Next
विश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास
डोळ्यांत आनंदाश्रू आणि अंगावर रोमांच उभे करणारे अद्भुत कार्य पुस्तकरूपात
BOI
Sunday, March 24, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन ‘शांततेचा संदेश’ द्यावा, असे पुण्यातील उदय जगताप या तरुणाला प्रकर्षाने वाटते. आपले सहकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि दृढनिश्चयाच्या बळावर तो या स्तुत्य, अनुकरणीय उपक्रमात यशस्वी होतो. तो एक विश्वविक्रम ठरतो. गेल्या वर्षी झालेल्या या विक्रमाची कहाणी ‘विश्वविक्रमी गडचिरोली’ या पुस्तकाच्या रूपाने नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर  ‘किमया’ सदरात लिहीत आहेत या अद्भुत विक्रमाबद्दल...
...........
पृथ्वीतलावरील मनुष्यप्राणी अचाट आणि अफाट कार्यक्षमतेचा आहे. कुतूहल, साहस, नवे शोध लावणे यांसाठी तो काहीही करू शकतो. समुद्राच्या तळाशी जातो, उंच पर्वतशिखरे पादाक्रांत करतो. चंद्र-मंगळाकडे झेप घेतो, प्राण्यांच्या अभ्यासासाठी एकटाच जंगलात जाऊन राहतो, लोखंडाचे सोने करू बघतो, एखाद्या विषयावर संशोधन करण्यासाठी आपले सगळे आयुष्य वेचतो आणि जगावर उपकार करणारा शोध लावतो. विनोबाजी डाकूंच्या हृदयपरिवर्तनासाठी चंबळमध्ये जातात; डॉ. प्रकाश आमटे भामरागडसारख्या प्रतिकूल आदिवासी विभागात जाऊन सेवा करतात; कोलंबस धोकादायक समुद्रप्रवास करून अमेरिकेचा शोध लावतो; डॉक्टर स्वत:वर प्रयोग करून रोगप्रतिबंधक लस तयार करतात - अशा शेकडो प्रेरणादायी गोष्टी आहेत.

एक वर्षापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोलीत एक अशीच अपूर्व घटना घडली, त्यामुळे जगाच्या इतिहासात त्या जिल्ह्याचे नाव कोरले गेले आणि त्या विश्वविक्रमाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद झाली. काय होती ती घटना?माओवादी, नक्षलवादी लोकांच्या हिंसक कारवाया आपण वाचतो-बघतो. साम्यवाद जगातून आणि भारतामधून जवळजवळ लुप्त झाला आहे. तरी डावे-उजवे नेते कार्यरत आहेतच. नक्षलवादी लोकांना प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथून टाकून, देश ताब्यात घ्यायचा आहे. परंतु त्यांचे कोणते प्रभावी आर्थिक, राजकीय तत्त्वज्ञान आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. छत्तीसगड-गडचिरोलीत पोलिस आणि बंडखोरांमध्ये सतत चकमकी होतात. निरपराध लोक हकनाक मृत्युमुखी पडतात. पुन्हा पुन्हा तेच घडत राहते. अशा स्फोटक, धोकादायक भागात जाऊन ‘शांततेचा संदेश’ द्यावा, असे एका तरुणाला प्रकर्षाने वाटते. आपले सहकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो या स्तुत्य, अनुकरणीय उपक्रमात यशस्वी होतो. तत्पूर्वी धमकीचे अनेक फोन येत राहतात; पण दृढनिश्चयाच्या बळावर तो कार्यक्रम पार पडतो. सर्व जगात त्याचे पडसाद उमटतात; इतकेच नव्हे, तर तो एक विश्वविक्रम ठरतो.

उदय जगतापकल्पनेचे बीज प्रथम मनात रुजते. नंतर त्यावर विचार, त्याचा उच्चार (चर्चा) आणि प्रत्यक्ष कृती हा क्रम असतो. उदय जगताप नावाच्या पुण्यातील एका तरुणाला ९०० किलोमीटर दूर असलेल्या गडचिरोलीत जाऊन सामाजिक सलोख्याचे काम करावे, असे स्वप्न पडते आणि अनंत, अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत ते प्रत्यक्षात कसे साकारले जाते, याचे जिवंत चित्रण पत्रकार/लेखक पराग पोतदार यांनी ‘विश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास’ या पुस्तकात केले आहे. नुकतेच त्याचे प्रकाशन, वर्षपूर्तीचे निमित्त साधून पुण्यातच झाले. अशा आदर्शभूत उपक्रमांमधून शेकडो जणांना नव्या कार्याची प्रेरणा आणि उमेद मिळत असते.

उदय जगताप हे एक विनम्र, पण धडाडीचे व्यक्तिमत्त्व! लोकेष्णा - प्रसिद्धीची हाव - नाही. सतत काम करण्यावर भर! ‘आदर्श मित्र मंडळ’ या संस्थेमार्फत २० वर्षे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कामे चालू आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक विधायक उपक्रम लक्ष वेधून घेतात. त्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांची फळी उभी राहिलेली आहे. पुण्यातील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून, पोलिसांच्या सहकार्याने ‘गुन्हेगार दत्तक योजना’ यशस्वीपणे चालू आहे. गडचिरोलीत अनेक कार्यकर्त्यांसह जाऊन एखादा विश्वविक्रम स्थापित करणे, ही कष्टप्रद, धोक्याची कामगिरी होती; प्रचंड खर्च होता. मग उदयने देणग्या गोळा न करता स्वत:चे घरच विकले! ‘वेडात मराठे वीर दौडले’ या गाण्याची इथे आठवण येते. अखंड चार वर्षे परिश्रम करून, स्थानिक गरीब, वंचित, पाड्या-वस्त्यांवरील सात हजार लोकांच्या द्वारे तो ‘विक्रम’ त्याने घडवून आणला. तिथल्या सामाजिक संस्थांची मदतही मिळाली. जिथे पोलिसही सुरक्षित नाहीत, अशा ठिकाणी हजारो लोकांना एकत्र जमवले. पोलिस अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील २७१ शाळांमधील मुलांशी संपर्क साधला. तीन मार्च २०१८ या दिवशी तो डोळ्यांचे पारणे फेडणारा, आणि हृदय उचंबळून टाकणारा ‘न भूतो...’ सोहळा पार पडला.  हिंसाग्रस्त गडचिरोलीला नवा चेहरा द्यावा, जगाच्या नकाशावर त्या जिल्ह्याचे नाव ठळकपणे दिसावे, या विचाराने उदय झपाटून गेला होता. अडचणी-आव्हाने-संकटे कितीही येवोत! एखादा विश्वविक्रम तिथे घडला, तर जगाचे लक्ष नक्कीच तिकडे वेधले जाईल. काय करावे त्यासाठी? तुर्कस्तानमध्ये पुस्तकवाचनासंबंधी एक विश्वविक्रम झाला होता. त्याच प्रकारे, गडचिरोलीत जर जिल्ह्यातील लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन महात्मा गांधीजींच्या विचारांचे-अहिंसेचा संदेश देणारे - वाचन केले तर त्यातून समाजात एक मोठा विधायक विचार जाऊ शकतो. त्या विक्रमाची नोंदही घेतली जाईल. उदयने त्या वेळचे एसपी. डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही लगेच संमती दर्शवली. सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. हे काम सोपे नव्हते. परंतु अशक्यही नव्हते. कार्यक्रमाचे स्वरूप तर ठरले. तिथल्या लोकांना हिंसा नव्हे. तर शांतताच हवी होती; पण त्यांच्या मनात भीती/दहशत होती. नक्षलवादी नेत्यांनासुद्धा, त्यांचा हिंसेचा मार्ग चुकीचा असून, शांतता हाच विकास व समृद्धीवरचा उपाय आहे, हे समजणे आवश्यक होते. मोठ्या आत्मविश्वासाने उदय आपल्या सहकाऱ्यांसह वेगाने कामाला लागला.‘गिनीज बुक’मध्ये विश्वविक्रमाची नोंद होण्यासाठी काय काय आवश्यकता आहेत, याची माहिती घेऊन झाली. त्यासाठी सुमारे १५० निकष होते. एकूण खर्च १८ लाख रुपयांच्या वर जाणार होता. इतर आव्हानेही भरपूर होती. गडचिरोलीत माणसे जमणे आणि कार्यक्रम करणे, ही सर्वांत मोठी परीक्षा होती. सर्व गोष्टींचा सूक्ष्म विचार आवश्यक होता. आधी लिहिल्याप्रमाणे फ्लॅट विकून पैशांची उभारणी तर झाली. ‘गिनीज’कडे अर्ज करण्यात आला. त्यांच्याकडून मान्यता आली. ‘आदर्श मित्र मंडळ’ आणि ‘गडचिरोली पोलिस आयुक्तालय’ यांच्या नावाने विक्रम नोंदला जाणार होता. ‘गिनीज’चा प्रतिनिधी ‘जिवाच्या भीती’मुळे हजर राहणार नव्हता. सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रण करण्याचे ठरले. तीन मार्च २०१८ हा दिवस पक्का झाला. मैदान निश्चित झाले. पाच हजारांच्या वर उपस्थिती असेल, तर एक खास ऑडिटर नेमावा लागतो, तेही काम झाले. सहा प्रवेशद्वारे असणार होती. एकूण २२ कॅमेरे चित्रण करणार होते. राजकीय व्यक्तीला तिथे प्रवेश असणार नव्हता.

नक्षलवादी भागातून मुले आणि माणसे कशी आणायची, याचे नियोजन पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले. त्यासाठी तब्बल २७३ शाळांना भेटी देण्यात आल्या. अनुकूल प्रतिसाद मिळू लागला. याद्या तयार होऊ लागल्या. त्याची माहिती ‘गिनीज’कडे रवाना होत होती. नेमकी तीन तारखेलाच दहावीची परीक्षा आली. त्यामुळे दहावी-बारावीची मुले येण्याची शक्यता नव्हती. सात हजार लोक एकत्र आणणे, हे फारच मोठे आव्हान होते. दिवस बदलता येणार नव्हता. कार्यक्रम यशस्वी झालाच पाहिजे, असा निर्धार होता. अकरावीच्या मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिस सोबत असतील, तर स्वयंसेवी संघटना सहभागी व्हायला तयार नव्हत्या; कारण नक्षलवाद्यांचा रोष त्यांना पत्करायचा नव्हता. परंतु, उदय जगतापने पोलिसांची साथ सोडायची नाही, हे पक्के ठरवले होते.

सात हजार खुर्च्या लावून झाल्या. बंडखोरांची भीती होतीच. त्यांच्याकडून पोलिसांच्या गाड्या उडवणे, कार्यक्रम उधळणे, लोकांना येण्यास मज्जाव करणे असे प्रकार होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व नियोजन गुप्तपणे करावे लागत होते. त्या कामात ‘व्हॉट्सअॅप’चे गट खूप उपयोगी पडले, हे विशेष! मुख्य दिवशी पोलिसांनी सगळे रस्ते मोकळे केले. हजारो पोलिसांचा जागोजाग बंदोबस्त होता. पहाटे साडेचार वाजल्यापासून मुलांना आणि लोकांना गावागावांतून आणायचे होते. पोलिस डोळ्यांत तेल घालून दक्ष होते. आपल्या गाड्यांमधून लोकांना घेऊन ते समारंभस्थळी निघाले. बाहेर सगळीकडे अंधार होता. सगळे नियम, निकष काटेकोरपणे पाळले जात होते. त्याची खातरजमा करण्यासाठी वकील आणि ऑडिटर सज्ज होते. सर्वांना ओळखपत्रे देण्यात आली. मैदानात बैठकींवर जाण्यापूर्वी सर्व उपस्थितांना नाश्ता-पाणी देण्यात आले. लोकांची संख्या अचूक नोंदली जाणार होती. पूर्वीचा विक्रम मोडण्यासाठी ते आवश्यक होते.

सकाळी सात वाजता अंतिम आढावा घेण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याला विशिष्ट जबाबदारी दिलेली होती. अनपेक्षित अडचणी येतच होत्या. त्यातून मार्ग काढले जात होते. सर्व जण प्रचंड ताणाखाली होते. दिवसाचे तपमान ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे कार्यक्रम वेळेत पार पाडणे गरजेचे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार होते. त्यांना निकषानुसार आत प्रवेश नव्हता. सात हजार मुले/माणसे जमली. जगाला अहिंसेचा संदेश देण्यासाठी सर्व व्यवस्थापन पोलिसांमुळे शिस्तबद्ध झाले.

व्यासपीठावर गांधीजींचा संदेश देण्यासाठी उदय जगताप उभा राहिला. समोर सात हजार लोकांचा समुदाय उपस्थित होता. त्या क्षणांची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणार होती. गांधीजी आणि सर्व धर्मांमधील साधुपुरुषांच्या विचारांचे उदयने सलग २२ मिनिटे वाचन केले. सर्व जण ते शांतपणे ऐकत होते. कॅमेरे त्याची संपूर्ण नोंद घेत होते. पोलिसांच्या वतीने महेश्वर रेड्डी (चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक) यांनी लोकशाहीची भूमिका स्पष्ट केली. सामूहिक वाचनाच्या विश्वविक्रमाची नोंद आता जगाच्या नकाशावर होणार होती. सर्वांना अतीव समाधान होत होते. पोलिसांनाही एक जबाबदारी पूर्ण झाल्याचा आनंद झाला. कार्यक्रम झाल्यावर सर्वांना जेवण देऊन त्यांच्या गावागावांत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. सुदैवाने कुठलीही हिंसक, अनुचित, गालबोट लागणारी घटना घडली नाही.

‘गिनीज’समोर हा विक्रम पुराव्यांनी सिद्ध करून दाखवायचा होता. एका कॅमेऱ्यात २२ मिनिटे ‘अनकट’ रेकॉर्डिंग झाले होते. ते उपयोगी पडणार होते. उपस्थितांचा अंतिम आकडा ६७८६ होता. त्याचीच विश्वविक्रमात नोंद झाली. सर्व पुरावे ग्राह्य धरण्यात आले. चार वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. गडचिरोलीवर विश्वविक्रमाची मोहोर उमटली. तिथल्या तरुणांमध्ये अभिमान जागृत झाला. नवा आशावाद निर्माण झाला. आदर्श मित्र मंडळाचे नाव जगाच्या नकाशावर गेले. त्या गणेश मंडळालाही एक नवी ओळख मिळाली. पोलिसांची प्रतिमाही अधिक उंचावली. तिथल्या नागरिकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. गडचिरोली आता अहिंसेचा संदेश देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

स्वत: उदय जगताप याला प्रसिद्धीचा हव्यास कधीच नव्हता. एक अलौकिक कार्य केल्याचा आत्मिक आनंद त्याच्यासाठी पुरेसा होता. जग जाणीवपूर्वक त्याची दखल घेतच असते. एका अद्वितीय विश्वविक्रमाची कहाणी इथे अगदी थोडक्यात मांडलेली आहे. त्याचे संपूर्ण नाट्य अनुभवण्यासाठी मूळ पुस्तक वाचणे आवश्यक आहे. पराग पोतदार यांनी त्या साऱ्या घटनेच्या शब्दांकनाचे काम उत्कृष्ट केले आहे. त्यांच्यासारखा अनुभवी पत्रकारच त्यासाठी योग्य होता. त्यांचे आणि उदय जगताप यांचे हार्दिक अभिनंदन!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye. About 91 Days ago
Maharashtra Tourism Authorities should make this book easily available , at affordable price .
0
0
Bal Gramopadhye About 91 Days ago
The book would help. For tourists , it isa must .
0
0
Arvind Kale About 93 Days ago
Incredible n inspiring
0
0
महेश्र्वर फडके About 93 Days ago
खूप सुंदर ,चिकाटी व धाडस याला सलाम
0
0
Arjun D Satpute About 93 Days ago
Excellent/Outstanding Achivement !
0
0

Select Language
Share Link
 
Search