Next
‘शाश्वत जीवनशैली’ वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, December 31, 2018 | 05:37 PM
15 0 0
Share this article:पुणे : नवे वर्ष सुरू होताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या ‘शाश्वत जीवनशैली’ विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन ३० डिसेंबर २०१८ रोजी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते. ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम ‘वनराई’च्या ‘इको’ सभागृहात झाला.

या वार्षिक विशेषांकात डॉ. एम. एस. स्वामीनाथन, डॉ. माधव गाडगीळ, डॉ. हेमा साने, डॉ. भूषण पटवर्धन, गीता अय्यंगार आदी मान्यवरांचे लेख आहेत. ‘वनराई’चे अध्यक्ष धारिया हे वनराई मासिकाचे संपादक असून, अमित वाडेकर हे कार्यकारी संपादक आहेत. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून नववर्षाचा पर्यावरणस्नेही संकल्प मांडला; तसेच पर्यावरणविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

पाटील म्हणाले, ‘वृक्षराजी कमी होत असल्याने पर्यावरण आणि मानवी जीवन धोक्यात आले आहे. प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजेत आणि वाढवले पाहिजेत. अंत्यसंस्काराला लाकडे लागतात, म्हणून जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत. देवराया वाचवल्या पाहिजेत. रोजच्या कामात कागदाचा वापर कमी केला, तरी पर्यावरणाचे रक्षण प्रत्येकाला करता येईल. मी स्वतः कागदाचा कमीत कमी वापर करतो. जमेल तसा पुनर्वापरही करतो.’

पुणेकरांनी पाणी काटकसरीने आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन करताना ‘वनराई’ने वृक्षसंपदा वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले.

धारिया यांनी प्रास्ताविकात ‘वनराई’च्या कार्याची आणि ‘शाश्वत जीवनशैली’ या विशेषांकाची माहिती दिली. शाश्वत विकास हेच ‘वनराई’च्या कामाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. जवळच्या अंतरासाठी दुचाकीऐवजी सायकल चालविण्याचा संकल्पही त्यांनी मनोगतात सांगितला.

महापौर टिळक म्हणाल्या, ‘२६ जानेवारी २०१९ रोजी पुण्यात २५ इलेक्ट्रॉनिक बस कार्यान्वित होत आहेत. अशा ३०० बसचे उद्दिष्ट आहे. पुण्याच्या पर्यावरणासाठी सायकलींचा वापर वाढविणे आवश्यक आहे. जुन्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरक सवयी पुन्हा अंगीकारल्या पाहिजेत. लिफ्टऐवजी जिन्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प केला आहे.’

प्रा. जोशी म्हणाले, ‘पुणेकरांना ठाम मत असते. त्यांनी शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणपूरक सवयीसाठी ठाम मत केले पाहिजे.’ पवार यांनी आपल्या मनोगतात विशेषांकाचे व ‘वनराई’च्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यकारी संपादक वाडेकर यांनी ‘शाश्वत जीवनशैली’ अंक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. ‘वनराई’चे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search