Next
‘आजच्या काळात ‘रावण’ समजून घेणे आवश्यक’
नागराज मंजुळे यांचे मत
BOI
Monday, October 01, 2018 | 02:33 PM
15 0 0
Share this story

शरद तांदळे लिखित ‘रावण : राजा राक्षसांचा’ या कादंबरीचे प्रकाशन करताना (डावीकडून) दत्ता खाडे, शोभा तांदळे, नागराज मंजुळे, ज्ञानेश महाराव, शरद तांदळे, प्रवीण गायकवाड, रणजीतसिंह मोहिते पाटील, अभिनंदन थोरात.

पुणे : ‘रावणाला आपण नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत पाहत असल्याने, तो धूसर होत चालला आहे. त्याला कितीही गाडायचा प्रयत्न केला तरीही गाडू शकत नाही. रावण दहा डोक्यानी विचार करणारा बुद्धिमान योद्धा होता. आज आपल्याला एका बाजूनेच विचार करण्याची सवय लागली आहे. घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आजच्या काळात आपण रावणाची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे’, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

न्यू ईरा पब्लिशिंग हाउस प्रकाशित उद्योजक शरद तांदळे यांच्या ‘रावण : राजा राक्षसांचा’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात नागराज मंजुळे बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या सोहळ्यावेळी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, उद्योजक प्रवीण गायकवाड, चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात, शोभा तांदळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांनी त्याकाळी वेगळ्या पद्धतीचे लिखाण केले. आपल्याला देखील अशा पद्धतीने वेगळा विचार स्वच्छपणे मांडता आला पाहिजे. खलनायकालाही वेगळ्या कोनातून बघण्याची दृष्टी शरद तांदळे यांनी या पुस्तकातून दिली आहे. विरोधी विचार समजून घेण्याची क्षमता अशा लिखाणामुळे विकसित होण्यास मदत होईल.’

प्रवीण गायकवाड म्हणाले, ‘रामराज्याच्या काळात रावण हा विषय घेऊन पुस्तक लिहिण्याचे धाडस करणे ही कौतुकाची गोष्ट आहे. माणूस वाईट नसतो, काळ-वेळ परिस्थिती त्याला घडवत असते. रावण आता खलनायकाचा नायक झाला आहे. राम जन्माला आला तरी रावण डोकावणारच आहे.’

ज्ञानेश महाराव म्हणाले, ‘तुम्ही सत्यनिष्ठ असाल, तर असत्य शोधले पाहिजे. सत्य दडवता येते; पण संपवता येत नाही. प्रतिक्रिया येतच राहणार, परंतु आपण क्रियावादी असले पाहिजे. फसणारे व फसवणारे अशा दोनच जाती आहेत. त्यामुळे आजच्या काळात रावण सांगायला हवा. पुस्तके ही मस्तक तयार करण्यासाठी असतात.’

शरद तांदळे म्हणाले, ‘रावणाविषयी वाचन केले आणि त्याविषयी लिहीत गेलो. या पुस्तकासाठी मी चार वर्षे अभ्यास केला. रावणाला नेहमी खलनायक ठरवले जाते. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि लिहिते व्हायला पाहिजे.’

अभिनंदन थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल गायकवाड यांनी आभार मानले. 

(नागराज मंजुळे यांनी या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(‘रावण : राजा राक्षसांचा’ या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link