Next
‘मतदान ओळखपत्र अनिवार्य नाही’
BOI
Saturday, April 13, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावीत, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

‘भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या ११ कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनाचालक परवाना, केंद्र-राज्य शासन-सार्वजनिक उपक्रम-सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक-पोस्टातर्फे वितरित छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्यातर्फे नॅशनल पॉप्युलेशन अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, ‘मनरेगा’अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र आणि खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य केली आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.

‘छायाचित्रासह मतदान ओळखपत्राने मतदाराची ओळख पटत असेल, तर मतदार ओळखपत्रावरील किरकोळ विसंगती दुर्लक्षित केल्या जातील. मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांने वितरित केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारले जाईल. मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास अशा मतदारास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या ११ कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे,’ असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
         
‘ओळखीचा पुरावा म्हणून मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’
‘मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारांकडे आधारकार्डही असून, अन्य ११ प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही, असा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे; तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील,’ असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sushil , pandharpur About 71 Days ago
यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल .
0
0

Select Language
Share Link
 
Search