Next
कलाकारांच्या रम्य आठवणी
BOI
Tuesday, January 15, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पं. जितेंद्र अभिषेकी

एक कलाकार म्हणून एखाद्या क्षेत्रात भरारी घेत असताना त्या क्षेत्रातील एखाद्या मोठ्या, नामवंत कलाकारानं आपल्याला ओळखणं, त्यांचा सहवास मिळणं, त्यांच्याकडून चार समजुतीच्या गोष्टी शिकायला मिळणं, त्यांनी आपलं कौतुक करणं या गोष्टी मनाला अत्यंत सुखावणाऱ्या असतात. अशा वेळी धन्य झाल्याची प्रचीती येते... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत कलाकारांच्या भेटीच्या काही रम्य आठवणी...
...................................
पं. जितेंद्र अभिषेकी.
अभिषेकी बुवा संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासू कलाकार, अनेक शिष्य घडवणारे गुरू, संगीत नाटकांचे संगीतकार आणि एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांनाच परिचित होते. काहीसे अबोल, शांत स्वभावाचे. कोणीही पटकन त्यांच्याशी बोलायला जात नसे; पण याउलट परिचितांशी मात्र ते अगदी मनमोकळे असत. त्यांच्या या वेगळ्या स्वभावाची झलक मला अनुभवायला मिळाली होती. त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर, त्यांना भेटणं, नमस्कार करून आशीर्वाद घेणं हे नेहमीच व्हायचं; पण त्यांच्याच घरी, त्यांच्याबरोबर अगदी घरगुती पद्धतीनं त्यांचा जो सहवास लाभला, तो अनुभव कधीच न विसरण्याजोगा.

साधारण १९६८मधली गोष्ट. मी तेव्हा आठवी-नववीत असेन. आमच्या चेंबूरच्या श्रीराम संगीत विद्यालयाची सहल लोणावळ्याला जाणार असं ठरलं. त्यावेळी बुवा बऱ्याच वेळा लोणावळ्याला असत. तिथे त्यांचा बंगला होता. (माझ्या वडिलांची अन् त्यांची जुनी ओळख. मुंबई आकाशवाणीवर वडिलांनी संगीत दिलेल्या संगीतिकेमध्ये बुवा गायले होते. तेव्हा गोव्याहून ते नुकतेच मुंबईत आले होते.) अप्पांनी (माझ्या वडिलांनी) आमच्या सहलीची गोष्ट बुवांच्या कानावर घातली आणि पंधरा-वीस जणांची एक रात्र राहण्याची सोय लोणावळ्यात कुठे होईल का, याची चौकशी केली. त्यावर, ‘येऊ देत त्या सगळ्यांना, मी पाहतो. त्यांना आधी थेट माझ्या घरी येऊ द्या.’ बुवांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांच्या घराजवळच असलेला एक बंगला आमच्यासाठी बुक करून ठेवला.

सकाळी आम्ही सगळे त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. ‘बुवा थोडे अबोल आहेत, जरा शांतपणे वागा,’ अशी कल्पना अप्पांनी आम्हांला दिली होती. आम्ही दबकतच घरात प्रवेश केला. खूपच प्रेमानं त्यांनी आमचं स्वागत केलं. त्यांच्या घरातील प्रशस्त संगीत कक्षामध्ये आम्हांला बसवलं. दोन-चार तंबोरे, संगीतविषयक पुस्तकांनी भरलेली कपाटं, शांत-प्रसन्न वातावरण. आम्ही सगळे संगीताचे विद्यार्थी, म्हणून बुवांनी दोन तंबोरे छान जुळवले. एक समोरच्या कोपऱ्यात ठेवायला सांगितला आणि मला म्हणाले, ‘त्या समोरच्या तंबोऱ्याच्या तारांवर हा दोरा ठेव.’ मी त्याप्रमाणे केलं. त्यांनी त्यांच्या हातातला तंबोरा छेडायला सुरुवात केली. म्हणाले, ‘तुम्ही त्या समोरच्या तंबोऱ्याकडे लक्ष ठेवा.’ थोड्या वेळानं त्या तंबोऱ्याच्या तारांवर ठेवलेला दोरा कंप पावू लागला आणि खाली सरकू लागला. यावर ते म्हणाले, ‘याला रेझोनन्स, म्हणजे सम गती स्पंदन म्हणतात. दोन तंबोरे अतिशय सुरेल, एकसारखे जुळले, की असे एकमेकांशी बोलू लागतात.’ मला आठवतं, आम्ही सर्व विद्यार्थी ही जादू पाहून हरखून गेलो होतो. तंबोऱ्याच्या चार तारा सुरेल जुळल्यावर, जोड छेडला, की खर्ज आपोआप कंप पावतो, हा अनुभव मी घेतला होता; पण दोन तंबोऱ्यांमधला हा संवाद मला नवा होता. त्यानंतर बुवा भातखंड्यांच्या ग्रंथांबद्दल बोलले, पारंपरिक बंदिशी, धृपद-धमार यांच्या महत्त्वाबद्दल बोलले. आम्ही जिवाचे कान करून ऐकत होतो. बुवांनी आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, की आमच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं. त्यानंतर बुवांनी आम्हाला जी गंमत दाखवली, ती त्यांच्या आजवर पाहिलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी उलट होती. बुवांनी त्यांचे घर दाखवत आम्हांला मागच्या दारी नेलं. तिथे एक लांब नळी असलेली छऱ्याची बंदूक होती. ती हाती घेऊन बुवांनी त्यांच्या नेमबाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. आम्ही अगदी चाट पडलो. 

त्या दिवशी बुवांचं अगदी वेगळं रूप पाहायला मिळालं आणि ते मनात कायमचं ठसलं. ते नेहमी म्हणत, 'कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलेत प्रतिबिंबित होतो.' खरंच होतं ते. बुवांच्या शांत, संयमी स्वभावाप्रमाणेच त्यांचं गायन सखोल, परिणामकारक होतं. 

माणिक वर्मा 
माझ्यासमोर गोड गायकीचा आदर्श असलेल्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या गायिका म्हणजे माणिक वर्मा. त्यांचा जोगकंस, श्यामकल्याण, नंद हे माझे आवडते राग. त्यांच्या स्वरांचा घननीळा लडिवाळा..तील गोडवा, ‘कौसल्येचा राम’मधील भक्तिभाव, ‘नाथ हा माझा’च्या तानेचा कणखरपणा, ‘जिवाची शपथ तुला जिवलगा’मधील तरुणपणचा कोवळा आवाज, ‘बहरला पारिजात दारी’मध्ये जाणवणारी आवाजातील विशिष्ट लकब, त्यांची शांत, तेजस्वी हसरी मूर्ती, एक ना अनेक गोष्टींवर माझा जीव. मी शाळेत असताना, माणिकबाईंना जीवघेण्या आजारानं ग्रासलं होतं, तेव्हा मला झालेलं दुःख आणि परमेश्वराजवळ त्यांच्यासाठी मनापासून केलेली प्रार्थना या गोष्टी आजही मला आठवतात.

अशा माणिकबाईंच्या मकरंद सोसायटीतील घरी लहानपणापासून मी अनेक वेळा गेले होते; पण खरं दडपण आलं होतं ते, माझ्या बंदिशींच्या पुस्तकाचं प्रकाशन करायला येण्याचं विचारायला गेले तेव्हा. मी बंदिशी बांधल्या आहेत, हे ऐकल्यावर त्या गोड हसल्या आणि म्हणाल्या, ‘तू याच्यासाठी काय विचार केलास? हिंदी भाषेचा अभ्यास वगैरे केलास का?’ मी म्हटलं, ‘मी जास्तीत जास्त सोपे, अर्थपूर्ण शब्द वापरले. माझं मराठी, संस्कृत, हिंदी साहित्यातलं वाचन भरपूर आहे. त्याशिवाय या वयात तारुण्यसुलभ जे विषय मुलींच्या मनात येतात, तेच वापरले आहेत.’ 

मग मी त्यांना माझ्या बागेश्रीतल्या बंदिशीत वापरलेली मेघदूतातील श्लोकाची कल्पना सांगितली. मेघदूतातील एका श्लोकात नायक म्हणतो, ‘हे प्रिये, मला तुझ्या आठवणीनं रात्र रात्र झोप येत नाही, त्यामुळे मी तुला स्वप्नात पाहू शकत नाही. जेव्हा जेव्हा मी तुझ्या चित्राकडे (फोटोकडे) पाहतो, तेव्हा माझे डोळे भरून येतात आणि त्यामुळे मी तुला पाहू शकत नाही.’  ही कल्पना मी माझ्या बागेश्रीतल्या बंदिशीत वापरली.

'बंदीश' या पुस्तकाचे प्रकाशन करताना माणिक वर्माबैरन लागे नैना मोहे, नही देत पिया के दरसन सुख। नींद न आये कैसे देखूं सपनेमें, आंसू भर आये, तो देखू कैसी मूरत मैं।।’  ही बंदीश माणिकबाईंना खूप आवडली. म्हणाल्या, ‘बागेश्रीच्या सुरांना तुझ्या या शब्दांनी खरोखरच छान न्याय दिलाय.’ मग त्यांनी आणखी काही बंदिशी ऐकण्याची उत्सुकता दाखवली. विषयातील नावीन्य, स्वररचनेच्या दृष्टीनं उत्तम आडाचौताल, एकताल, रूपक असं तालाची विविधता अशा कारणांमुळे माझ्या बंदिशी आवडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या अभिप्रायानं मी हरखून गेले. त्याशिवाय त्यांनी माझ्या सासरच्या मंडळींविषयी जाणून घेतलं. निघताना स्वत:च्या हातानं कुंकू लावलं, जवळ घेऊन आशीर्वाद दिला. मी भरून पावले. कबूल केल्याप्रमाणे बोरिवलीला येऊन, त्यांनी बंदीश नावाच्या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ‘एवढ्या लहान वयात, (पंचविशीत) बंदिशी बांधणारी ही बहुतेक पहिलीच स्त्री कलाकार असेल,’ अशा शब्दांत माझं कौतुक केलं. हे कौतुक मला आयुष्यभर प्रेरणादायी ठरलं. या समारंभात माझे वडील पं. ए. पी. नारायणगावकर, काका पं. गोविंदराव पटवर्धन आणि ‘एचएमव्ही’चे जी. एन. जोशी हेही मला आशीर्वाद द्यायला आले होते.

जी. एन. जोशी यांच्या निधनानंतर, दादरच्या सानेगुरुजी विद्यामंदिरात शोकसभा होती. माणिकबाईंना त्या वेळी अंजायनाचा त्रास अधून-मधून होत होता. त्यामुळे माणिकबाईंना तिथं घेऊन जाणं आणि पुन्हा घरी पोहोचवणं ही जबाबदारी माझ्यावर होती. मी त्यांना घरी घ्यायला गेले, तेव्हा वेळेपूर्वीच त्या आवरून तयार होत्या. भारतीनं त्यांच्या काळजीपोटी मला सांगितलं, ‘आईला फार वेळ तिथं बसू देऊ नकोस, लवकर घरी आण.’ 

तिथे गेल्यावर माणिकबाई स्वत:ची तब्येत वगैरे विसरून छान बोलल्या, इतरांची भाषणं ऐकत बसल्या. मी विचारलं तर, ‘असं मधूनच निघणं बरं दिसणार नाही गं,’ असं म्हणून शेवटपर्यंत थांबल्या. नंतर सुखरूपपणे त्यांना घरी सोडल्यावर, केवढा मोठा अनमोल ठेवा इतका वेळ आपल्या ताब्यात होता, असं मला वाटलं. अशी थोर कलाकार व्यक्ती आपल्याला ओळखते, आपल्यावर प्रेम करते, कौतुक करते ही भावनाच फार सुखावणारी असते. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही इतकं साधेपणानं राहणं, इतरांशी सहज संवाद साधणं यामुळे मला माणिकबाईंबद्दल नेहमीच आदर वाटत होता. ऐन दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी त्या गेल्या तेव्हा पोरकेपणाची भावना मनांत दाटून आली.

लाविते मी निरांजन, तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली, आज धनत्रयोदशी। हे गीत ऐकताना, आजही त्यांच्या आठवणींनी डोळे भरून येतात. अशा व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच सतत जाणवत राहतं.
- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Megha nibandhe About 217 Days ago
Sunder lekh.tu kharech bhagyavan ahes.ashya mothya vyaktincha sahavas tula milala. Gr8
1
0

Select Language
Share Link
 
Search