पुणे : सध्या ‘वेब सीरिज’ हे लोकप्रिय माध्यम ठरत आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत, सर्वांचा लाडका ‘गणपती बाप्पा’ही आता अशाच एका वेब सीरिजमधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. ‘पुणेरी बाप्पा’ ही माहितीपर वेब सीरिज ‘संकल्प डिझाइन्स’ या पुण्यातील संस्थेने निर्माण केली आहे.
यामध्ये गणपती बाप्पाचा जीवनपट, काळानुसार उत्सवाचे बदलत गेलेले स्वरूप सादर करण्यात आले आहे. संकल्प डिझाइन्सने याद्वारे वेब सीरिज क्षेत्रात पदार्पण केले आहे. गेल्या सात वर्षांपासून ही संस्था ‘गणेश फेस्टिव्हल डॉट कॉम’च्या (www.puneganeshfestival.com) माध्यमातून गणपती उत्सवाची माहिती, छायाचित्रे, चलचित्रे देत आहे.
पुण्यातील व महाराष्ट्रातील गणेश उत्सव, त्याची महती, उत्सवाची परंपरा सातासमुद्रापार पोहोचावी हाच या मागचा उद्देश आहे. यु ट्यूबवर ‘पुणे गणेश फेस्टिव्हल’ या चॅनेलवर ‘पुणेरी बाप्पा’ ही वेब सीरिज रसिकांना पाहायला मिळेल.