Next
‘पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून वृक्षारोपण व्हावे’
प्रेस रिलीज
Tuesday, May 15 | 12:50 PM
15 0 0
Share this story

सुकृत पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी डावीकडून श्रीनिवास सुंचूवार, विष्णू लाम्बा, पराग ठाकूर व विजयकुमार मर्लेचा.

पुणे : ‘वयाच्या सातव्या वर्षी आईच्या मदतीने पहिले रोप लावले. लहानपणी झाडे चोरून आणायचो. मग मागून घेऊ लागलो. आज माझ्या हातून लाखो झाडे लावली गेली आहेत; परंतु यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा  असून, भावी पिढी हरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावे,’ असे प्रतिपादन जयपूर (राजस्थान) येथील ‘ट्री मॅन’ विष्णू लांबा यांनी केले.

वंचित विकास संस्थेतर्फे दरवर्षी हिंसा आणि गुन्हेगारीच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस दिला जाणारा शुभदा-सारस्वत पुरस्कृत सुकृत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वृक्षचोर ते वृक्षवल्ली (ट्री मॅन) असा प्रवास करणाऱ्या विष्णू लांबा आणि विदर्भ-मराठवाड्यातील कैद्यांना तुरुंगात जाऊन मनपरिवर्तन करणाऱ्या श्रीनिवास सुंचूवार यांना यंदाचा सुकृत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नव्या पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर, ‘वंचित विकास’चे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, देवयानी गोंगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लांबा म्हणाले, ‘वृक्षचोराचा ‘ट्री मॅन’ होईल, असे वाटले नव्हते. कल्पतरू संस्थानच्या माध्यमातून वृक्षलागवड केली. पर्यावरणीय विवाह करून लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनांची नाही, तर साधनेची गरज असते. आजच्या पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना दिशा देण्यासाठी समाजातील ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा.’ लोकमान्यांच्या पुण्यात पुणेरी पगडी देऊन माझा सन्मान केल्याबद्दल आनंद वाटत असल्याचेही लांबा म्हणाले.

सुंचूवार म्हणाले, ‘कैद्यांच्या मनातील गुन्हेगारी विचार घालविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक कारागृहांमध्ये जाऊन कैदी बांधवांसाठी निबंध स्पर्धा व कवी संमेलन घेतली. त्यातील सर्वोत्कृष्ट निबंध प्रकाशित केले. कैदी बांधवांचे मनपरिवर्तन करून त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’

पराग ठाकूर म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीतील मूल्ये हरवत चालली आहेत. एकीकडे आपण रामायण-महाभारतातील गोष्टी सांगतो; मात्र दुसरीकडे अनाथ आश्रम, तुरुंगाची संख्या वाढते हे चांगले नाही. एखादा गुन्हा अनावधानाने घडतो; मात्र त्यातून चांगल्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असावे. धरणीमातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन व्हायला हवे.’

विलास चाफेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मीना कुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. सरोज टोळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता जोगळेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link