Next
‘कोल्हापुरात ईएसआय रुग्णालय सुरू झालेच पाहिजे’
प्रेस रिलीज
Saturday, August 05, 2017 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : ‘केंद्र सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी ईएसआय रुग्णालय चालवले जाते. कोल्हापुरातही १९९७मध्ये १० कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकारने ईएसआय रुग्णालयाची इमारत बांधली आहे. हे रुग्णालय सुरू झालेच पाहिजे,’ अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली आहे.

‘या रुग्णालयासाठी १२० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. एक हजार २१० कंपन्यांतील १७ हजार कर्मचाऱ्यांना या रुग्णालयातून मोफत आणि अल्प दरात आरोग्यविषयक सुविधा मिळतील अशी आशा होती; मात्र गेल्या २० वर्षांत कोल्हापुरातील ईएसआय रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. नव्या धोरणानुसार ५० हजार कुटुंबांतील सुमारे अडीच लाख सदस्य या रुग्णालयाचा लाभ घेऊ शकतील. या कामगारांच्या मासिक वेतनातून या सुविधेसाठी काही रकमेची कपात केली जाते; पण गेल्या २० वर्षांत हे रुग्णालय का सुरू होऊ शकले नाही,’ असा थेट सवाल खासदार महाडिक यांनी लोकसभेत उपस्थित केला.

‘रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. यापूर्वीसुद्धा या विषयावर दोन वेळा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च २०१७मध्ये कोल्हापूरला येऊन रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली होती. त्यावेळी मे २०१७पर्यंत रुग्णालय सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राची पूर्तता झाली नसल्याने रुग्णालय सुरू झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. अशा परिस्थितीत हजारो कामगारांच्या आरोग्याशी निगडित असलेले शासनाचे रुग्णालय सुरू करण्यात शासनस्तरावरच अडचणी निर्माण होतात, हे खेदजनक आहे,’ असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.
 
‘आजच्या काळात १०० कोटी रुपये मूल्यांकन असलेले हे रुग्णालय कधी सुरू होणार, याचे नेमके उत्तर मिळावे,’ अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
त्यांच्या या प्रश्नावर कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सविस्तर उत्तर दिले. ‘कोल्हापुरातील ईएसआय रुग्णालय राज्य सरकारच्या अखत्यारीत असून, केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत १०० कोटी खर्च करून नवे ईएसआय रुग्णालय उभारील आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपणासही निमंत्रित करील,’ असे बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे कोल्हापुरातील ईएसआय रुग्णालय सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search