Next
‘मनातल्या गोष्टी उपसायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय’
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, August 20, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

‘सीप’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आशुतोष पारसनीस यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली.

पुणे : ‘चित्रपट हे माध्यम लहानपणापासून खूप जवळचे होते. चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे, असंही म्हटले जाते; पण माझ्या जीवनाचे प्रतिबिंब मला त्यात कधी दिसलेच नाही, म्हणून याच माध्यमातून मी माझी गोष्ट सांगण्याचा, मनातल्या गोष्टी उपसण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांनाही या गोष्टी आवडत आहेत याचा मला आनंद आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. 

सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात ‘सीप’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. त्या वेळी आशुतोष पारसनीस यांनी नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

मर्क्युरी इंडिया या सेल्स परफॉर्मन्स कन्सल्टंट संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रवी सुब्रमण्यम, ‘सीप’चे नवनिर्वाचित अध्यक्ष अश्विन मेघा, माजी अध्यक्ष समीर सोमण, अभिजित अत्रे आदी या वेळी उपस्थित होते.   

या वेळी बोलताना मंजुळे म्हणाले, ‘शाळा, महाविद्यालयात असताना माझी हजेरी ही गावातल्या व्हिडिओ सेंटरलाच जास्त असायची. त्याठिकाणी खूप चित्रपट पाहिले. या चित्रपटांमधील अभिनेत्री या नेहमीच गोऱ्या, नाजूक, सुंदर, वेंधळ्या, घाबरट दाखविल्या गेलेल्या आठवतात; पण माझ्या आजूबाजूची स्थिती मात्र वेगळी होती. मला चित्रपटातील हे पारंपरिक ‘स्टेरिओटाईप’ चित्र खटकायचे, त्यांचा राग यायचा. माझ्या आजूबाजूला अनेक सक्षम, कर्तबगार, नीतीमूल्ये जपणाऱ्या स्त्रिया मी पाहिल्या. त्यामुळे माझ्या चित्रपटांमधून मी माझ्या आजूबाजूची परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतो. लहानपणापासून गोष्ट ऐकायची, सांगायची आवड होती. या क्षेत्राच्या माध्यमातून तीच आवड मी जोपासली आहे.’  

‘चित्रपट हा अनेक कलांचा एक गुच्छ आहे. यामध्ये कथेबरोबरच संगीतदेखील महत्त्वाचे आहे आणि चित्रपटातील संगीत व बाकीचे बारकावे यांसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रपट बनवणे ही एक कला असून, याबरोबरच संकलन, ध्वनीमुद्रण, व्हीएफएक्स, अॅनिमेशन या गोष्टींचा वापर सध्या जगभरात वाढत आहे. आपल्या देशातही आता तो पसरत असून, याद्वारे या माध्यमाची ताकद वाढत आहे. ही सकारात्मक बाब आहे,’ असेही मंजुळे यांनी सांगितले.

‘आपलं जगण हे वेडंवाकडं आहे. आपण शिव्या देतो, दारू पितो; मात्र या गोष्टी आपण चित्रपटात मांडू शकत नाही. या वेळी आपल्याला सेन्सॉरची भीती असते; मात्र आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसारख्या माध्यमातून आपण आपल्याला जे सांगायचे ते सांगू शकत आहोत, ही सकारात्मक बाब आहे. अशा व्यासपीठांमुळे आपल्याकडे अधिक उन्नत सिनेमा तयार होईल, असा माझा विश्वास आहे,’ असेही मंजुळे यांनी नमूद केले.  

‘मर्क्युरी इंडिया’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रवी सुब्रमण्यम यांनी व्यापार कसा वाढवायचा, त्यासाठी काय केले पाहिजे, कसे वागायला हवे या बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search