Next
गरज पाण्याची...
BOI
Wednesday, February 21 | 09:45 AM
15 0 0
Share this story


मानवी आरोग्याबाबत माहिती देताना पाण्याचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले गेले आहे. मानवी शरीर हे ७० टक्के पाण्याने व्यापले आहे. असे असले तरी, पुरेसे आणि भरपूर पाणी पिण्याकडे फार लक्ष दिले जात नाही. भरपूर, स्वच्छ आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे, ही आरोग्यदायी जीवनशैलीची पहिली पायरी आहे, असे म्हणायला हरकत नाही... ‘पोषणमंत्र’ या सदरात आज पाहू या मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या ‘पाणी’मंत्राबद्दल...
................................................ 
रोजच्या धावपळीच्या व गडबडीच्या जीवनशैलीत सकाळी व्यायाम, ऑफिस, विक एंड सहल, कौटुंबिक समारंभ असे भरगच्च कार्यक्रम असतात आणि अशा कोणत्याही कार्यक्रमात काही लोक नियमितपणे आपली पाण्याची बाटली नेत असतात असे आढळून येते. ती पाण्याची बाटली बघितली, की दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.. एक म्हणजे ती बाटली बाळगणारी व्यक्ती आपल्या आरोग्याबद्दल सजग असते नाहीतर दुसरे म्हणजे तिला मुत्रापिंडाचा आजार असेल किंवा बाहेरच्या पाण्याचा त्रास होत असावा. अशा वेळी वाटते, खरंच.. ही एक चांगली सवय आहे. हे सगळे विचार पाण्याबद्दल बरेच काही सांगून जातात. 

पावसाळ्यात गढूळ पाणी, पाण्यातील सूक्ष्मजंतूंमुळे होणारे कावीळ, पोट बिघडणे यांसारखे आजार इत्यादींचे प्रमाण प्रचंड वाढते. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचाही सल्ला दिला जातो. तो योग्यही आहे. प्रवासात आपल्याजवळचे पाणी संपले की आपण जे ‘डिस्टील्ड वॉटर’ उपलब्ध असेल, ते पितो, पण काही वेळा या पाण्याचाही त्रास झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे मग पोट बिघडणे, उलट्या होणे, इत्यादींमुळे तब्येत बिघडते. याचे कारण त्या पाण्यात भेसळ तरी असते किंवा ते पाणी कोणत्याही प्रकारे प्रक्रिया केलेले नसून कंपनीचे नाव असलेल्या बाटलीत नळाचे साधे पाणी भरून ते आपल्या माथी मारलेले असते.  

भेसळयुक्त अन्नाचा जसा त्रास होतो, तसा भेसळयुक्त पाण्याचाही होतो. पाणी हे सहा महत्त्वाच्या पोषक द्रव्यांपैकी एक मानले गेले आहे. संस्कृत भाषेत पाण्याला ‘जीवन’ असेच म्हटले आहे. त्यात उष्मांक किंवा पोषणमुल्ये आहेत, असे अजिबात नाही, पण तरीही पाण्याला इतके महत्त्व का दिले जाते..? आपल्या शरीरात दोन प्रकारे पाणी जाते. एक, अन्नपदार्थांमधून आणि दुसरे म्हणजे आपण जे पाणी पितो ते. अन्न शिजवताना चहा, कॉफी, सूप इत्यादींमार्फत जवळपास २० टक्के पाणी शरीरात जाते. 

आपले शरीर लाखो पेशींचे बनलेले असते व प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीराचे तपमान योग्य ठेवणे, अन्न तोंडापासून आतड्यापर्यंत पोहोचवणे हे कार्य याद्वारे केले जाते. सांधे व मज्जारज्जू यांमध्ये पाणी वंगणासारखे काम करते. मूत्रपिंडाचे कार्य, रोजच्या शौच्याची सवय इत्यादी महत्त्वाची कामे पाणी करत असते. आपण जे पाणी पितो व शरीराबाहेर जेवढे पाणी फेकतो, त्यात समतोल असणे अत्यंत गरजेचे असते. त्वचा, श्वासोच्छवास, मूत्र ह्याद्वारे पाणी शरीराबाहेर टाकले जाते. फेकले गेलेले पाणी जर भरून काढले नाही, तर आपल्याला निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. निर्जलीकरण झाल्यावर चक्कर येते एवढे आपल्याला माहित असते, पण प्रत्येक वेळी चक्कर आलीच पाहिजे असे नाही. रोजच्या जगण्यात आपल्याला कारण नसताना थकवा येणे, डोळे दुखणे, उत्साह न वाटणे, शौचास साफ न होणे इत्यादींचे कारण शरीरातील पाणी कमी होणे, हेदेखील असू शकते.

प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते, पण सर्वसाधारणपणे आपण ऐकतो की १०-१२ ग्लास पाणी रोज प्यावे. आणखी एका पद्धतीने आपण स्वतःची पाण्याची गरज माहित करून घेऊ शकतो. आपल्या वजनाला ३० ने गुणून जे उत्तर येईल तेवढे मिलीलीटर पाणी शरीरात जाणे गरजेचे असते. उदाहरणार्थ एखाद्याचे वजन ६० किलो असेल, तर त्याच्या शरीरात १८०० मिलीलीटर किंवा अंदाजे २ लिटर पाणी जाणे गरजेचे असते. 

आपल्या  शरीरातील पाण्याचे कार्य बघू या.. 
पाणी व स्नायूंचे कार्य : पाण्यामध्ये अनेक खनिजे व जीवनसत्वे विरघळून शरीरात पोहोचवली जातात. स्नायूंना उत्तम कार्यासाठी त्याची फार आवश्यकता असते. ही पोषकतत्त्वे पाण्यामार्फत जर स्नायूंना मिळाली नाहीत, तर स्नायू पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाहीत. 

पाण्यामुळे शरीरातील इतर शरीर द्रव्यांचे प्रमाण कायम राखले जाते : आपले शरीर ६० ते ७० टक्के पाण्याने बनले आहे. त्यामध्ये लाळ, पचनाला आवश्यक द्रव्ये यांचाही समावेश आहे. मेंदू व मज्जातंतू यांना बाहेरून सेरेब्रोस्पायनल फ्ल्युईड संरक्षण देते. अशा महत्त्वाच्या पातळ पदार्थांमुळे शरीर व्यवस्थित कार्य करू शकते.  मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील पाणी कमी झाल्याचा संदेश तो आपल्याला देतो व मुत्रापिंडाला पाण्याच्या गरजेबद्दल सूचना देतो.
 
उष्मांक नियंत्रित करणारे पाणी : वजन कमी करणाऱ्यांसाठी पाण्याचे काही वेगळेच महत्त्व आहे. भरपूर पाणी प्यायल्याने व्यायाम पूर्ण क्षमतेने केला जातो, ताजेतवाने वाटते, पोट भरल्याचे समाधान देणारे पाणी वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी अमृतच आहे. शिवाय भरपूर सलाड, सूप, दूध, ताक इत्यादींमुळे शरीराला पाणी पुरवता येते. यामुळे पोटही भरते व वजन वाढण्याचीही भीती नाही. 

त्वचेचे आरोग्य पाणी सांभाळते : शरीरातून त्वचेवाटे घाम बाहेर पडतो. त्यामध्ये पाणी व इतर विषारी पदार्थ असतात. हे खूप महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे शरीराचे तपमान राखले जाते. जर शरीराला पाण्याची सारखीच गरज भासू लागली, तर निर्जलीकरणामुळे त्वचा कोरडी व सुरकुतलेली दिसू लागते व चेहेराही निस्तेज दिसतो. 

पोट साफ होण्यास पाणी अत्यावश्यक आहे : भरपूर पाण्यामुळे अन्न मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचते. चयापचयाची क्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यक पाणी मिळत राहिल्यास शौचास सुलभतेने होते, अन्यथा पाणी कमी पडल्यास आतडे त्या कामासाठी पाणी शोषून घेतात व पुढे शौच सुलभ होण्यास पाण्याची कमतरता भासते. पाण्यासोबत तंतुमय पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत.

पाणी व मूत्रपिंडाचे कार्य : मूत्रपिंडामध्ये चहाच्या गाळण्याप्रमाणे रक्तातील अनावश्यक व विषारी पदार्थ व पाणी बाहेर काढले जाते. त्यातून मूत्र तयार होते.  हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मुत्रापिंडाला पाण्याची आवश्यकता असते. यामुळे आपले शरीर आतून अखंड स्वच्छ होत असते. पाणी कमी पिऊन आपण मूत्रपिंडावरचा कामाचा भार वाढवत असतो. त्याचा त्रास आपल्याला मूतखड्यांच्या आजाराच्या स्वरुपात भोगावा लागतो. 

ह्यासाठीच आपण भरपूर  व स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूत ९५टक्के, रक्तात ८२टक्के, फुप्फुसात ९०टक्के प्रमाण पाण्याचे असते. संस्कृतात पाण्याला जीवन म्हटले आहे ते उगाच नाही. त्यामुळे उत्तम आरोग्यदायी जीवन जगण्यास आवश्यक पाण्याचे प्रमाण ठेवणे आपल्याच हातात आहे.         

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
गजानन About 298 Days ago
उपयुक्त माहिती
0
0

Select Language
Share Link