Next
‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मध्ये रंगणार लक्ष्मीचा विवाहसोहळा!
प्रेस रिलीज
Monday, June 11 | 01:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘कलर्स मराठी’वरील नुकतीच सुरू झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ ही मालिका सध्या लोकप्रिय होत आहे. गावात वाढलेली अवखळ, लाघवी, प्रेमळ लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेमध्ये ओमप्रकाश शिंदे (मल्हार) आणि सुरभी हांडे (आर्वी) मुख्य भूमिकेत असून, त्यांना ही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता मालिकेमध्ये लक्ष्मीच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे. हे विशेष भाग ११ ते १६ जून या कालावधीत सायंकाळी सात वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रसारित केले जाणार आहेत.

शुभ पावलांनी गावात येऊन सगळ्यांचीच लाडकी बनलेल्या या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी गावामध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असलेल्या स्वप्नातला राजकुमार आता खरोखरच तिच्या आयुष्यात येणार आहे. आपले आयुष्य आता हा राजकुमार प्रेमाने बहरुन टाकणार अशा स्वप्नांमध्ये लक्ष्मी आहे आणि मोठ्या आनंदाने लग्नाची तयारी करत आहे. लक्ष्मीच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळणार का, तीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का, यामध्ये मामी आणि श्रीकांत कुठली नवी खेळी रचणार, हे सगळे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा. आपल्याला आधार देणारी, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी अशी इच्छा लक्ष्मीची देखील आहे. लक्ष्मीच्या हाताला आता लवकरच मेहेंदी लागणार आहे. मंडप सजणार आहे. लक्ष्मीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे मल्हारचा फोटो पाहिला आहे आणि ते एकमेकांशी फोनवर बोलले देखील आहेत; परंतु या दोघांची भेट होणे, मात्र राहून गेले आणि त्याला कारण म्हणजे मामीची कारस्थाने. मल्हारला मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नसून या सगळ्या गोष्टींशी तो अनभिज्ञ आहे.

दुसरीकडे मामी आणि श्रीकांतचा काही वेगळाच हेतू आहे. श्रीकांतला पहिल्यापासूनच लक्ष्मीशी लग्न करण्याची इच्छा आहे, तर गावामधील अविनाश जे राजकारणामध्ये आहेत त्यांना स्वत:च्या मुलाचे लग्न लक्ष्मीशी करून द्यायचे आहे. या सगळ्या परिस्थितीशी अनभिज्ञ, अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, स्वच्छंदी लक्ष्मी जी आयुष्यभर ओंजळीत निखारे आणि ओठी हसू घेऊन वावरली तिच्या नशिबी मल्हार खरोखर सुखाची चाहूल घेऊन येईल का, तिचे लग्न कोणाशी होईल मल्हार, श्रीकांत की अविनाशचा मुलगा, या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना याच आठवड्यामध्ये मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link