Next
‘फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Sunday, August 06, 2017 | 01:00 AM
15 0 0
Share this article:

सिद्धेश धुळपरत्नागिरी : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली, की तरुणाईला वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून हा दिवस साजरा केला जातो; मात्र या वर्षी रत्नागिरीत हा दिवस झाडांशी मैत्री करून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी येथील पर्यावरणप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

या वर्षी फ्रेंडशिप डे सहा ऑगस्ट रोजी आहे. त्या दिनाचे औचित्य साधून पुणे येथील हरित मित्र परिवार आणि ‘दी गिफ्ट ट्री प्रोजेक्ट’ यांच्यामार्फत रोपांचे मोफत वाटप केले जाणार आहे. दोन महिन्यांत १० हजार रोपांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून,  रत्नागिरीतील सिद्धेश धुळप या तरुणाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी सिद्धेशने रत्नागिरी शहरात पाच हजारांहून अधिक रोपे मोफत वाटली असून, ‘सीडबॉल’ कार्यशाळाही आयोजित केली होती. आता ‘चला करू या झाडांशी मैत्री’ असे म्हणत सिद्धेश झाडांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

'दी गिफ्ट ट्री प्रोजेक्ट'अंतर्गत रोपांचे वाटप करताना सिद्धेश धुळप.याबद्दल माहिती देताना सिद्धेश म्हणाला, ‘माझ्या आईला झाडांची खूप आवड आहे. वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या लावून जगवणे, तसेच मिरची, टोमॅटो, गोंडा, गुलाब, शेवगा अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड तिने केली आहे. तिच्याकडूनच मला या उपक्रमासाठी प्रेरणा मिळाली आणि झाडांशी मैत्री होत गेली. खरे तर झाड हा आपला जन्मापासूनचा मित्र; मात्र या मित्राची जाणीव उन्हाळ्यात सावलीसाठी किंवा फुला-फळांसाठीच होते. एरव्ही हा मित्र दुर्लक्षितच असतो. म्हणून या ‘फ्रेंडशिप डे’निमित्त तरुणांसह सर्वांनीच ‘झाडं लावू या आणि झाडं देऊ या’ अशी संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहे.’

या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत सुमारे १० हजार रोपे मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी नावनोंदणी केली जाणार असून, मार्गदर्शनही केले जाणार आहे. या कामी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे यांचे विशेष सहकार्य लाभत असून, त्यांच्याबरोबरच निशांत नांदिवडेकर, ओंकार शिंदे, राहुल भाटकर, अमित देसाई, शिवाजी कारेकर, अभी कारेकर, योगेश मगदूम, अनघा निकम-मगदूम, सक्षम ग्रुप, स्रोत फाउंडेशन, राणे प्रतिष्ठान यांचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती सिद्धेशने दिली.

दरम्यान, हरित मित्र परिवार व गिफ्ट ट्री यांच्यामार्फत ‘झाड दत्तक योजना’ही राबविली जाणार आहे. ‘आपल्या घरी वाढलेली अतिरिक्त रोपे आम्हाला द्या; ती आम्ही ज्यांना हवी त्यांना देऊ,’ असे आवाहन करण्यात आले आहे. तुळस, कढीपत्ता, जास्वंद यांसारखी अनेक प्रकारची झाडे आपल्या दारात वाढतात. बऱ्याचदा आपण त्यांची छोटी रोपे व फांद्या तोडून टाकतो; मात्र अशा तोडलेल्या फांद्या टाकून न देता त्या दुसऱ्याला देऊन झाडं वाढवण्याचा हेतू यामागे आहे.

जंगलतोडीमुळे कमी होणारी झाडांची संख्या आणि त्यामुळे वाढत जाणाऱ्या पर्यावरणीय समस्या ही चिंतेची बाब आहे. भविष्यात उद्भवणारे धोके लक्षात घेऊन पर्यावरण संस्था आणि पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही  दिसून येत आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षरोपणासारखे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सिद्धेश आणि त्याच्या मित्रमंडळींतर्फे राबवला जाणार असलेला हा उपक्रमही चांगला विचार रुजवेल, अशी आशा आहे.

संपर्क :

सिद्धेश धुळप : ९९७०३ ४८१९७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Abhi ghag About
Nice thought....happy friendship day
0
0

Select Language
Share Link
 
Search