Next
निसर्गरम्य कारवार, गोकर्ण महाबळेश्वर
BOI
Wednesday, September 05, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मिर्जन किल्ला
सदाहरित वृक्षांनी बहरलेला सह्याद्री, त्यातील श्वापदे, सुंदर जलप्रपात, झाडीने किनारे झाकलेल्या खाड्या, निळाशार समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा भटकंती करणाऱ्यांना खुणावत आहेत. डोसे-उडीद वडे-उत्तप्पे, पापलेट, सुरमई, बांगडे खवय्यांना भुरळ घालत आहेत. हंगामानुसार अननस, फणस, काजू, नारळ, शहाळी अशी मधुर फळे आहेतच. हे सारे अनुभवण्यासाठी ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात भटकंती करू या कर्नाटकचा किनारी प्रदेश, कारवार आणि आजूबाजूच्या ठिकाणी...
.............
गोकर्ण महाबळेश्वर
गोकर्ण महाबळेश्वर : रामायणातील कथेशी निगडित असलेले हे ठिकाण पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. ॐ चिन्हाच्या आकारात असलेला समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. महाबळेश्वर मंदिर आणि महागणपती मंदिर ही भाविकांची श्रद्धास्थाने. येथील श्री शंकराचे आत्मलिंग स्वयंभू आहे. ते गाईच्या कानाच्या आकारात असल्यामुळे गोकर्ण महाबळेश्वर हे नाव रूढ झाले.

त्याबाबतची आख्यायिका अशी  - रावण श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करतो. महादेव नेहमीप्रमाणे प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात. तेव्हा रावणाने शंकराकडे आत्मलिंग मागितले. आत्मलिंग ज्याच्याजवळ असेल, त्याला मृत्यूचे, पराभवाचे भयच नाही. श्री शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले; पण अशी अट घातली, की रावणाने लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही; पण आता रावण अजिंक्य होणार असल्याच्या भीतीमुळे त्यामुळे देव चिंतेत पडले. काही तरी करून लिंग परत आणले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू झाले. शेवटी श्री गजाननाने ही कामगिरी पार पाडायचे ठरवले. येथील समुद्रकिनाऱ्यावर तो गुराखी होऊन आला. रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते. दरम्यान, रावणाला लघुशंकेला जायचे होते; पण आत्मलिंग जमिनीवर ठेवायचे नाही आणि ते हातात असताना लघुशंका करणार कशी, असा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात गुराखी रूपातला गणपती त्याला दिसला. आकाशमार्गे जाणारा रावण खाली उतरला आणि गुराख्याला त्याने थोड्या वेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले. ‘तीन म्हणायच्या आत आला नाहीत, तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन,’ अशी अट त्याने घातली. ती रावणाने मान्य केली आणि तो लघुशंकेसाठी गेला. ते पाहताच गणपतीने तीन आकडे मोजले आणि लिंग गाईच्या कानात ठेवले. गाईच्या कानातून लिंग काढण्याचा प्रयत्न रावणाने केला; पण गाय जमिनीत अदृश्य झाली. रावणाने मिळविलेला वर निष्फळ झाला. याच ठिकाणी श्री शंकराचे मंदिर उभारले गेले व ते गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.
बाजूच्या डोंगरावरून या सुंदर समुद्रकिनाऱ्याचे दर्शन होते. येथे जाण्यासाठी चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. येथे राहण्यासाठी अनेक लॉज आणि धर्मशाळा आहेत. जेवणाखाण्याच्याही सोयी चांगल्या आहेत. अत्यंत धार्मिक वातावरण असलेले हे ठिकाण आहे.

दांडेली अभयारण्यदांडेली अभयारण्य, पेपरमिल : ८३४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले दांडेली हे घनदाट सदाहरित जंगल आहे. येथे हत्ती, गवे, उडत्या खारी (शेकरू), अस्वले, भुंकणारी हरणे, अनेक प्रकारचे पक्षी आहेत. पाच ते सहा फूट उंचीची वारूळेही येथे पाहायला मिळतात. येथे वन विभागाचा मोठा सागवान डेपो आहे. दांडेलीजवळच २५ किलोमीटरवर नैसर्गिक कावळा केव्हजदेखील आहेत. २२०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर आणि महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यात पसरलेले अनशी अभयारण्य दांडेलीलाच लागून आहे. दांडेली अभयारण्य कारवारपासून ११७ किलोमीटर आणि हुबळीपासून ७५ किलोमीटरवर आहे.

सिरसीसिरसी : हे कारवारमधील एक महत्त्वाचे व्यापारी ठिकाण असून, जंगलांनी वेढलेले सुंदर ठिकाण आहे. मसाल्याच्या पदार्थांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. हा प्रदेश सोंड राजवटीच्या आधिपत्याखाली होता. यक्षगान नाटिका व दोल्लू कुन्था नृत्य यांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे.

होन्नावर
होन्नावर : हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. शिमोगाकडे व जोग फॉलकडे येथून जाता येते. शरावती नदीवरील पुलामुळे येथील निसर्ग पाहता येतो. होन्नावरपासून सहा किलोमीटरवर अप्सरा कोंडा फॉल्स आहे. येथे सुंदर समुद्र किनारा आहे. पंधरा किलोमीटर अंतरावर इदगुनजी येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिर आहे. हा परिसर यक्षगान नाट्यप्रकार, नाट्यशास्त्रीय नृत्य प्रकार यांसाठी प्रसिद्ध आहे.

नूर मशीदभटकळ : हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि शरावती नदीच्या दक्षिणेला वसले आहे. हे शहर राष्ट्रीय महामार्ग ६६वर (मुंबई-कोची) आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्टेशनही आहे. मासेमारी हा येथील मोठा उद्योग आहे. समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. भटकळमध्ये हिंदू जैन धर्मीयांची मंदिरे आहेत. भटकळ येथे अनेक राजवंश आणि शासकांचे उदय आणि पतन झाले आहे. इ. स. स ८००मध्ये येथे चोल घराण्याची सत्ता होती. विजयनगर साम्राज्याच्या हाताखाली येण्यापूर्वी भटकळ इ. स. १२९३ ते इ. स. १३९३पर्यंत होयसळ साम्राज्याचा भाग होते. नंतरच्या काळात भटकळचे शहर हदवल्ली येथील जैन सलुवा शासकांच्या ताब्यात गेले. त्यांच्या राजवटीत अनेक जैन मंदिरांची उभारणी झाली. त्यापैकी चंद्रनाथ मंदिर बघण्यासारखे आहे. येथे मुस्लिम समाज मोठा आहे. त्यामुळे जामा मशीद, खलिफा मशीद अशा अनेक मशिदी येथे आहेत. त्यातील नूर मशीद ही अलीकडील काळात बांधलेली देखणी मशीद आहे. भटकळजवळच पोर्तुगीजांनी इ. स. १५१०मध्ये विजयनगरच्या राजाच्या परवानगीने किल्ला बांधला असून, त्याचे आता केवळ अवशेष आहेत. काही ऐतिहासिक पोर्तुगीज ग्रंथांमध्ये ‘बैटेकल’ म्हणून हे शहर ओळखले जायचे.

मिर्जन किल्ला व बंदर
मिर्जन किल्ला व बंदर : गोकर्ण महाबळेश्वरपासून २१ किलोमीटरवर कुमटा रस्त्यावर मिर्जन किल्ला असून, १६व्या शतकात राणी चेनभैरदेवी हिने हा किल्ला बांधला. तिने ५४ वर्षे राज्य केले. या भागातील माल्पे, मिर्जान, अंकोला, कारवार बंदरावर तिचे नियंत्रण होते. मसाल्याच्या पदार्थांची या भागातून युरोपात व अरब देशात निर्यात होत असे. त्यावर चेनभैरदेवीचे नियंत्रण होते. पोतुगीज तिला ‘पेप्पर क्वीन’ (पेप्पर म्हणजे मसाले) म्हणायचे. ती जैन होती; पण तिने काही हिंदू मंदिरेही बांधली होती. त्या काळी तेथे मातृसत्ताक कुटुंब पद्धतही होती.

मुरुडेश्वर
मुरुडेश्वर : मुरुडेश्वर हे किनारी कर्नाटकातील लोकांचे आवडते ठिकाण. २० मजली २३७ फूट उंचीचे राजगोपुर व जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्री शंकराची १२३ फूट उंचीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य. तिन्ही बाजूंनी समुद्राचे पाणी असलेल्या कंडुकागिरी पहाडावर मुरुडेश्वराचे मंदिर आहे आहे. जगातील सर्वांत उंच अशा या गोपुरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. आर. एन. शेट्टी नामक उद्योगपतीने हे बांधकाम करवून घेतले आहे. तसेच या मुरुश्वर मंदिराचा विकास आणि कंडुका हिलवरील शंकराच्या मोठ्या मूर्तीचेही काम त्याने करवून घेतले आहे.

या मंदिरासंबंधी स्कंद पुराणात आख्यायिका आहे. वर सांगितलेल्या कथेनुसार, शंकराचे आत्मलिंग रावणाने उपसून काढण्याचा प्रयत्न केला; पण ते त्याला काढता आले नाही. त्याच्या वरील झाकलेला भाग रागाच्या भरात त्याने भिरकावून दिला. तो चार ठिकाणी पडला. सज्जेश्वर (कारवारपासून ३५ किलोमीटर), धारेश्वर (गोकर्णच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर), गुणवनथेश्वर (गोकर्णच्या दक्षिणेला ६० किलोमीटर) आणि मुरुडेश्वर (गोकर्णच्या दक्षिणेला ७० किलोमीटर). त्यापैकी मुरुडेश्वरला झाकलेले कापड पडले. तेथेच शिवमंदिर उभारण्यात आले. येथे आत्मलिंग कथेच्या प्रसंगाचे देखावेही मूर्तिरूपात दाखविण्यात आले आहेत. येथील समुद्रकिनारा खूप छान आहे.

मधुकरेश्वर मंदिरबनवासी : इ. स. ३४५मधील कदंब राजांची पहिली जुनी राजधानी येथे होती. येथे एका बौद्ध स्तूपाचे अवशेष आहेत. येथील मधुकरेश्वर मंदिर कर्नाटकमधील सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते, की कदंब राजवंशाचा पहिला राजा मयूर शर्मा याने या मंदिराची उभारणी केली. कदंब हा कर्नाटकातील सर्वांत जुना वंश आहे. चालुक्यांचा उदय होईपर्यंत त्यांनी कर्नाटकातील बऱ्याच भागांवर राज्य केले. चालुक्य व होयसळ राजवटीत मधुकेश्वेश्वराच्या मंदिरामध्ये अनेक बदल झाले. हे ठिकाण सिरसीपासून २२ किलोमीटरवर आहे.

लालगुली धबधबा
लालगुली धबधबा : २५० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा निसर्गरम्य वातावरणाची शोभा वाढवितो. तो यल्लापूरपासून १५ किलोमीटरवर आहे.

लुशिंग्टन फॉल्सलुशिंग्टन फॉल्स : हा धबधबा सिद्दीपूरजवळ असून, त्याला अनचल्ली धबधबा असेही म्हणतात. अधनाशिनी नदीमध्ये ११६ मीटर मीटर (381 फूट) उंचीवरून दा धबधबा कोसळतो. तो सिरसीपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.


मागोड फॉल्समागोड फॉल्स : बेडथी नदी ६५० फूट उंचीवरून दोन टप्प्यांत दाट वनराईतून उडी घेते. घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर हा धबधबा खूप छान दिसतो. याचे सिरसीपासूनचे अंतर ५९ किलोमीटर आहे.


सथोडी फॉल्ससथोडी फॉल्स : यल्लापूरपासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर हे सहलीचे ठिकाण आहे, उंची कमी (५०फूट) असली, तरी धबधबा देखणा आहे. स्थानिक लोक त्याला छोटा नायगारा म्हणतात.

मुंदगोडमुंदगोड : १९६०मधे भारत सरकारने या गावात तिबेटी निर्वासितांसाठी चार हजार एकर जमिनीवर कर्नाटक सरकारच्या सहकार्याने वसाहत उभारली आहे. येथे बौद्धविहार असून, १५ फूट उंचीची सुवर्णलेपित बुद्धमूर्ती आहे. हे ठिकाण छोटा तिबेट म्हणून ओळखले जाते.


याना गुंफायाना गुंफा व विभूती फॉल : हे एक नैसर्गिक आश्चर्य आहे. भैरेश्वर शिखर (३९० फूट) आणि मोहिनी शिखर (३०० फूट) या दोन टेकड्यांसाठी व त्यातील विशिष्ट खडकप्रकार आणि रचनेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वतराजीतील सदाहरित जंगलात हे ठिकाण असून, हिरव्यागार वनश्रीने वेढलेल्या या टेकड्या खूपच विलोभनीय दिसतात. गोकर्ण महाबळेश्वर दर्शनाच्या वेळी हे ठिकाण आवर्जून पाहावे. भू-वैज्ञानिकांच्या मते गुहेतील शिवलिंगाची नैसर्गिक निर्मिती चिकणमातीच्या स्वरूपातील स्टॅलेक्टिसाइट्स आणि स्टॅलिग्मेट्समुळे झाली असावी. अशा खडकांचा वापर सिमेंट निर्मितीसाठी होतो. पुराणातील मोहिनी व भस्मासुराच्या कथेशी हे ठिकाण निगडित आहे, असे मानले जाते. पदभ्रमण करणाऱ्यांसाठी हे आवडते ठिकाण आहे. येथे जाताना थोडे चालत, पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे तब्येत व वय या गोष्टींचा विचार करून जावे. येथे जवळच विभूती फॉल आहे. त्याचे अंतर गोकर्ण महाबळेश्वरपासून ४७ किलोमीटर.

स्कूबा डायव्हिंगनेत्राली बेट :
पाकोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य. नेत्राली कबूतर बेट म्हणूनही ओळखले जाते. मुरुडेश्वर मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात हे एक छोटे बेट आहे. येथे वस्ती नाही. येथे जंगली मेंढ्या आढळतात. गोव्यातून येथे सहली आयोजित केल्या जातात. स्कूबा डायव्हिंग, समुद्रातील जलचर बघण्याची व्यवस्था येथे केली जाते

सदाशिवगडसदाशिवगड : हे ऐतिहासिक ठिकाण अरबी समुद्र व काली नदीच्या संगमाजवळ उजव्या तीरावर आहे. इ. स. १४०० ते १७६४पर्यंत विजयनगरच्या आधिपत्याखालील नायक राजवटीची सत्ता येथे होती. शिवाजी महाराजांनी १६६५मध्ये हा भाग ताब्यात घेतला होता. सदाशिव नायकाने इंग्रजांच्या मदतीने पुन्हा १६९८मध्ये सत्ता काबीज केली व किल्ल्याचे बांधकाम केले. त्याच्या नावावरूनच सदाशिवगड हे नाव मिळाले. पोतुगीज, ब्रिटिश यांचा हस्तक्षेप चालू होताच. टिपूच्या पाडावानंतर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. काही दिवसांपूर्वी येथे एक भुयारही सापडले आहे. कारवार सदाशिगड भागात अजगर व विविध प्रकारचे सर्प आढळतात.

कारवारकारवार : कादवाडवरून कारवार हे नाव आले. इस. १५१०मध्ये पोर्तुगीजांनी येथील किल्ला जिंकून जाळून टाकला. शिवाजी महाराजांनी १६६५मध्ये या भागावर वर्चस्व मिळवले होते. येथील उल्लेखनीय व्यक्तींमध्ये राम राघोबा राणे, भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती डी. जी. पालेकर आणि आध्यात्मिक गुरू श्री पद्मनाभ महाराज यांचा समावेश आहे. कारवारला रवींद्रनाथ टागोर १८८२मध्ये येऊन राहिले होते. ते कारवारला कर्नाटकचे काश्मीर म्हणत असत. त्यांनी त्यांचे पहिली कादंबरी कारवार समुद्रकिनाऱ्यावरच लिहिली. ब्रिटिशांनी १८५७मध्ये सध्याच्या कारवारची निर्मिती केली. कारवार हे महत्त्वाचे बंदर आहे. कारवारजवळ नौदलाचा मोठा तळ आहे, विमानतळही आहे.
कारवारचा समुद्रकिनारा, तेथील रेस्टॉरंट्स खूप छान आहेत. उडुपी पदार्थांची रेलचेल असते. काजू, नारळ, तसेच पापलेट, सुरमई अशा अनेकांच्या आवडीच्या गोष्टी येथे असतात.

कसे जायचे?
कोकण रेल्वेने हा भाग जोडलेला आहे. जवळचा विमानतळ पणजी (गोवा). हमरस्त्याने हुबळी, शिमोगा व मंगळूरशी जोडलेले. जलमार्गाने अरबी समुद्रावरील किनाऱ्यावरील बंदरांना जोडलेले. पुणे,कोल्हापूर, हुबळी, हावेरी, दावणगिरी, हळेबिडू चिकमंगळूर, शिमोगा, उडुपी, कारवार, गोवा, चिपळूण, ताम्हिणी घाटातून पुणे अशी ‘सर्क्युलर ट्रिप’ चांगली होऊ शकते. शक्यतो ज्या मार्गाने जायचे त्याच मार्गाने परत न येता दुसऱ्या मार्गाने यावे म्हणजे अधिक ठिकाणे पाहता येतात.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

याना गुंफा

(कारवार, गोकर्ण महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या ठिकाणांची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer Bapat About
मस्त
0
0
जयश्री चारेकर About
फारच सुंदर परत एकदा अनुभवल .फारच सुंदर आहे
0
0
Anuradha Kamat About
Karwar is really beautiful. ... well scripted ... nice to know about my place ... love Karwar
0
0

Select Language
Share Link
 
Search