday, June 11, 2019 | 01:37 PM
15 0 0
Share this article:

शहापूर : विद्यार्थी भारती संघटनेतर्फे दर वर्षीप्रमाणे याही वर्षी ‘अपडेट टू अपग्रेड’ या संकल्पनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील वासिंद येथील भातसई गावातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत तीन ते नऊ जून २०१९ या कालावधीत राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले होते. 

शिबिरात ‘मराठी साहित्य’ या विषयावर कवयित्री, प्रा. वृषाली विनायक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील ताणेबाणे’ या विषयावर पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘लैंगिकता’ या विषयावर प्रा. भाग्यश्री पवार, तर ‘अंधश्रद्धा’ या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्वप्नील सिरसाट व राहुल गायकवाड यांनी जादूचे प्रयोग व चळवळीच्या गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. 

‘महाराष्ट्राचे समाजकारण’ या विषयावर रेखा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जात आणि आत्महत्या, अच्छे दिन, लोकशाही, लैंगिकता, रोजगार आणि शिक्षण या विषयांवर शिबिरातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. शिबिरात लघुचित्रपट बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात शिक्षणाचे खासगीकरण, धर्मवाद, अंधश्रद्धा, मासिकपाळी, संविधान या विषयांवर लघुचित्रपट बनवून त्याचे सादरीकरण करण्यात आले. 

प्रबोधनात्मक कवी संमेलन घेण्यात आले. या वेळी पडघा येथील युवा कवी मिलिंद जाधव, वासिंद येथील मारुती कांबळे उपस्थित होते. कवितेतून महामानवांचे कार्य, गौरवगाथा, त्यांचा जीवनप्रवास कवितेतून मांडण्यात आला. महामानवांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची आखणी करण्याचे आवाहन जाधव यांनी या वेळी केले; तसेच जिजाऊ, सावित्री, रमाई, शिकवा ना, घरोघरी सावित्री हाय, संविधान, छत्रपती शिवाजी महाराज अशा कविता सादर केल्या. कांबळे यांनी जातीयवाद, आक्रोश, विकृती अशा कविता सादर केल्या. 

दर वर्षी शिबिरात विद्यार्थी भारतीच्या पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवली जाते. या वर्षी पंतप्रधानपदी चेतन कांबळे, तर तेजस भोसले, सृष्टी राऊत, मनीष जगताप, पृथा गोखले यांचे लोकशाही पद्धतीने मंत्री मंडळ निवडण्यात आले. ‘शिबिरातील साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना अपडेट बनवतातच; पण त्याला असलेली सामाजिक बांधिलकी ही त्यांना अपग्रेड करत असते. सध्याच्या काळात फक्त डिजिटलरित्या अपडेट असून, चालत नाही. समाजाप्रती देशाप्रती जाण असणे हे आपल्याला अपग्रेड करते,’ असे मत विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्ष मंजिरी धुरी यांनी मांडले. 

‘अधिकाराची भाषा काय असते’ यावर विद्यार्थी भारतीचे उपाध्यक्ष रत्नदीप आठवले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी भारताने आजपर्यंत समाजहितासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत व कायम राबवित राहील, असे राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी केले. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून किंग काँग, अंद्याचा वांदा, क्वीन ऑफ शिबा, लोणगेस्ट लाँग, दोषी कोण, फोडोम्बो यांसारख्या खेळातून जीवाचे धडे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. याच खेळातून अडचणीच्या काळातून बाहेर पडण्याची धडे दिल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी सांगितले. 

राज्यप्रवक्ता अर्जुन बनसोडे, राज्यसचिव जितेश पाटील, संघटक शुभम राऊत, साक्षी भोईर, दीपक भोसले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी भारती संघटनेचा आढावा सलोनी तोडकरी, अंजली वाघ, वैष्णवी ताम्हणकर यांनी मांडला. विद्यार्थी भारतीच्या १३ वर्षांच्या प्रवासात अनेक उपक्रम यशस्वी झाले. ‘अपडेट टू अपग्रेड’चा प्रवास अविरत सुरू राहणार असल्याचे शिबिर प्रमुख सर्वेश लवांडे व पूजा मुधाने यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search