
मुंबई : मुंबईतील प्रीतगंध फाउंडेशन या साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय बहुभाषक कविसंमेलनाचे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात नुकतेच करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जादूगार अभिजित, समाजसेविका अलकाताई नाईक, जीन फर्नांडिस, ‘प्रीतगंध’चे अध्यक्ष संतोष महाडीश्वर, उपाध्यक्ष संतोष तावडे, सचिव शीतल मालुसरे, खजिनदार शिवानी महाडीश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जीन फर्नांडिस (दिव्यांग पुरस्कार), श्रावस्ती कांबळे (विशेष कला पुरस्कार), संदेश भोईर (बोलीभाषा पुरस्कार), अभिजित (विशेष कला पुरस्कार), डॉ. अलका नाईक (प्रीतगंध फाउंडेशन सल्लागार), अशोक कांबळे (सामाजिक कार्य), चंद्रकांत धोंडे (मराठी भाषा, सामाजिक कार्य), डॉ. अनुपमा जाधव (साहित्यिक पुरस्कार), अनुराधा धामोडे (सामाजिक), रवींद्र कनोजे (सामाजिक पुरस्कार), भगवान विशे (विशेष कला पुरस्कार) अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना गौरविण्यात आले.

कविसंमेलनात विविध ठिकाणाहून आलेल्या ६० कवींनी विविध विषयांवरील स्वरचित दर्जेदार कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल मालुसरे यांनी केले. या कार्यक्रमाला लेखक, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त सहभागी कवींना प्रीतगंध फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
‘आपल्या मायबोलीत जास्तीत जास्त लिहिले पाहिजे. बोली टिकली, तरच आपण टिकू. आज महाराष्ट्रात फक्त ३८ बोलीभाषा प्रचलित असून, त्यातील बऱ्याच बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत,’ अशी खंत या वेळी कवी संदेश भोईर यांनी व्यक्त केली. जादूगार अभिजित यांनी जादूचे प्रयोग दाखवले.