Next
सुकांतचे स्वप्न - जागतिक वर्चस्व
BOI
Friday, March 09 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सुकांत कदम

देवेंद्र झाझरिया, दीपा मलिक या दिव्यांग खेळाडूंनी ‘रिओ पॅरालिंपिक’ स्पर्धा गाजवल्या. त्याप्रमाणेच २०२०मध्ये टोकियोत होणारी पॅरालिंपिक स्पर्धा गाजवण्यासाठी सुकांत कदम सध्या मेहनत घेत आहे. ‘तो टोकियो गाजवील आणि पॅरालिंपिक बॅडमिंटनमध्ये जागतिक वर्चस्व प्रस्थापित करील’, असा विश्वास त्याचे प्रशिक्षक निखिल कानेटकरही व्यक्त करत आहेत... ‘क्रीडारत्ने’ या सदरात आजचा लेख दिव्यांग बॅडमिंटनपटू सुकांत कदमबद्दल...
...............
सांगलीत जन्मलेला सुकांत कदम सध्या पुण्यातील बालेवाडीत असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे राष्ट्रीय विजेते व प्रशिक्षक निखिल कानेटकर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. तिथेच पुढील वाटचालीसाठी सरावही करत आहे. दिव्यांगांच्या बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सुकांत, देशात आणि परदेशात एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकत आहे. 

सुकांतची जिद्द मोठी असली, तरी प्रत्येक स्पर्धेत सहभागी होताना त्या त्या देशाचा व्हिसा मिळवण्यात प्रत्येक वेळी अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले होते व या पत्रात आपली ही कैफियत मांडली होती. आश्चर्यकारकपणे त्याला सरकारने मदतीचा हात पुढे केला व त्याला व्हिसा मिळाला आणि त्याला स्पर्धेसाठी सहभागी होता आले; पण हे असे प्रत्येकच स्पर्धेपूर्वी करत बसायचे, की सराव करायचा, हाही एक मोठा प्रश्न आहे. 

देवेंद्र झाझरिया, दीपा मलिक या दिव्यांग खेळाडूंनी ‘रिओ पॅरालिंपिक’ गाजवले. त्याप्रमाणेच २०२०मध्ये टोकियोत होणारी पॅरालिंपिक स्पर्धा गाजवण्यासाठी सुकांत सध्या मेहनत घेत आहे. त्याचे प्रशिक्षक निखिल कानेटकरही, ‘तो टोकियो गाजवील आणि पॅरालिंपिक बॅडमिंटनमध्ये जागतिक वर्चस्व प्रस्थापित करील’, असा विश्वास व्यक्त करत आहेत. प्रश्न आहे तो हा, की यासाठी समाजातील दिलदार व्यक्तींनी पुढे येऊन सुकांतला मदतीचा हात दिला पाहिजे. सर्वच स्तरांवरून सुकांत हे आवाहन करत आहे.  स्पर्धेला अजून दोन वर्षे बाकी आहेत, पण त्याच्या आवाहनाला म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही, असे दिसत आहे.

भारतीय क्रीडाक्षेत्रात क्रिकेट आणि काही प्रमाणात टेनिस वगळता अन्य खेळातील खेळाडूंची अवस्था, ‘ओम भवती भिक्षां देही’ अशीच आहे. आता हेच पाहा ना.. सुकांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांमागून पदके मिळवत आहे, जागतिक वर्चस्वाचे स्वप्नही पाहत आहे; मात्र प्रायोजक मिळत नाहीत. मग स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा कसा आणि निधी कसा उभा करायचा, हा सध्या त्याच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे.

मुळात भारतात धडधाकट खेळाडूंनाही मोठ्या स्पर्धेत सहभागी होताना प्रायोजक व सरकारी मदत मिळत नाही, तर मग दिव्यांग खेळाडूंची काय अवस्था असेल याची कल्पनाच करवत नाही. पी. व्ही. सिंधू जेव्हा ‘रिओ ऑलिंपिक’ला रवाना होणार होती, तेव्हा पदरमोड करूनच तो खर्च तिला उचलावा लागला होता. तिने जेव्हा ऑलिंपिक पदक मिळवले, तेव्हा मात्र तिच्यावर पुरस्कारांचा, प्रायोजकांच्या पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. पदकापूर्वी दुर्लक्ष आणि नंतर मात्र वाहवा ही परिस्थिती आहे. मग एका पायाने अधू असलेला पॅरालिंपिक बॅडमिंटनपटू सुकांत कदमसमोर तर अडचणींचे किती डोंगर उभे असतील.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बॅडमिंटनपटूची ही अवस्था आहे, तर बाकी दिव्यांग खेळाडूंबाबत तर न बोललेलेच बरे. यंदा सुकांतने स्पेनमध्ये झालेल्या पॅराबॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत आणि दुहेरीत ब्रॉंझ  पदक पटकावले आहे. मागील वर्षाखेरीस व चालू वर्षाच्या सुरुवातीला त्याने स्पेन, युगांडा, टर्की, थायलंड आणि आयर्लंड अशा एकत्र पाच देशांत स्पर्धा खेळल्या. सर्व स्पर्धा त्याने जिंकल्या. चीनमध्ये झालेल्या सांघिक स्पर्धेत त्याने इतर खेळाडूंसह एकूण तेरा पदके जिकंली. याच प्रकारच्या स्पर्धेत थायलंडमध्ये सात पदके मिळवली. स्पेनमध्ये तर एकेरी व दुहेरी अशी लागोपाठ ब्राँझ पदके पटकावली. ही कामगिरी निश्चितच नजरेत भरणारी आहे; मात्र आपल्याकडील प्रायोजक, प्रसिद्धीमाध्यमे मुद्दाम डोळेझाक करतात असे वाटते.

यंदाही सुकांतला कमीत कमी सहा स्पर्धा परदेशात खेळायच्या आहेत. त्यासाठी निधीची कमतरता आहे. तो कोण आणि कसा गोळा करणार हा मोठा प्रश्न आहेच. सुकांतच्या घरची परिस्थिती बेताची आहे आणि पॅरालिंपिक संघटनाही फार श्रीमंत नाहीत. दरम्यान एकदा क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अन्य खेळांसाठी निधी दिला होता. तोच कित्ता गिरवत यंदाही आणि पुढील वर्षीही अशा खेळाडूंसाठी निधी दिला तर या खेळाडूंनाही जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड स्वतः एक माजी ऑलिंपिक पदकविजेते आहेत. त्यामुळे खेळाडूंना सोयीसुविधा, निधी यांची किती आवश्यकता असते हे ते उत्तम प्रकारे जाणून आहेत. ‘खेलो इंडिया’ ही मोहीमही त्यांनी देशात राबवण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून देशात क्रीडासंस्कृती रुजेल. याअंतर्गतच त्यांनी मंत्रालयामार्फत आणि क्रिकेट मंडळाला विनंती करून निधी उभारला पाहिजे.

भारत सरकारने यंदा आणि पुढील वर्षी अंदाजपत्रकात टोकियो ऑलिंपिक डोळ्यांसमोर ठेवून क्रीडा क्षेत्रासाठी निधीत भरघोस वाढ करावी व त्यातील वाटा प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी. राज्यवर्धन राठोड या सगळ्यांतून चांगला मार्ग काढतील व सुकांत कदमसारख्या बहुसंख्य खेळाडूंना निधीची व सोयी-सुविधांची कमतरता भासणार नाही अशी आशा वाटते.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link