Next
कविता जगणाऱ्या कवयित्रीची ‘काव्यत्रयी’
BOI
Saturday, November 17, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूरच्या वैष्णवी अंदूरकर यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या कविता ‘प्रिय तुझ्यासाठी’, ‘असंही तसंही’ आणि ‘टपटपणं’ या तीन संग्रहांतून ‘काव्यत्रयी’च्या रूपात प्रकाशित केल्या आहेत. या ‘काव्यत्रयी’चा हा परिचय...
.......
‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे म्हणतात. वैष्णवी अंदूरकर या कोल्हापूरच्या कवयित्रीने आपल्या ‘काव्यत्रयी’ या तीन काव्यसंग्रहांच्या संचाद्वारे ही उक्ती सार्थ करून दाखवली आहे. ‘प्रिय तुझ्यासाठी’, ‘असंही तसंही’ आणि ‘टपटपणं’ या तीन काव्यसंग्रहांतील त्यांच्या कवितांमधून मानवी मनाचे तरल भावाविष्कार त्यांनी अत्यंत उत्कटपणे व्यक्त केले आहेत. 

‘प्रिय तुझ्यासाठी’ या काव्यसंग्रहात प्रेमाची विविध रूपे, प्रेमी जीवांच्या व्यथा, वेदना, मानवी मनाचे अनेक कंगोरे अगदी साध्या-सोप्या शब्दांत समोर येतात. प्रत्येक कविता वाचताना स्वतःला तिच्याशी जोडता येते. हळव्या, स्वप्नील भावभावनांसह कोरड्या भावनांचे सलही या कवितांमधून हलकेच व्यक्त होतात. हळुवारपणा, तरलता, संवेदनशीलता यांसह शब्दांची उत्तम गुंफण हे या कवितांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या कवितासंग्रहात आपण अगदी सहजपणे गुंतून जातो. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वतः उत्तम कवयित्री असलेल्या, शेरोशायरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनीही वैष्णवी अंदूरकर यांच्या कवितांचे कौतुक केले आहे. ‘अंतर्मनातील हळव्या भावना शब्दबद्ध करणाऱ्या या कविता काळजाचा ठाव घेतात,’ असे त्यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ लेखक आणि परराष्ट्र व्यवहार सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनीही वैष्णवी अंदूरकर यांच्या ‘प्रिय तुझ्यासाठी’ या संग्रहातील कवितांना ‘एका प्रेयसीच्या शब्दातून उलगडत जाणारी काव्यमय प्रेमकहाणी,’ असे संबोधले आहे. ‘नात्यांच्या सर्व छटा या कवितांमधून साकारल्या गेल्या आहेत, हे फार मोठे यश आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि लेखक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘या कविता म्हणजे प्रेमाच्या संन्यस्तपणात संपलेल्या उत्कट प्रवासाची काव्यमय कहाणीच आहे,’ असे म्हटले आहे. 

यातील दुसरा कवितासंग्रह आहे ‘टपटपणं.’ यामध्ये निसर्ग आणि मानवाचे नाते, तसेच मानवी भावसंबंधांचे विश्वही अगदी समृद्धपणे शब्दबद्ध केले आहे. कटू अनुभवांनी कोसळून न जाता स्वतःला सावरून पुढे जाण्याची दिशा या कविता देतात. ‘नसतातच किनारे काही नात्यांना,’ असे सांगताना ‘समोरचा स्वीकार नकाराच्या सीमारेषेवर असेल, तर थांबावे थोडा वेळ, आता आला तर आपलाच राहतो, नाही आला, तर आपला नसतोच,’ असा खंबीर होण्यासाठी पाठबळ देणारा सल्लाही यातून त्या देतात. अशा छोट्या छोट्या शब्दांतून मोठा आशय मांडणाऱ्या त्यांच्या कविता सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. 

‘निःशब्दाला शब्द देणे आणि अमूर्ताचे रूप मूर्त रूपात साकारणे हे अस्सल कवितेचे मर्म आहे. मनाच्या अंगणात टपटपणाऱ्या फुलांची पखरण आनंददायी असते, तशी देठापासून विलगण्याची कळही जीवघेणी ठरते,’ अशा शब्दांत कवी अशोक बागवे यांनी या कवितांची प्रशंसा केली आहे. 

‘एखाद्या वेलीला वृक्ष प्रेमाने कवटाळून घेतो, मी तुझाच म्हणून वाकून खाली तिला हळूच फुलवत नेतो, वेलीला मात्र वाटते हा माझ्याच आधारावर जगतो,’ अशा सहज-सोप्या शब्दांमधून वैष्णवी यांनी मानवी नात्यांचे वास्तवही पुढे आणले आहे. ‘नेहमी दूर जाण्याच्या अभिनिवेशातच राहतात काही नाती, खरं तर ते गरजेचं नसतं,’ अशा शब्दांमधून अगदी सहजपणे त्या आपल्या प्रत्येकाच्या भावना, नात्यांची गुंतागुंत स्पष्ट करतात. आपणही तेच अनुभवत असलो, त्यांनी ते नेमक्या शब्दांत मांडले आहे. म्हणूनच वैष्णवी अंदूरकर यांचा ‘टपटपणं’ हा कवितासंग्रहही हृदयाला स्पर्श करून जातो. 

त्यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे ‘असंही तसंही.’ यात मानवी जीवनातील भावनिक गुंतवणूकीचे अनेक पैलू शब्दबद्ध केले आहेत. रोजच्या जगण्यात येणारे अनुभव, भेटणारी माणसे, जगण्यातले चढउतार असे वेगवेगळे विषय यातील कवितांमधून समोर येतात. ‘मळलेल्या वाटांवरून जायचं नाही, असं ठरवलं, की सवय करून घ्यावी लागते टोचणाऱ्या काट्यांची, दगडांची, चिखलाचीही,’ या पहिल्याच कवितेत त्या आयुष्यातील वास्तव स्पष्ट करतात. ‘दोन्ही टोके वळली, तर त्याची गाठ पडते,’ अशा छोट्याशा ओळीतून त्या नात्याचे महत्त्व स्पष्ट करतात. घरासमोरचा जुना वड, तुटलेली फांदी, शाकारणे, झाड, शिंपला, अडकलेला प्रवाह आदी कवितांमधून त्या निसर्गाची विविध रूपे, प्रतीके यांचे मानवी आयुष्याशी नाते जोडतात. संदेश देतात.

काल्पनिक आभासी विश्वापेक्षा अस्वस्थ भावनांचे हेलकावे या कवितांमधून त्यांनी समर्थपणे कागदावर उतरवले आहेत. त्यामुळेच या कविता प्रत्येक क्षणी आपल्या रोजच्या जगण्याशी, अनुभवाशी जोडता येतात. त्यातून काहीतरी संदेश मिळतो. त्यामुळे या कविता बहुमुल्य आहेत. जगण्याला अर्थ देणाऱ्या सार्थ कविता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकूणच, ही ‘काव्यत्रयी’ संग्रही ठेवण्याजोगी आहे, यात शंका नाही. 

पुस्तक : काव्यत्रयी
प्रकाशक : लाटकर प्रकाशन
पृष्ठे : ५००
मूल्य : ४५० रुपये

(‘काव्यत्रयी’ हा तीन काव्यसंग्रहांचा संच ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search