Next
‘अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा’
विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांची मागणी
प्रेस रिलीज
Friday, June 28, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महाराष्ट्रातदेखील अंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर रोख लावायचा असेल, तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा’ अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याची लक्षवेधी आज (२८ जून) विधानसभेत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केली.

‘अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीचे नुकसान होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे ११वी, १२वीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते, हे कळत नाही,’ ही बाब पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. 

या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू; तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्यासाठी मुंबईत पाच स्वंतत्र कक्ष काम करत आहेत. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. 

भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अंमली पदार्थांची ‘खिशातली दुकाने’ याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर बोलताना पवार यांनी जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही ही ‘खिशातली दुकाने’ बंद करा, अशी मागणीही केली.

यावर उत्तर देताना पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला आता १० ऐवजी २० वर्षांची शिक्षा दिली जात आहे. पूर्वी मॅजिस्ट्रेटसमोर या केसेस चालत होत्या. आता जलदगतीने चालाव्यात यासाठी त्या सेशन कोर्टात चालविण्यात येत आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये साध्या वेषात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

या लक्षवेधी दरम्यान अजित पवार, भाजपच्या आमदार चौधरी, काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी प्रश्न विचारले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search